Friday, 4 January 2019
·
पद्मगंधा राज्यस्तरीय रौप्य
महोत्सवी साहित्य संमेलन, 29 व 30 डिसेंबर 2018
§
संक्षिप्त अध्यक्षीय भाषण-डॉ.
किशोर सानप
भाषांचे ग्लोबलायझेशन झाले असून एकच एक ग्लोबल
भाषेकडे हळूहळू जग सरकत आहे...
Ø म-मराठीचा हे बिद्रवाक्य : भाषामृत पसायदान वाटणारी चळवळ
पद्मगंधा रौप्य महोत्सवी वर्षांत आयोजित साहित्य
संमेलनातून मराठी भाषेचे संवर्धन, मराठी भाषेचे लावण्य, माधुर्य, गोडवा भारताच्या कानाकोपर्यात
पोहोचावा यादृष्टीने माझा मर्हाटीचा बोलू कवतिके, परि अमृतातेही पैजा जिंके हे ज्ञानोबा-तुकोबा
परंपरेतून पाझरत आलेले भाषामृताचे पसायदान वाटण्याच्या शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी,
या हेतूने यापुढे मराठी भाषेच्या स्वाभिमानाची व भाषेचे अस्तित्व टिकविण्याची चळवळ
उभारणार आहे.
म-मराठीचा, मी-मराठी, माझी-मराठी
अशी जाणीवपूर्वक घोषणाही पद्मगंधाने केलेली आहे. मराठीच्या बाराखडीचाही आम्हाला विसर
पडत चालला आहे. मराठी माणसाला आजच्या काळात म-मराठीचा, मी-मराठीचा, माझी-मराठी हे वारंवार
सांगण्याची वेळ आली आहे.
Ø अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याच्या वल्गना वृथा आहेत
भाषा ही, साहित्य आणि संस्कृती
निर्माण करीत नाही तर समाजाच्या सर्वच स्तरातले लोक भाषेची सतत निर्मिती करीत असतात.
भाषा मरत नसतात. भाषा मारल्या जातात. भाषा जिवंत ठेवणारे मराठी भाषेचे खेड्यापाड्यांतून
भाषा घडवणारे 72 टक्के लोकच खरेतर आम्हाला भाषा संवर्धनाचे पाठ देत असतात. आम्ही शिक्षित
व साहित्य, संस्कृती, माध्यमात काम करणारी मराठी माणसेच मराठी भाषेचे मारेकरी आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याच्या
वल्गना वृथा आहेत. मराठी साहित्यिकांनी असे कोणते क्रांतिकारक व परिवर्तनशील साहित्य लिहिले आहे की जेणे करून
मराठी लेखकाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचे जाणवते ? मराठी साहित्य म्हणजे,
सारंकसं सामसुम तरंग नाही तलावात...अशीच स्थिती आहे.
इतर भारतीय भाषांच्या तुलनेत
मराठी साहित्यिक आपण भले आपले जग भले, यावृत्तीने स्वांतसुखायच आहेत. गुलामीच्या आणि
अभिव्यक्तिच्या मुस्कटदाबीच्या वेदना आमच्या मराठी लेखकांनी सूतराम भोगलेल्या नाहीत.
मराठी लेखक-कवींना आपल्याच प्रतिमेवर खुश असण्यातून बाहेर पडावे लागणार आहे.
Ø मराठी भाषेच्या अस्तित्वासोबत तिच्या टिकण्याचेही प्रश्न आज ऐरणीवर
आहेत.
मराठी शाळा महाराष्ट्रासह
देशभरात गेल्या काही वर्षांत बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रात तर मराठी शाळांची स्थिती
शोचनीय आहे. येत्या पाच-दहा वर्षांत औषधालाही मराठी शाळा महाराष्ट्रात शि‘कच राहणार
नाही, अशीच व्यवस्था समाज व शासनस्तरावर साकार होत आहे.
अभिजात भाषा हा प्रतिभावंत
साहित्यिकांचा अक्षर आविष्कार असतो. प्रतिभावंत आपल्या युगाचे जगण्याचे प्रश्न सोडवत
असतो. रामायण-महाभारपासून तर ज्ञानोबा-तुकोबांच्या संतकाळापर्यंतचा इतिहास साक्षीला
आहे. आधुनिक काळापासून तर उत्तराधुनिक ग्लोबल काळात मात्र प्रतिभावंतांची भाषा, साहित्य,
संस्कृती स्वनामधन्य व सन्मानहौसेच्या मोहाला बळी पडल्याचे दिसते.
अभिजात
भाषेचा प्रश्न अजून सुटला नाही. अभिजात म्हणजे 2000 वर्षे प्राचीन व उर्जितावस्थेत
असलेली भाषा होय. दर्जा केंद्रसरकार देते. तमिळ, संस्कृत, मल्याळम, उडिया ह्या चारच
भारतीय प्रादेशिक भाषा अभिजात आहेत. अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार
300 ते 500 कोटी रूपये अनुदान देते. त्यासाठीच हा खरेतर मराठी अभिजात भाषेचाही अनुदानप्राप्तीचाच
भाषा संघर्ष होय.
सन् 2017-18 या शैक्षणिक सत्रापासून दिल्ली विद्यापीठाच्या आधुनिक भारतीय
भाषा विभागातील बारा भाषांपैकी मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम भाषांमधले अभ्यासक‘म कायमचे
बंद करण्यात आले आहेत. दिल्लीतून मराठी हद्दपार झाली आहे.
Ø सर्व भाषांचे ग्लोबलायझेशन
सर्व भाषांचे ग्लोबलायझेशन
झाले असून एकच एक ग्लोबल भाषेकडे हळूहळू जग सरकत आहे. उद्याचा काळ भाषा विनाशाचा ग्लोबल
काळ आहे. आम्ही मराठी भाषेचा अर्थ आणि वापरही आज गुगलवर शोधतो. गुगल ही जिवंत भाषा
होत आहे तर बाकी सर्व भाषा गुगलच्या कैदेत गुलामीने मुक्तीदात्याचा शोध घेत आहेत.
Ø युगलेखक व्यक्ती ते समष्टीच्या अवकाशात साहित्याची निर्मिती करतात.
आमचे मराठी साहित्यिक अभिजात
साहित्याची नव्हे तर केवळ आपल्या व्यक्तीगत जीवनाच्या उदात्तीकरणाचेच साहित्य निर्माण
करताना दिसतात. समष्टीचे वैभव व सौंदर्य साहित्यिकांनी जाणून घ्यायला हवे. मराठीत साने
गुरुजींच्या पठडीतले संस्कारक्षम व चारित्र्याची जडणघडण करणार्या साहित्यांची निर्मिती
खुंटली आहे. शुभांगीताईंसारेखे वामनराव चोरघड्यांच्या संस्कारक्षम साहित्यसृजन परंपरेतले
साहित्यिक अलिकडच्या काळात अपवादच मानले पाहिजेत.
वाचन संस्कृती व नवीन पिढी
घडवणार्या साहित्याची निर्मिती साहित्यिकांनी करणे गरजेचे आहे. वाचन व प्रकाशन व्यवसाय
बुडत चाललाय. त्याला जसे शासन व समाज जबाबदार आहेत,तसेच ग्रंथनिर्मिती करणारे लेखक-प्रकाशक-ग्रंथालये-अभ्यासक्रमातील मिळमिळितपणाचे साहित्यही जबाबदार
आहे. याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा.
Ø भारतीय शेतकर्यांच्या आत्महत्या : जगबुडीचा धोका
सन् 1995 ते 2016 पर्यंत
एकूण 22 वर्षांत भारतातील एकूण 3,33,398 शेतकरी-शेतमजूरांनी आत्महत्या केल्या. याचाच
अर्थ दरवर्षी सरासरीने भारतात 15,155 शेतकरी व शेतमजूर आत्महत्या करून भूमीवर सृजनाचे
कष्ट करणारं जीवन संपवतात. नॅशनल क‘ाईम रेकॉर्ड्स ब्युरोनं वार्षिक अहवालात ही माहिती
दिली आहे. अर्थातच ही सरकारी आकडेवारी आहे. ती पुरेशी विश्वसनीय कुणीही मानत नाही.
नेटवर श्री मुजफ्फर हुसेन या अभ्यासकाने सर्वेक्षण
केल्यानुसार 1995 ते 2011 पर्यंत भारतात एकूण 7,50,860 शेतकरी व शेतमजूरांनी आत्महत्या
केल्याची माहिती दिलेली आहे. पैकी एकट्या सधन व विकसित शेती असणार्या महाराष्ट्रात
याच काळात एकूण 50,860 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. अनुक्रमे महाराष्ट्रातील मराठवाडा,
विदर्भ, खानदेश मध्ये सर्वाधिक जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नंतरच कर्नाटक,
आंध्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ मध्ये
परिस्थिती बिकट होत गेली. खरेतर भविष्यातील जगबुडीची ही सूचनाही आहे.
भारतात शेतीवर आधारित लोकसंख्या 70 टक्के असून, त्यापैकी एकूण
11.2% पेक्षाही अधिक शेतकरी व शेतमजूरांनी आत्महत्या केल्याचे नॅशनल क्राईम ब्यूरोनेच सांगितले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान व उद्योगप्रधान
देशात सन् 2018 मध्येही जवळपास 2 कोटी लोक दररोजच उपाशी असतात. त्यांना दोनवेळचं अन्नही
मिळत नाही. आपल्या शेतकर्यांच्या पुढच्या पिढीने पुकारलेला अघोषित संप देशाला अंधाराकडे
घेऊन जाणारा असेल... नव्या-जुन्या पिढीने शेतीचा व्यवसायच बंद केला आहे. 70,00,000
शेतकर्यांनी शेती करणे बंद केले आहे.
आमचे तुकोबा मढे झाकुनि
करिती पेरणी कुणबियांचे वाणी लवलाहे असे म्हणायचे तर आमच्या महाराष्ट्रातल्या कवी-लेखकांनी
मात्र, मढे दाखवूनि करिती सृजन मराठी साहित्याचे, यापेक्षा वेगळे वास्तव साहित्य व
संस्कृतीने का निर्माण केले नाही? हे असेच चालत राहिले तर सृष्टीच्या विनाशाचीच ती
नांदी ठरेल. शासनाला कळत नाही. लेखक-कवींनी शासनावर लेखणीचा दबाब का आणू नये? आंदोलन
का करू नये? केवळ कोरडी साहित्य निर्मिती म्हणजे समाजाच्या तोंडाला पाने पुसणे आहे.
Ø शब्दात अनुबॉम्बपेक्षाही अधिक ऊर्जा आणि शक्ती असते
सृष्टीच्या पोशिद्यांचे जगण्यामरण्याचे
प्रश्न मनाच्या तळठावातून आम्ही आपल्यासमोर मांडतो आहोत. आज मराठीतल्या सारस्वतांना
जगाच्या उद्धारासाठी कटीबद्ध राहून कवी नरेन्द्रासारखे नैतिकता आणि प्रतिभेचे नाते
जपण्याची गरज आहे. सर्वच प्रकारच्या भाषिक-सामाजिक-सांस्कृतिक जुलुमशाहीच्या विरोधात
साहित्यिकांना शब्दांचीच शस्त्रे यत्ने करून साहित्यसृजनाचे उत्तरदायित्व पार पाडावे
लागेल. शब्दात अनुबॉम्बपेक्षाही अधिक ऊर्जा आणि शक्ती असते, हे सारस्वतांनी ओळखायला
हवे.
संत कबीर आणि संत तुकोबांनी
शब्दांची ताकद ओळखली होती. शब्दांचा प्रसंगी शस्त्रासारखाही वापर लेखकाला करावा लागतो.
समाजातील पाखंड आणि ढोंगी बहुरूप्यांच्या शल्यचिकित्सेसाठी शब्दांचा एल्गारही पुकारावा
लागतो. देतो तिक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. ही लेखकाची भूमिका असावी.
Ø शब्द सत्ताधिशांचे आणि लक्ष्मीपुत्र भांडवली व्यवस्थेचे भाट बनू
नयेत
शब्द सत्ताधिशांचे आणि लक्ष्मीपुत्र भांडवली व्यवस्थेचे भाट बनू नयेत.
तर शब्द हे सामाजिक व धार्मिक रोगांची कठोर
शल्य चिकित्सा करणारे असावे. समाजाच्या शरीराला झालेला दुर्धर आजार दुरुस्त करणारे
आणि समाज स्वास्थ्यासाठी औषधोपचार करणारेही असावे लागतात. यासंदर्भात संत कबीर म्हणतात,
सब्द सब्द कोई कहे । सब्द को न हातपाव ॥
कोई सब्द औषधी करे । कोई करे घाव ॥
माझीये युक्तीचा नव्हे हा
प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ माझे सर्व
भांडवल । बोलविले बोल पांडुरंगे ॥ शब्दांकडे पाहण्याची शालिनता, विनम‘ता कवी-लेखकांजवळ
असायला हवी. शब्दप्रभूंनी शब्दांचा अहिंसात्मक वापर करावा. शब्दप्रसूतीचा वृथा अभिमान
बाळगू नये. अहंकार, अभिमानानं लेखक नॉर्सिसस बनतो. तो मग समाजाचा लेखक नसतो. तर तो
आपल्याच प्रतिमेत दंग होणारा सालोमालोच असतो. तुकोबांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास-
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचिच शस्त्रे यत्न
करू ॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे धन वाटू जन लोका ॥
तुका म्हणे शब्द हाचि देव । शब्दे गौरव पूजा करू ॥
Ø जगण्याचे चैतन्य निर्माण करणारी अमोघ ऊर्जा साहित्यात असते
समाजातील सर्वच बाजूनं अनाथ, उपेक्षित झालेल्यांच्या मनात जगण्याचे
चैतन्य निर्माण करणारी अमोघ ऊर्जा साहित्यात असते. सामाजिक प्रश्नांची चिंतनशील मांडणी विविध वाङ्मय
प्रकारांतून करताना, समाजाची मनं सुसंस्कृत व ऊर्जादायक करण्याचेही मु‘य साधन साहित्य
हेच आहे. समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यमही साहित्यच आहे. माणूस सर्वप्रथम कळतो तो
प्रतिभावंताला. माणसाचं दुःखही प्रथम कळतं तेही प्रतिभावंतालाच. करुणा आणि प्रेम या
अमृतानुभवाने माणसांना घडवतो तोही प्रतिभावंतच. प्रतिभावंत हे खरेतर लेखक-कवी-विचारवंत-शास्त्रज्ञ-सुधारक-परिवर्तनवादी-प्रगतीशील-सर्वहारांच्या
उद्धाराचे पसायदान जगाला वाटणारे जगनियंता असतात.
प्रतिभावंताजवळ प्रतिभेचा
तिसरा डोळा असतो. तिसर्या डोळ्यातून पाहिलेल्या मानवी जगाचे स्वप्न त्याला वर्तमानातच
समाजाच्या भूमीत पेरायचे असते. साहित्यिकालाही उद्याच्या जगाचे भवितव्य आजच आपल्या
सृजनशील प्रतिभेच्या मुशीतून शब्दसंहितेच्या निर्मितीने आजच जगाला दाखवायचे असते. संतकाळात
ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस, याच वारकरी संत परंपरेनं हजार वर्षांच्या
काळात निर्माण झालेले मानसिक व भौतिक प्रश्न भक्ती चळवळीच्या द्वारा सोडविल्याचा इतिहास
आजही साक्षीभूत आहे.
आधुनिक काळातले म्हणजेच
19-20 व्या शतकातले प्रश्न महात्मा फुले-सावित्रीबाई-ताराबाई शिंदे-पंडिता रमाबाई-शाहू
महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-गोखले-आगरकर-टिळक-नेताजी-महात्मा गांधी-गाडगे बाबा-राष्ट्रसंत
तुकडोजी-पंजाबराव देशमुख-कर्मवीर भाऊराव पाटील-विठ्ठल रामजी शिंदे-महर्षी धोंडो केशव
कर्वे-रवीन्द्रनाथ टागोर-बाबा आमटे-अब्दुल कलाम आझाद-मदर तेरेसा-मेधा पाटकर आदींनी
सोडविण्यासाठी आपलं जीवन सर्वस्व समाज आणि देशाच्या जनतेला समर्पित केलं.
बिकट व पतनशील वर्तमान सांस्कृतिक
व्यवस्थेत प्रतिभावंताला आपल्या लेखनस्वातंत्र्याचं, प्रतिभेचं, नैतिकतेचं सत्व अबाधित
राखून लिहिता आलं, तरच कदाचित वर्तमानातही अक्षरकृतीचे सृजन करता येणे शक्य आहे. त्यासाठी
तरी सारस्वतांना; अणूरेणूया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ ही आत्मस्फोटक अनुभूती नाही का
येऊ शकणार? शब्दांची हृदयभेदी-हृदयस्पर्शी शस्त्रे आपल्याला नाही का तयार करता येणार?
Ø तमाम लेखक-कवी-वाचक-विचारवंतांनी थोडेसे कोषातून बाहेर पडावे
तमाम लेखक-कवी-वाचक-विचारवंतांनी
थोडेसे कोषातून बाहेर पडावे. लोकांच्या हृदयासी संवाद साधावा. साहित्यात क्रांतीची ताकद असते. लोकांमध्ये क्रांतीची मानसिकता सबळ करण्याची ताकद
शब्दच देत असतात.
Ø संभवामि युगे युगे...
खरे तर प्रतिभावंत युगनायक
आणि महानायक पुन्हा पुन्हा जन्माला येतात. कधी ते कृष्ण असतात तर कधी ते संत कबीर असतात.
संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम असतात. कधी ते गाडगे बाबा-तुकडोजी महाराज म्हणून जन्माला
येतात. संभवामि युगे युगे...हीच खरं तर प्रत्येक युगाला तारणारी सृष्टीच्या निर्मात्यांची
गर्जना असते. प्रत्येक कालखंडात युगनायक प्रतिभेचा तिसरा डोळा उघडून, जगातल्या पाखंडांचा
विद्ध्वंस करतात.
एकविसाव्या शतकातही विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो...जो
जे वांछील तो ते लाहो प्राणिजात...दुरितांचे तिमिर जावो...खळांची व्यंकटी सांडो...जगात
सत्य, न्याय, बंधूभाव, सेवाभाव, स्वातंत्र्य आणि समता नांदो...हेच विश्व कल्याणाचं
पसायदान महानायक मागतात. आजही युगपुरुषांचंच पसायदान हिंदुस्थानासह जगातही सत्य-अहिंसा-शांती-समता-बंधूभावाची
प्रतिष्ठापना करणार असल्याचा विश्वास आम्ही बाळगायला हवा.
Ø पद्मगंधा प्रतिष्ठानच्या विचारपीठावरून...
मानवी जीवनाला महा-विनाशाच्या चक्रव्यूहातून वाचविण्याचा संदेश,
पद्मगंधा प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनातून आपण जगाला देवू या...
-डॉ. किशोर सानप
मानेवाडा बेसा
रोड, 249/ए, दिविशा,
शाहू नगर, नागपूर-440
034
PHONE-
9518368976, 9326880523
dr.kishorsanap@gmail.com
यशवंतराव
चव्हाण स्मृती समारोह, अंबेजोगाई
दि.25
नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2018
डॉ.
किशोर सानप यांचे उद्घाटकीय भाषण
हे प्रतिभावान
माणसा, तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही सृष्टी...
बंधू आणि भगीनींनो, श्रद्धेय यशवंतराव चव्हाण भारतीय राजकारणातील
हिमालय. द्विभाषिक मुंबई राज्याचे व स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. यशवंतराव
म्हणजे सांस्कृतिक विकास महापुरुष. (जन्मः12मार्च 1913 कराड, मृत्यूः 25 नोव्हेंबर
1984) आज यशवंतराव चव्हाणांचे पुण्यस्मरण करून त्यांच्या स्मृतींना आपण अभिवादन करूया.
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे हे 34 वे वर्ष आपण साजरे करीत आहोत. स्मृती समारोहाचे
अध्यक्ष, माझे सहकारी मित्र समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक, महाराष्ट्रातील विचारवंत,
लेखक डॉ. अशोकजी चौसाळकर, समिती सचिव कवी मित्र दगडू लोमटे, यशवंतराव चव्हाण स्मृती
समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थितीत माझ्या सग्यासोयर्यांनो...
यंदाच्या 34 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे आपल्या सर्वांच्या
साक्षीने उद्घाटन झाल्याचे आम्ही घोषित करतो. सोबतच यशवंतरावांच्या विचारांची प्रकाश
ज्योत अखंडपणे पेटती राहो. प्रकाशाच्या किरणांनी समाज उजळून निघो. शेती व उद्योगात
नव्या पिढीच्याही शेतकर्यांना, शेतमजूरांना, कष्टकरी-श्रमकरी वर्गाचे आर्थिक शोषणाचे
प्रश्न सोडविण्याच्या तळमळीने, यशवंतरावांच्या विचारांनी जनजागरणाला महाराष्ट्रासह
देशव्यापी चळवळीचे रूपही, आपल्याच अंबाजोगाई नगरीतूनच प्राप्त होवो; यासाठी शुभेच्छा
व शुभकामनाही देतो.
अंबाजोगाई : मराठवाड्याची सांस्कृतिक नगरी
मित्रहो, अंबाजोगाई हे अंबेचे एकमेव शक्तिपीठ, आदिपीठ. योगेश्वरी
देवीच्या अनुष्ठापनेमुळे दीड हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. अंबाजोगाई मध्ये मराठीचे
आद्यकवी मुकुंदराज व मराठी साहित्याचे नवकोट नारायण संत कवी दासोपंत यांची समाधीस्थले
आहेत. अंबाजोगाई ही मराठवाड्याची सांस्कृतिक नगरी प्राचीन काळापासून अंबाजोगाई ही ङ्कनगरी
नगर भूषण भवःङ्ख मानली जाते. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांच्यासारख्या
समाजसेवकाच्या कर्तृत्वाने ही नगरी समृद्ध झाली. या प्राचीन सांस्कृतिक नगरीत आपण यशवंतरावांच्या
सांस्कृतिक व कलाविषयक तसेच कृषिवलांच्या विकासाचा जागर गेल्या 34 वर्षांपासून अखंडपणे
करीत आहात. समाजमनातील अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाची ज्योत पेटवीत आहात.
यशवंतरावांचा सांस्कृतिक वारसा : स्मृती समारोह समिती
दिनांक 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत सतत तीन दिवस आपण यशवंतरावांच्या
कार्यकर्तृत्वाचा जागर करणार आहोत. या समारोहात उद्घाटन, कविसंमेलन, चित्रकला स्पर्धा,
बाल आनंद मेळावा, सुगम संगीत मैफल, शेतकरी परिषद, पीक स्पर्धा, शास्त्रीय संगीताची
मैफल, मराठवाड्यातील शेती-साहित्य-संगीत-युवाक्षेत्रात प्रयोगशील प्रतिभावंताचा सन्मान
तसेच समारोपासह पुस्तक प्रदर्शन व विक्री, शेती अवजारे, फोटो व चित्रकला प्रदर्शन आदी
उपक्रमांसह भरगच्च सांस्कृतिक महोत्सव अंबाजोगाईच्या ऐतिहासिक, पुरातन नगरीत संपन्न
होणार आहे. अर्थातच आपण या महोत्सवातून, यशवंतरावांच्या कृष्णाकाठी आपली ज्ञान-विज्ञान-कलांची
तहान भागविणारच आहोत.
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह
समितीची स्थापना
बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष;
राजकीय, शिक्षण, सहकार, स्थानिकर स्वराज्य संस्था, भाषा-साहित्य-संस्कृती-संगीत अशा
जीवनव्यापी कलांच्या विकासासाठी वयाच्या सत्तरीपर्यंत अखंडपणे कार्यरत-सेवारत असलेले
निष्काम कर्मयोगी व अंबाजोगाईचे सांस्कृतिक भूषण भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीची स्थापना 1985 मध्येच झाली. समितीत सुरूवातीपासूनच त्यांचे वयोवृद्ध जेष्ठमित्र
श्री भगवानराव शिंदे यांनी सहकार्य केले. समितीच्या कामात आजवर साहित्य, नाटक, संगीत,
चित्रकला, समाजसेवा, शिक्षण या क्षेत्रातील बिगर राजकीय लोक कार्यरत आहेत. संस्थापक
भगवानरावजी लोमटे व भगवानरावजी शिंदे मात्र विश्वस्त मंडळाच्या बाहेर राहूनच त्यांनी
कार्य केले. समितीची निर्मिती करूनही कधी ते समितीच्या कार्यक्रमात विचारपीठावर न बसता
एक सामान्य रसिक म्हणून लोकांसोबत बसत होते. निःस्वार्थी, निःर्मोही, प्रसिद्धीविन्मुख
असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. साहित्य, संगीत, शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रात
यशवंतरावजींच्या कार्याचा वारसा भगवानरावजी लोमटेंनी पुढे नेला. दुर्बल समाजघटकाच्या
विकासकामांमध्ये आपले आयुष्य समर्पीत केले. भगवानरावजी लोमटे कलासक्त रसिक व कवी होते.
नाट्यसंगीत, लावणी, संस्कारमय साहित्याचे वाचन, कविता, शाहिरी, भक्तिगीत, लावणी, नाटक,
नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीताचीही त्यांना आवड होती. त्यांनी स्वतः कविता, लावणी, भावगीतांचेही
लेखन केले परंतु कवी म्हणून त्यांनी आपली प्रतिमा जपली नाही.
समितीचे सचिव आमचे मित्रवर्य कवी-लेखक-पत्रकार-कार्यकर्ता दगडूजी
लोमटे अथकपणे भगवानरावजी लोमटे यांचा सांस्कृतिक वारसा चालवीत आहेत. दगडू लोमटे कवी,
लेखक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून कार्यरत
आहेत. डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्या युवा राष्ट्रीय संस्कार योजना शिबिरांचे आयोजन
व सहभाग, डॉ. सुब्बारावांच्या सोबत 2011 च्या दक्षिण आशियायी मैत्री परिषद-कोलंबो,
श्रीलंका येथे शिबिरार्थी म्हणून सहभाग, आनंदवनचे निर्माता बाबा आमटे यांच्या भारत
जोडो अभियानाच्या वेळी 1985-86 मध्ये 6300 कि. मि. सायकल यात्रेत सहभाग, आनंदवन निर्मित
स्वरानंदवनचे प्रयोग व निधी संकलन; एकूणच आनंदवन, हेमलकसा-लोकबिरादरी, स्नेहालय नगर, इन्फ्रंट इंडिया बीड, आम्ही सारे
सेवक सेवालय लातूर, सहारा अनाथालय गेवराई, शांतीवन शिरूर कासार बीड अशा विधायक, निःस्वार्थ,
समाजसेवी संस्थांमध्ये दगडूजी कार्यरत आहेत. उत्तम वक्ताही आहेत. लवकरच निखारे-कविता
संग्रह, मी व माझे ललितबंध, पत्र-प्रपंच असे तीन महत्त्वाचे ग्रंथ त्यांच्या प्रतिभावंत
व कार्यकर्तेपणाची साक्ष म्हणून प्रकाशित होणार आहेत. आजही दगडूजी लोमटे भगवानरावजी
लोमटेंच्या विधायक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वाङ्मयीन कर्तृत्वाचा वारसा
पूर्णपणे समाजाला व संस्थांना आयुष्य समर्पीत करून जपत आहे. आजकाल दगडूजींसारखे विधायकतेचा
वारसा जपणारे लोक दुर्मिळ आहेत. आम्ही सर्वांनीच दगडूजी लोमटे व यशवंतराव चव्हाण स्मृती
समारोह समितीचे सांस्कृतिक-सामाजिक ऋण मान्य करायला हवे.
महाराष्ट्रपुरुषाची लोकप्रिय (राजकीय) राष्ट्रीय प्रतिमा
देशाच्या सर्वांगिण विकासात, अर्थव्यवस्थेत तसेच नैतिक राजकारणातही
महाराष्ट्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देणारे यशवंतराव चव्हाण हे खरेतर राष्ट्रीयस्तरावरील
लोकप्रिय महाराष्ट्रपुरुष होते. बालपणातच पित्याचे छायाछत्र हरवल्यावर विपरित परिस्थितीवर
मात करून, यशवंतराव वयाच्या सतराव्या वर्षीच सन् 1930 मध्ये महात्मा गांधींच्या असहकार
चळवळीत सहभागी झाले. स्वामी रामानंद भारती, दौलप्पा नवले, आप्पासाहेब सिंहासने, वि.
स. पागे, गोविंद कृपाराम वाणी हे यशवंतरावांचे देशभक्त मित्रमंडळ. सन् 1932 मध्ये सातार्यात
भारतीय तिरंगा फडकवल्याबद्दल ब्रिटीश शासनाने यशवंतरावांना अठरा महिने कैदेची शिक्षा
सुनावली. सन् 1938 मध्ये मुंबई विद्यापीठातून इतिहास व राज्यशास्त्राची पदवी प्राप्त
केल्यावर 1941 मध्ये एल.एल.बी. पदवी मिळवली. 1942 मध्ये फलटणच्या वेणूताईंशी विवाहबद्ध
झाले.
1942 मध्ये महात्माजींच्या ‘चले जाव Quit India’ चे आंदोलनाचे अ.भा.काँग्रेस कमेटीचे नेतृत्व मुंबई सेशनमध्ये
खुद्द यशवंतरावांनी केले होते. परिणामस्वरूप त्यांना पुन्हा अनेक कार्यकर्त्यांसह ब्रिटिशांनी
अटक करून जेलमध्ये टाकले. जेलमधून तब्बल दोन वर्षांनी 1944 मध्ये यशवंतरावांना मुक्त
करण्यात आले. यशवंतराव काँगे्रसचे निष्ठावंत कार्यकर्ते व सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते
होते. पंडित नेहरू, सरदार पटेल, केशवराव जेधे यांच्या सोबत यशवंतरावांनी कार्य केले.
समाजवादी लोकशाहीवर त्यांची श्रद्धा होती.
यशवंतराव म्हणजे कृष्णाकाठचे अमृत. राजकीय नेतृत्वाचे नैतिक महामेरू.
लोकनेते व सुसंस्कृत व समृद्ध सांस्कृतिक नेतृत्व. कृषी व उद्योग म्हणजेच ग्रामीण व
नागरी भागांसह आदिवासी वगैरे अविकसित भागाच्याही समतोल विकासाचे शिल्पकार. स्वातंत्र्य
सेनानी व दीर्घकाळ देशाची व राज्याची सेवा करणारे लोकसेवक. शेतकर्यांचे मसिहा. गोरगरिबांच्या
शिक्षण व आर्थिक विकासाच्या नाड्या मजबूत करणारे सामान्य माणसांचे आधारस्तंभ. विविध
लोकभुमिकातून यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाने पेटवलेली ज्ञान व समृद्धीची उज्ज्वल ज्योत,
देशाच्या व महाराष्ट्राच्याही कानाकोपर्यातील अंधारयुगाच्या अंताची सुरूवात व विकासयुगाचा
प्रारंभ होता...
द्विभाषिक मुंबई राज्य व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
भारतीय स्वातंत्र्यानंतर
मुंबई द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली. बी.
जी. खेर व मोरारजी देसाई मुख्यमंत्री बनले. 1 नोव्हेंबर 1956 पासून 30 एप्रिल 1960
पर्यंत मा. यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री झाले. पुढे 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर
1962 पर्यंत स्वतंत्र महाराष्ट्राचेही पहिले मुख्यमंत्री यशवंतरावच होते. पंडित नेहरूंच्या
केंद्रिय मंत्रीमडळात संरक्षण मंत्री (1962-66), गुलजारीलाल नंदांच्या मंत्रिमंडळात
गृहमंत्री (1966-70), इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री (1971-74), संरक्षणमंत्री
(1974-77), 1977 च्या सार्वजनिक निवडणूकीत इंदिरा गांधींना अपयश आल्यामुळे, केंद्रात
जनता पक्षाचे सरकार असताना (1977-78) यशवंतरावांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते म्हणून
संसदेत नेतृत्व केले. मा. चौधरी चरणसिंह पंतप्रधान असताना यशवंतराव पाचवे उप-पंतप्रधान
(1979-80) व मोरारजी देसाई पंतप्रधान असताना संरक्षणमंत्री (1979-80) तसेच इंदिरा गांधींच्या
कारकिर्दीत पुन्हा 1982 मध्ये आठव्या केंद्रिय वित्त आयोगाचेही अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील
मराठी माणूस केंद्रात संरक्षण, गृह, विदेश, अर्थमंत्री तसेच पाचवे उप-पंतप्रधानपदी
विराजमान झालेले एकमेव व्यक्तिमत्त्व होय. सन् 1956 ते 1984 पर्यंतच्या 30 वर्षांत
यशवंतरावांनी नैतिक राजकारणी म्हणून आदर्श अशी प्रतिमा देशासमोर निर्माण केली. यशवंतरावांनी
त्यांच्या राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राला सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर
करण्यासाठी पराकाष्टेने प्रयत्न केले. यशवंतराव लोकनेते व शेतकर्यांचे नेते होते.
यशवंतरावांच्या नैतिकता व कार्यशैलीवर कधीही कुणी प्रश्न निर्माण केले नाहीत. खरेतर
महाराष्ट्रासह देशाच्याही राजकारणात यशवंतराव अजातशत्रू होते. सन् 1960 ते 1970 ह्या
दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्राचे ङ्कपृथ्वीराजङ्ख, ङ्कनवा शिवाजीङ्ख या नावानेही महाराष्ट्र ते दिल्लीपर्यंत यशवंतराव ख्यातीप्राप्त
होते.
महाराष्ट्राचा अविचल सह्याद्री
महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून यशवंतराव लोकप्रिय होते. अविचल नैतिकता,
आत्मनिर्भरता, कला व संस्कृतीचा विकास, सर्वहारांच्या उद्धाराचे समाजकारण, राजकारण
यशवंतरावांनी केले. राजकारणात वारसदार, शिष्यही पायलीचे पन्नास भोवतालात वावरतात. राजकारणात
गुरू व शिष्य यांच्या नातेसंबंधाचे टिकाऊपण केवळ काम काढून घेण्यापुरतेच असते. युज
अँड थ्रो, हेच आजच्या राजकारणाचे प्रमेय आहे. यशवंतराव सुसंस्कृत व चारित्र्यसंपन्न
होते. समाजकारण व राजकारण नैतिकतेने, सेवाभावीपणे, निष्ठापूर्वक केले.देशासह राज्याच्या
विकासपूर्तीचा ध्यास घेणारे ते एकमेव समाजकारणी व राजकारणी होते. यशवंतरावांच्याही
राजकीय काळात भरपूर शिष्यसंप्रदाय भोवतालात घुटमळत होता. पैकी काही शिष्य तर देशाच्या
राजकीय आकाशात शरदाचे चांदणे म्हणूनही चमकले आहेत. यशवंतरावांनाही त्यांची राजकीय नैतिकता
कसोटीला नेणारा; सर्वहारांच्या कल्याणाचे राजकारण व समाजकारण करणारा एकही वारसदार मिळू
शकला नाही. ज्यांना यशवंतरावांचे वारसदार मानले जाते, ते त्यांच्या राजकीय नैतिकतेच्या
पासंगालाही पुरत नाहीत. निर्मोही, निष्कलंक, निष्कपट, अजातशत्रू असे यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व
होते.
महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीचे आद्यशिल्पकार
यशवंतराव खरेतर महाराष्ट्राच्या सर्वंकष व संतुलित विकासाची पायाभरणी
करणारे महाराष्ट्राचे आद्यशिल्पकार होते. यशवंतराव प्रागतिक व उदारमतवादी विचारसरणीचे
खंदे पुरस्कर्ते होते. उत्कृष्ट संसदपटू व नैतिकता मानणारे राजकारणी होते. रसिकता व
कलेचे उपासक होते. युगांतर (1970, देशाच्या सामाजिक प्रश्नांचे चिंतन), सह्याद्रीचे
वारे (1962, भाषण संग्रह), कृष्णाकाठ खंड 1 (1984, आत्मचरित्र), ऋणानुबंध (1975, ललित
लेखसंग्रह), विदेश दर्शन (विदेशातून पत्नीला पाठवलेल्या पत्रांचा संग्रह) या साहित्यकृतीचे
सृजनशील लेखकही होते. यशवंतरावांनी त्रिखंडात्मक आत्मचरित्र लिहिण्याचे नियोजन केले
होते. जीवनाची जडणघडण सातारा-कराडमधून म्हणून ङ्ककृष्णाकाठङ्ख. मुंबई राज्य व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून
या कालखंडाविषयी ङ्कसागर तीरङ्ख तर सन्
1962 ते चीन-भारत युद्ध, भारत-पाकयुद्ध (1965) व केंद्रिय मंत्री ते वित्त आयोगाच्या
अध्यक्षापर्यंतच्या प्रवासाचा सांगाती म्हणून ङ्कयमुना काठङ्ख अशा तीन खंडापैकी केवळ ङ्ककृष्णा काठङ्ख लिहू शकले.
पुढे कदाचित त्यांना उसंत मिळाली नसेल. या एकाच आत्मचरित्रातून व इतर ललित लेखनातून
यशवंतरावांच्या प्रतिभागृहात दडलेला एक अभिजात लेखक प्रकटत गेलेला आहे.
यशवंतरावांनी राजकीय-सामाजिक विषयांवर खूप भाषणे दिली. ग्रंथातूनही
चिंतन-मंथन मांडले. उदाहरणार्थ, असे होते कर्मवीर, उद्याचा महाराष्ट्र, कोकण विकासाची
दिशा, प्रत्यक्ष आंदोलन व संसदीय लाकशाही, जीवनाचे विश्वरूप : काही श्रद्धा, काही छंद,
पत्र-संवाद, पक्षावर अभंगनिष्ठा, महाराष्ट्र-म्हैसूर सीमा प्रश्न, लोकांचे समाधान हीच
यशस्वी राजकारणाची कसोटी, वचनपूर्तीचे राजकारण, विचारधारा, विदर्भाचा विकास, शब्दांचे
सामर्थ्य, शिवनेरीच्या नौबती असे बहुविध भाषणांचेही संग्रह प्रकाशित झाले आहेत. यशवंतराव
उत्तम रसिक व उत्कृष्ट श्रोता होते. विचारवंत व निष्ठावंत अभ्यासक होते. मराठी, हिंदी
भाषिक लेखक, कवी, पत्रकार अशा अनेकांशी यशवंतांचे रसिक, श्रोता, वक्ता म्हणून सलोख्याचे
संबंध होते. समाजकारण, राजकारण, आर्थिक नियोजन, देशाच्या विकासाचे नियोजन अशा विविध
विषयांचे गाढे अभ्यासक व अभ्यासू असे वक्ता होते. एकूणच महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या
समृद्ध करणारे यशवंतराव खुद्द सुसंस्कृत व सांस्कृतिक महाराष्ट्र पुरुष होते. महाराष्ट्रासह
देशाचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर लोकशाही मार्गाने समाजवाद रुजवून आर्थिक विषमता
समूळ नष्ट करता येणे शक्य आहे. अनेक क्षेत्रात गोरगरिबांच्या विकासाच्या दिशा, सृजनशील
व उद्योगी करण्यासाठी यशवंतरावांनी आयुष्यभर कार्य केले.
भारत हा कृषी आधारित देश असल्यामुळे यशवंतरावांनी; शेती, उद्योग,
सहकार, नियोजनाला मुख्यमंत्री व केंद्रात असताना, कृतिशील उपक्रम देशभर राबवून विकासाची
गती वाढवली. शेती व शेतकर्यांविषयी यशवंतरावांना कमालीची आस्था होती. शेती व शेतकरी
हाच देशाच्या आर्थिक समृद्धीचा कणा असल्याचे ते मानत होते. खुद्द यशवंतराव सांगली जिल्ह्यातील
देवराष्ट्रे या खेड्यात शेतकर्याच्या कुटुंबात जन्मले. वाढले. खुद्द शेतीचा आणि गावातल्या
शेतीविषयक समस्यांचा अभ्यास करून, शेतीच्या मालकीहक्काचे प्रश्न, भूमीहीनांचे प्रश्न,
शेतीच्या आधुनिकीकरणाचे प्रश्न, अविकसित व अनुत्पादक पडीक जमीन शेतीच्या लागवडीखाली
आणण्याचे प्रश्न, नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर करणे-धरणे बांधणे व विस्थापितांच्या
पुनर्वसनाचे प्रश्न यशवंतरावांनी अग्रक्रमानं सोडवले. शेती व्यापारी तत्त्वाने करायला
हवी. शेतकर्यांनीही नवनवीन तंत्रज्ञान, लागवडीच्या पद्धती, नवीन पिके आदींच्या दृष्टीने
कृषिशास्त्राचा अभ्यास करायला हवा; असेही काही पर्याय शेतीच्या विकासासाठी यशवंतरावांनी
सूचवले होते. यशवंतरावांनी प्रसंगी कायदे मंजूर करवून, पारंपरिक शेतीच्या समस्यांचे
निराकरण करण्याचे मार्ग खुले केले होते. भूमिहीनांना जमिनीचा मालकी हक्कही बहाल केला.
अशा कितीतरी सुधारणा यशवंतरावांनी आपल्या देशातील शेतकरी बांधवांच्या कल्याणार्थ केल्या
होत्या.
कृषी व उद्योगांच्या समतोल विकासाचे पुरस्कर्ते
यशवंतराव शेती व उद्योगांच्या समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. विकासाचा
मास्टर प्लॅन तयार करताना, त्यांनी अविकसित भागाच्या विकासाला प्राधान्य दिले. शेती
व शेतीपुरक उद्योगांची सांगड घालून, ग्रामीण औद्योगीकरणालाही चालना दिली. ग्रामीण भागातून
शहरात स्थलांतरित होणार्या श्रमिकांचे लोंढे ग्रामीण भागाच्याच शेतीपुरक उद्योगात
वळते केले. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासात सहकाराची तत्त्वे महत्त्वाची
मानून, महाराष्ट्रासह देशात सहकाराचा आराखडा अंमलात आणून, शहरी व ग्रामीण आर्थिक विकासाच्या
सर्वच जीवनोपयोगी व औद्योगिक क्षेत्रात, सहकारी तत्त्वांची पायाभरणी केली. देशाचा संतुलित
आर्थिक विकास व्हावा, या हेतूने औद्योगिक विकासासाठी नियोजन व अविकसित भागात संयुक्त
औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. यशवंतराव म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचे विकासपुरुषच
मानायला हवे. यशवंतराव मुख्यमंत्री व केंद्रिय मंत्री असताना, सर्वंकष विकासाच्या योजनांची
पायाभरणी केली.
1. पंचायत राज अंतर्गत जिल्हा परिषद-पंचायत समिती-ग्रामपंचायत
अशी त्रिस्तरीय प्रशासकीय विकास यंत्रणा अंमलात आणली.
2. राज्याच्या विकासासाठी राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ केला.
3. कोल्हापूर पाटबंधार्यांचा विकास-प्रचार करताना कोयना, उजनी ह्या
प्रकल्पांच्या उभारणीला गती दिली.
4. महाराष्ट्रात एकूण 18 सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली.
5. मराठवाडा व कोल्हापूर विद्यापीठांची स्थापना केली.
6. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेची संकल्पना मांडली.
7. मराठी साहित्य संस्कृती महामंडळाची निर्मिती.
8. मराठी विश्वकोश मंडळाची स्थापना करून निर्मिती व
संपादन मंडळाच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत व लेखक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
यांची नियुक्ती करून त्यांना सर्वाधिकार सोपवले.
यशवंतरावांची अखंड पक्षनिष्ठाः हिमालयाच्या हाकेला धावला सह्याद्री
1946 मध्ये मुंबई राज्यातील दक्षिण सातार्यातून विधान सभेच्या निवडणूकीतील
विजयाने यशवंतरावांच्या राजकीय कारकीर्दिची
मुहूर्तमेढ रोवली गेली. संयुक्त महाराष्ट्राच्या
चळवळीला यशवंतरावाचा मूक पाठिंबा होता. सरकारात असल्याने व मुंबई राज्याचे 1 नोव्हेंबर 1956 ते 30 एप्रिल
1960 पर्यंत मुख्यमंत्री असल्याने, पंतप्रधान नेहरूंचा भाषिक राज्यनिर्मितीच्या विरोधाचा
दबाव यशवंतरावांवर होता. सन् 1957 मध्येच
यशवंतरावांनी कराड विधान सभेची निवडणूक जिंकल्यामुळे 1 मे 1960 पासून निर्मित महाराष्ट्राचे
पहिले मुख्यमंत्री म्हणून काँगे्रसने यशवंतरावांनाच पदभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवली.
औद्योगिक व कृषी विकासाचे द्रष्टा असलेल्या यशवंतरावांना, केंद्रिय मंत्रीमंडळात पाचारण
करण्याचे पंडितजींनी ठरवल्यामुळे, सन् 1962 मध्ये यशवंतरावांनी संसद सदस्याची निवडणूक
बिनविरोधच जिंकली. 1962 ते 1965 मध्ये पंडितजींच्या केंद्रिय मंत्रीमंडळात यशवंतरावांना
संरक्षण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. याच काळात चीन-भारत युद्ध झाले. युद्धोत्तर
काळात यशवंतरावांनी भारत-चीन सरहद्दीचे प्रश्न यशस्वीपणे हाताळले. परिणामस्वरूप, ङ्कहिमालयाच्या
हाकेला धावला सह्याद्रीङ्ख या शब्दात यशवंतरावांचा
देशाने गौरव केला. नेहरूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना, पुन्हा भारत-पाकयुद्धाचीही
परिस्थिती यशवंतरावांनीच सप्टेंबर 1965 मध्ये हाताळली. पंडितजीनंतर इंदिराजींनी यशवंतरावांकडे
1966 मध्ये गृहखात्याची जबाबदारी सोपवली.
1969 मध्ये सिंडीकेट काँग्रेस पक्षाच्या उदयाची कल्पना पुढे आली.
यशवंतरावांना बदनाम करण्याचा घाट घातला गेला. विरोधकांनी दुखरे शरसंधानही साधले. इंदिरा
गांधींनी यशवंतरावांचा पाठिंबा मिळवला. यशवंतरावांनी काँग्रेसप्रती पक्षनिष्ठा अबाधीत
राखली. इंदिराजींनी 26 जून 1970 मध्येच यशवंतरावांकडे अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपवली.
11 ऑक्टोबर 1974 मध्ये इंदिराजींनी विदेश मंत्रालयाची जबाबदारी सोपवली. 1971 च्या निवडणूकीत
रायबरेलीतून पराभूत झालेल्या राज नारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली
याचिका मान्य करून, न्यायाधीश जनमोहन सिन्हा यांनी 12 जून 1975 मध्ये रायबरेलीच्या
जागेची इंदिराजींची निवडणूक अवैध ठरवून, सहा वर्षांसाठी पदापासून बेदखल केले. 25 जून
1975 रोजी तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी इंदिराजींना गांधींच्या सूचनेनुसार
भारतीय घटनेच्या कलम 352 नुसार देशात आणिबाणी जाहीर केली. याच काळात जयप्रकाश नारायण
व अनेक काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनीही इंदिरा गांधींना विरोध केला. यशवंतरावांनीही
इंदिराजींचा साथ सोडला. 1977 च्या निवडणूकीत पहिल्यांदा देशात गैरकाँगे्रस पक्षाचे
आघाडी सरकार सत्तारुढ झाले. इंदिराजींच्या काँग्रेसचाही पराभव झाला. खुद्द इंदिरा गांधीही
निवडणूक हारल्या.
मोरारजी देसाई पंतप्रधान बनले. 1977-1979 पर्यंतच जनता दलाचे मोरारजी
व चरणसिंग अशा दोन पतंप्रधानांचे आघाडी सरकार केवळ दोनच वर्ष टिकले. याही सरकारात यशवंतरावांकडे
मोरारजींनी गृहखाते तर चौधरी चरणसिंग पंतप्रधान असताना दोन उप-पंतप्रधानपदी बाबू जगजीवन
राम व यशवंतरावांची निवड केली गेली. काँग्रेसच्या समर्थनाने पाच महिने चरणसिंग पंतप्रधान
बनले. एकूणच दोन वर्षांत अंतर्गत कलहामुळे विरोधकांची आघाडी सत्तास्थानापासून वंचित
झाली. शेवटी जानेवारी 1980 ची सार्वजनिक निवडणूक इंदिरा गांधींच्या काँग्रेसने बहुमताने
जिंकली. भारतीय काँग्रेसची सत्ता अखंडपणे विकसित झाल्याचे पंडित नेहरूंपासून अनुभवणारे
यशवंतराव या क्लेशदायक घडामोडींचेही साक्षीदार राहिले. सन् 1978 ते 1980 पर्यंतच्या
काळात यशवंतरावांच्या पक्षनिष्ठेला अनेक हादरे बसले.
1978 मध्ये काँग्रेसचे विभाजन दोन पक्षात झाले. भारतीय काँग्रेस
(अर्स), काँग्रेस (इंदिरा). जुनी जानती मंडळी देवराज अर्स, देवीकांत बरुआ, ब्रह्मानंद
रेड्डी, ए. के. अँथोनी, शरद पवार, प्रियरंजनदास मुंशी, यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेस
(अर्स) मध्ये राहणे पसंद केले. इंदिरा गांधींसोबत शंकरदयाल शर्मा, उमाशंकर दिक्षित,
चिदंबरम्, बॅ. ए. आर. अंतुले, गुलाबराव पाटील होते. देवराज अर्स जनता दलात गेल्यावर
भारतीय काँग्रेस सोशालिस्ट नावाने नवीन विभाजन अस्तित्वात आले. शेवटी इंदिरा गांधींच्या
काँगे्रसपुढे भारतीय काँग्रेसच्या इतरही कोणत्याच
राजकीय पक्षाला यश मिळाले नाही. परिणामस्वरूप सन् 1978 पासून यशवंतरावांच्या राजकीय
कारकिर्दीला हादरे बसत गेले.
चौधरी चरणसिंगांच्या काळात यशवंतराव 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी
1980 मध्ये उप-पतंप्रधान व मोरारजींच्या काळात संरक्षणमंत्री होते. एवढाच एक अपवाद
घडला. जानेवारी 1980 च्या सार्वजनिक निवडणूकीत इंदिरा काँग्रेस पक्ष बहुमताने सत्तेत
रुढ झाला. यावेळी महाराष्ट्रातून एकमेव यशवंतराव चव्हाण खासदार म्हणून निवडून आले.
नेहरूकन्या इंदिरा गांधी यांची साथ सोडायला नको होती, ही खंतही यशवंतरावांना अखेरीस
वेदनादायकच ठरली. शेवटी इंदिरा गांधींची काँग्रेस सत्तारुढ झाल्यावर सहा महिन्यांनी
इंदिराजींच्या काँग्रेस पक्षात यशवंतरावांनी प्रेवश केला. सन् 1982 मध्ये यशवंतराव
चव्हाणांची 8 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यशवंतरावांची
पक्षनिष्ठ भूमिका नैतिक व निःस्वार्थ होती. आयुष्याचा शेवटचा श्वासही त्यांनी काँग्रेस
पक्षाच्या आपल्या राजकीय घरातच घेतला. वयाच्या 71 व्या वर्षी ह्या सह्याद्री पुत्राला
दिनांक 25 नोव्हेंबर 1984 मध्येच हृदयाघाताने दिल्लीत अखेरचा श्वास घ्यावा लागला. कराड
मध्ये कृष्णा-कोयनेच्या प्रीतीसंगमावर पूर्णपणे राजकीय इतमामात हिमालयाच्या हाकेला
धावून गेलेला सह्याद्रीपुत्र समाधिस्त झाला.
हे प्रतिभावान माणसा, तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही सृष्टी...
मित्रहो, माणूस हाच या सृष्टीला सत्यम-शिवम-सुंदरम करणारा अलौकिक
बुद्धीची देणगी मिळालेला, अंतिमतः सत्य-अहिंसा-शांतीचीच आस असलेला सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत
आहे. प्रत्येक माणसाच्या आत विधायक ऊर्जा असलेला एक माणूस असतो. त्याला अस्तित्वाची
आणि अस्मितेची जाणीव फक्त करून द्यायची व करून घ्यायची असते. या सृष्टीच्या चराचरांत
नांदणारी मानवी सृष्टी व मानवेतर सृष्टीचे साहचर्यबंध प्रकट करणे हेच भाषा, कला, साहित्य,
इतिहास, संस्कृतीचे एकमेव प्रयोजन असते. ज्या कला व साहित्यात मानवाचे वृक्षवल्लीशी
नाते नाकारले जाते. जीवनातल्या दुःखाशी नाते तोडले जाते. भूमीच्या सृजनाशी रक्तसंबंध
नाकारला जातो; ती कला असो की साहित्य असो, समकाळात जगणार्या माणसांच्या सुखसमृद्धीलाच
अशा न-नैतिक साहित्यनिर्मिती आणि अनैतिक कलांचा विरोध असतो. असे साहित्य वास्तव असले
तरी सम्यक वास्तवाशी नाते नाकारून, स्वांतःसुखाय कोलाहलातच जीवनाचे स्वर हरवलेले असतात.
सतारीचे बोलांचा बिघाड उत्पन्न करणार्या कला, संगीताचे ते व्यावसायिक ध्वनी व शब्द
असतात. थोर लेखक-कवी बाबुराव बागुलांनी वेदांच्या आधी तू होतास...या कवितेतून ही जाणीव
करून दिलीच आहे. माणूस सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या अंतःकरणात विधायक सौंदर्यऊर्जा दडलेली
आहे. वेदांच्याही आधी आणि नंतरही तोच आज युगांतरातही जिवंत आहे. खरेतर माणसाला माणूसच
कळत नाही. तो कळला तर ह्या जगाच्या कल्याणाचा मार्गही मोकळा होईल.
वेदाआधी तू होतास!
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास
पंचमहाभूतांचे पाहून विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ऋचा...
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस...
हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले...
हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्वकाही
तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही...
-कवी बाबुराव बागुल
( वेदाआधी तू होतास 2004, या कविता संग्रहातून...)
हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्वकाही
माणूस जिथे जिथे गौण मानला गेला, तिथे तिथे दहशत, भीती, विद्रोह,
सशस्त्र क्रांती, युद्ध, लढे, एल्गार, जिहाद पुकारला गेला. समानता आणि माणुसकी ही जन्मतःच
माणसाला मिळालेले वरदान आहे. हे वरदान आपण कसे आणि कुणासाठी वापरतो? यावरच व्यक्ती
ते समष्टीचे नाते आशादायी आणि फलदायी ठरल्याचा इतिहास आहे. माणसाला माणसाचा दर्जा देऊन,
आपणही त्याच्याचसारखे एक सर्वसामान्य जितेजागते माणूस आहोत, ही थोर भावनाच कलेच्या
सृजनाचे उगमस्थान असते.
मराठीतही राष्ट्रीय चारित्र्यनिर्मितीला हातभार लावणारी ग्रंथसंपदा
थोरामोठ्यांनी निर्माण करून ठेवलीच आहे. मराठी रसिकांनी सतत अक्षरसृजनयात्रेत सहभागी
होऊन, आपल्या आणि भोवतालातल्या मानवी समाजाला सुसंस्कृत करण्याचे सांस्कृतिक कार्य
करायला हवे. उत्तमोत्तम ग्रंथ समाजात प्रसारित करून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या
अभिरूची संवर्धनाचे श्रेष्ठ कार्य करायला हवे. आजच्या पतनशील वाङ्मयीन परंपरेत चांगल्या
संस्कारशील साहित्याची निर्मिती जणू थांबली की काय? असे वाटायला खूप जागा आहे. शेवटी
आपल्या भाषा, वाङ्मय, संस्कृती, अभिरुची संवर्धनातील त्रुटी आणि दोष जाणवायला लागले
की वेळीच त्याचा बंदोबस्त करणेही रसिक आणि कृतज्ञ समाजाचे उत्तरदायित्व असते. ते पार
पाडले तर नव्या पिढीसमोर आदर्श साहित्याचे वस्तुपाठ ठेवता येतात. तेच जर दुर्लक्षित
केले तर नव्या पिढीच्या बौद्धिक व सांस्कृतिक वाढीच्या सर्वच दिशा अंधारण्याची दाट
शक्यता असते.
तात्पर्य, माणूस हेच तत्त्वज्ञान आणि कला वाङ्मयाचे केंद्रवर्ती तत्त्व
असते. मानवी जगासह व्यक्ती ते समष्टीच्या एकात्मतेचेही ते सौहार्दसूत्र असते. हे प्रतिभावान
माणसा, तूच आहेस सर्वकाही; तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही......हेच व्यक्ती ते
समष्टीच्या आकलनाचे प्रातिभ प्रमेय होय. हेच प्रमेय प्रत्येक प्रतिभावंत लेखकाचे चिंतनकेंद्र
असायला हवे. प्रेम व करुणेने सृष्टीचा परिघ व्यापता यायला हवा. तेव्हाच श्रेष्ठ कलाकृतीचाही
उदय होतो. प्रत्येक माणसाच्या आत विधायक ऊर्जा असलेला एक सशक्त माणूस असतो. त्याला
अस्तित्वाची आणि अस्मितेची जाणीव फक्त करून द्यायची व घ्यायची असते. प्रतिभावंताला
जर माणूस कळला तर अक्षर सृजनाच्याही दिशा मोकळ्या होतील...
सांस्कृतिक महाविनाशाचा समकाल
समकाळात कोण विचारवंत? कोण पुरोगामी? कोण निष्ठावंत? कोण प्रतिभावंत?
कोण सामाजिक कार्यकर्ता? कोण सुधारक? कोण लेखक? कोण सालोमालो? कोण खरा आणि कोण खोटा?
ह्या सर्वच श्रेणींचे विघटन झाल्याचे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही. गेल्या तीस-चाळीस
वर्षांत तर महाराष्ट्रासह सबंध देशात आणि सबंध जगातच विचारांची आणि माणुसकीची पिछेहाट
झालेली दिसते. सार्वत्रिक मूल्यात्मक आणि विचारात्मक पतनामुळे जगभर भय आणि भीतीचे सावट
पसरलेले आहे. धर्मांधता आणि उन्मादाच्या भयाने सबंध जग आज अस्वस्थ वर्तमान बनले आहे.
व्यवस्थेच्या खोलात, तळाशी आणि मुळाशी कुणालाच जायचे नाही. आजचा दिवस जगून उद्याची
चिंता करायची नाही. ही क्षणभंगुरता आजच्या युगातील मानवी जगण्याचा विशेष बनली आहे.
खरेतर हे सर्वकाही रोखण्याचे सामर्थ्य असलेल्या प्रतिभाच आज लोप पावल्या आहेत.
खरेतर आजचा समकाल हा युगांतराचा किंवा मानवी जीवनात कल्याणकारी परिवर्तन
करण्याचा राहिलेलाच नाही की काय? अशीही शंका येते. भाषा, वाङ्मय, संस्कृतीसह मानवाच्या
सांस्कृतिक महाविनाशाचाच हा समकाळ आहे. याला केवळ बुद्धिवादी आणि विकाऊ प्रतिभावंतच
जबाबदार आहेत. प्रतिभावंताला नैतिकतेचे बळ असल्याशिवाय तो समाजासाठी सृजन करू शकत नाही.
आजची नैतिकता दिखाऊ-विकाऊ आहे. प्रतिभा खोटी-ननैतिक आहे. युगलेखकाची उजळ प्रतिमा हीच
खरेतर प्रतिभावंतांच्या नैतिकतेचे आणि सृजनाचे वैभव असते. आज हे सर्वकाही आपण गमावून
बसलो आहोत. आमचे सांस्कृतिक विश्व सांस्कृतिक कारागिरीची निर्मितीकेंद्रे बनली आहेत.
मठबाजी, अहंकारात आणि सन्मानहौसेत प्रतिभावंत रत आहेत. कुणालाही समाजाविषयी काही घेणेदेणे
उरलेले दिसत नाही.
उद्याच्या सांस्कृतिक जगाची ग्लोबल बाजारपेठ बनण्याचीही जोरात तयारी
सुरू आहे. खरेतर हे सांस्कृतिक सन्मानहौसेचे गुपित कुणालाही कळणारच नाही! ओळखताच येणार
नाही! इतके ते असत्याच्या मुखवट्याशी एकजीव झालेले आहे. आपल्यालासह सर्वहारा समाजाच्या
व्यापक हितांचे कार्य तळमळीने करणार्यांना हे सांस्कृतिक पतन कसे थांबवता येईल? हाच
गुंता आधी सोडवावा लागणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिजात मराठीपेक्षाही हे
व्यापक समूहजीवनाच्या सौहार्दासाठी आवश्यक आहे. प्रश्नांचा अग्रक्रम हा दिशाभूल करणारा
असतो. हेही आपण जाणले पाहिजे.
भारतीय शेतकर्यांच्या आत्महत्या : महाराष्ट्र आघाडीवर
17 वर्षांत तीन लाख शेतकर्यांनी;
कर्जाचा डोंगर, गरिबी, नैसर्गिक संकटे, दारिद्य्र यामुळे आत्महत्या केल्या. सन्
1995 ते 2011 पर्यंत 17 वर्षांत शेतकरी, शेतमजूर आणि शेतीच्या व्यवसायाशी निगडित असणार्या
दोन लाख नव्वद हजार सातशे चाळीस शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची नोंद,
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनं वार्षिक अहवालात दिल्याची माहिती, तत्कालीन केंद्रिय
कृषिमंत्री हरीश रावत यांनी राज्यसभेत दिली होती. (महाराष्ट्र टाईम्स्, नागपूर, दि.
1 सप्टेंबर 2012)
सन् 1995 ते 2016 पर्यंत एकूण 22 वर्षांत भारतातील एकूण 3,33,398
शेतकरी-शेतमजूरांनी आत्महत्या केल्या. याचाच अर्थ दरवर्षी सरासरीने भारतात 15,155 शेतकरी
व शेतमजूर आत्महत्या करून भूमीवर सृजनाचे कष्ट करणारं जीवन संपवतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स
ब्युरोनं वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. अर्थातच ही सरकारी आकडेवारी आहे. ती
पुरेशी विश्वसनीय कुणीही मानत नाही. नेटवर
श्री मुजफ्फर हुसेन या अभ्यासकाने सर्वेक्षण केल्यानुसार 1995 ते 2011 पर्यंत भारतात
एकूण 7,50,860 शेतकरी व शेतमजूरांनी आत्महत्या केल्याची माहिती दिलेली आहे. पैकी एकट्या
सधन व विकसित शेती असणार्या महाराष्ट्रात याच काळात एकूण 50,860 शेतकर्यांनी आत्महत्या
केल्या. अनुक्र्रमे महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश मध्ये सर्वाधिक जास्त
शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नंतरच कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ
मध्ये परिस्थिती बिकट होत गेली. अभ्यासकाच्या
मते, “प्रत्येक किसान समय पर अपना कर्ज खत्म करने का प्रयास करता है, किंतु फसलों की
बर्बादी से वह ऐसा नही कर पाता है। इस चिंता में वह भीतर से टूट जाता है और अंततः आत्महत्या का मार्ग चुन लेता है। कृषक बंधु अब खेती को घाटे
का धंदा मानते हैं। इसलिए उनकी आने वाली पीढी अपने मां-बाप की तरह कर्ज में न तो मरना
चाहती हैं और न ही आत्महत्या करना चाहती है।’’ खरेतर भविष्यातील जगबुडीची ही सूचनाही
आहे.
जगात इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूरांनी आत्महत्या करणारा
कृषिप्रधान भारत हा पहिलाच देश होय. सरकार कुणीही असो, मुळांपासूनच इथल्या शेतकर्यांच्या
समस्यांचे व शेतीचे नियोजन कालानुसार काळजीपूर्वक केले असते तर आज शेती आणि गावं उजाड
माळरानं झाली नसती. सरकार कोणतेही असो, मतांची बँक व सत्ता टिकवण्यातच माहीर असते.
सरकार शहरात राहते. शहराच्या विकासाकडे लक्ष दिले जाते. शेतकरी बिचारा असंघटित. निरक्षर,
अडाणी, खेडूत, कंगाल, निर्धन, निराश, समस्याग्रस्त. त्याच्याकडे सरकारचे लक्षच नसते.
लक्ष देण्यापेक्षा शेतकर्यांच्या आरत्या ओवाळण्यातच प्रत्येक सरकार धन्यता मानते.
खेड्यातील मतदारांचा कौल मात्र हमखास प्राप्त करण्याची शैली सरकारला अवगत असते.
शेतकरी आत्महत्या का करतात?
भारतात शेतीवर आधारित लोकसंख्या 70 टक्के असून, त्यापैकी एकूण
11.2% पेक्षाही अधिक शेतकरी व शेतमजूरांनी आत्महत्या केल्याचे नॅशनल क्राईम ब्यूरोनेच
सांगितले आहे.
मुक्त ज्ञानकोश विकिपीडियानुसार भारतात शेतकर्यांच्या आत्महत्यांची
स्थिती1990 नंतर निर्माण झाली. कारणे देताना-
1. भारतीय शेती मान्सूनवर निर्भर
आहे. मान्सून नियमित नसल्यामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकर्यांच्या आर्थिक
विघटनाला जबाबदार आहे.
2. खरिप व रब्बी अशी दोन्ही
पिके नष्ट होतात. दुबार पेरणी व अस्मानी सुलतानी संकटांमुळे शेतकर्यांना आर्थिक दिवाळखोरीवर नियंत्रण ठेवता
येत नाही.
3. कर्जबाजारीपणाचे दडपण व
भार मोठा असतो. पहाडाएवढ्या कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबून जातो. त्याला कर्जबोजा
उतरवण्याचे मार्गच सापडत नाहीत.
4. सावकार, बँका, मध्यस्त-दलाल
यांच्या शोषणचक्रातून शेतकर्याला मुक्त होता येत नाही.
5. कौटुंबिक कारणे, जबाबदार्या,
शिक्षण, मुलींची लग्ने, निराशा-वैफल्यामुळे लागलेली व्यसनाधिनता आदींसाठी कर्ज घ्यावे
लागते व नंतर तेही फेडता येत नाही.
4. कृषी मालाला किंमत मिळत
नाही. लागत खर्च वसूल होत नाही. शेवटी शेती हा कायम घाट्याचा सौदा ठरतो. कवडी मोलाने
पडत्या किंमतीत हंगामात कृषिमालाची विक्री करणे भाग पडते.
अशी
अनेक कारणे आहेत. शेतकर्यांचा स्वाभिमान, सज्जनपणा, प्रामाणिकपणा बरेचदा त्याला आत्महत्या
करायला प्रवृत्त करतो. या महाभयानक आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात सापडल्यामुळे, शेतकर्याला
आत्महत्या हाच मुक्तीचा अंतिम मार्ग असल्याचे जाणवताच तो कंटाळून आपल्याच शेतात आपला
जीव देतो.
शेतकर्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र आघाडीवर का?
सर्वप्रथम महाराष्ट्रातून शेतकर्यांच्या आत्महत्या होऊ लागल्या.
त्याचे लोण देशभर पसरले. नंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगढ
याही प्रदेशांसह सन् 2009 मध्ये तर एकूणच 17,368 शेतकर्यांनी देशभरात आत्महत्या केल्या.
पैकी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या 5 राज्यात 17,368
पैकी 10,765 म्हणजेच एकूण देशातील आत्महत्यांच्या तुलनेत 62 % आत्महत्या नोंदवल्या
गेल्या. हे सरकारी आकडे आहेत. खरेतर 1995 ते 2011 या 17 वर्षांतच एकूण 7,50,860 शेतकर्यांनी
आत्महत्या केल्याची नोंद आहे. याच दरम्यान सधन व विकसित गणल्या गेलेल्या महाराष्ट्रात
ह्याच काळात 50,860 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. 2004 नंतर एकूणच देशातील कृषी व
कृषी आधारित लोकांचे जीवनमान खालावत गेले. शेतीमुळे कंगाली बकाली आली. 2001 च्या भारतीय
जनगणनेनुसार शेतकर्यांची संख्याच रोडावली. 1990 ते 2000 च्या काळात 70,00,000 शेतकर्यांनी
शेतीचा व्यवसाय बंद करून, उदरनिर्वाहाची पर्यायी साधने शोधली. दरवर्षी दर महिन्याला
देशात 70 च्या वर शेतकरी आत्महत्या करू लागले. ही संख्या 2001 नंतर झपाट्याने वाढत
आहे.
विद्यमान केंद्रिय कृषी मंत्री मा. राधा मोहन सिंग यांनी (एन. सी.
आर. बी. च्या रिपोर्टनुसार) दिलेल्या माहितीप्रमाणे 2015 मध्ये 12,602 तर 2016 मध्ये
11,370 म्हणजेच 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये आत्महत्या 9.77% कमी झाल्याचे मंत्री महोदयांनी
सांगितले. महाराष्ट्रात 2016 मध्येही सर्वाधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचेही कबूल
केले.
2018 मध्ये मार्च ते मे पर्यंत या तीनच महिन्यात महाराष्ट्रात
600 पेक्षा अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या कृषी
मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी नागपूरच्या विधान सभेत दिली. पैकी 122 शेतकर्यांच्या
कुटुंबियांना सरकारी मदतीस पात्र ठरवले तर 329 कुटुंबियांच्या केसेस धूळ खात पडल्या
आहेत. अर्थातच हे सरकारचे मदतीचे चित्र समर्थनीय नाही. नियोजनबद्धपणे व प्रामाणिकपणे
शेतकर्यांप्रती उत्तरदायित्व मानून सरकारने प्रयत्न करायला हवे. शेतकर्यांच्या निर्धनपणाला
सधनपणाचा आर्थिक स्तर चढवत नाही तोपर्यंत तरी केवळ पॅकेजसच्या भरवशावर भारतासह महाराष्ट्रातील
शेतीचे दिवाळखोरी व कंगालीच्या उधळीने नष्ट होणारे अर्थ-व्यवस्थापन व अर्थ-नियोजन यशस्वी
होणार नाही. सोबतच, कर्ज न काढता कालांतरानुसार शेतीत नवीन तंत्रज्ञान व प्रयोग स्वतःच्याच
भरवशावर करण्यासाठी शेतकरी पात्र होणार नाही, तोपर्यंत तरी जगबुडीला पर्याय नाही.
भारतीय लोकसंख्येच्या वाढीचा
भस्मासूर व शेतीचे उजाडलेपण
30 ऑक्टोबर 2018 रोजी नेटवरील अपडेटनुसार भारतातील एकूण लोकसंख्या
135 कोटी 90 लाख 20 हजार 756 इतकी होती. जगातील लोकसंख्येपैकी 17.74% लोक एकट्या भारतात
राहतात. भारत लोकसंख्येच्या बाबतीत वर्तमानात दुसर्या क्रमांकावर आहे. सन् 2050 पर्यंत
भारताची लोकसंख्या अंदाजे 166 कोटी पर्यंत वाढून, चीनलाही मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक
लोकसंख्येचा देश होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे.
भारतातील लोकसंख्येपैकी 2018 मध्ये केवळ 27.8% लोक असून 5480 शहरे
व महानगरात राहतात तर 72.2% लोक 6,38,000 खेड्यात राहतात. भारतासारख्या कृषिप्रधान
व उद्योगप्रधान देशात सन् 2018 मध्येही जवळपास 2 कोटी लोक दररोजच उपाशी असतात. त्यांना
दोनवेळचं अन्नही मिळत नाही. गेल्या तीन वर्षांत जवळपास 60,000 शेतकर्यांनी भारतात
आत्महत्या केल्या आहेत. सरासरी दरवर्षी 20,000 शेतकरी व शेतमजूर आत्महत्या करतात. नव्या-जुन्या
पिढीने शेतीचा व्यवसायच बंद केला आहे. 70,00,000 शेतकर्यांनी शेती करणे बंद करून शेतजमिनी
विकून नव्या पिढीच्या शिकल्यासवरलेल्या मुलांना शहरी स्थिरस्थावर केले आहे. काहींनी
शहरं गाठली तर काही अजूनही गावात पोटापुरती शेती करतात. अपयश आलं की आत्महत्या करून
मुक्त होतात.
मढे झांकुनिया करिती पेरणी...
मढे झांकुनिया करिती पेरणी॥ कुणबियांचे वाणी लवलाहे॥ घरातलं मढं झाकून पेरणी करणार्या सृष्टीच्या पोशिंद्याला
स्वदेहाचं मढं का करावं लागतं?याविषयी कुणीही विचार करीत नाही. संवेदनबधीरताच आली आहे.
भारतात 1990 हे गृहीत वर्ष मानून आत्महत्यांची प्रारंभावस्था मानली जाते. सन् 1984-85
मध्ये वर्धा जिल्ह्यातील साहेबराव पाटलानं दत्तपूर ग्रामी दोन मुलं, पत्नी अशा अख्या
कुटुंबासह किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. सबंध महाराष्ट्राला हादरा देणारी ही
घटना गांधी जिल्ह्यात घडली. शेतीला व कर्जाला कंटाळून केलेली संपूर्ण कुटुंबियांची
अंगावर शहारे आणणारी पहिली कौटुंबिक आत्महत्या महाराष्ट्राला हादरवणारी होती. कवी विठ्ठल
वाघांनी साहेबराव पाटील याच शीर्षकाची कविता लिहून, शेतकर्यांच्या आत्महत्येची नोंद
मराठी साहित्यात केली.
खरं म्हनजे साहेबराव तुया आत्महत्या केलीच नाही
आमीच तुहा खून केला...तुहा अन् तुह्या बायकोपोराईचाही
तुहं सरन पेटल्यावर मसनात एक म्हतारा सांगत होता-
आता कापूसजवारी पेरसान त लेकहो हराममौतीनं मरसान
आता पेरा तासातासानं लोखंडी दगळी गोटे
चारी मेरीनं बाभुईचे खम्मन काटे...
...तू मले माफ करू नको-कधीच माफ करू नको साहेबराव
!
समाजानं आणि साहित्यवर्तुळानं वाङ्मयीन चर्चा केली. शेतकरी चळवळीनं
आणि सरकारनंही ह्या घटनेकडे गंभीरपणे पाहिलं नाही. पेल्यातलं वादळ पेल्यातच जिरलं.
कविता-कथा-कादंबरीची तरफदारी करणारे सांस्कृतिक गटतट साहित्यकृतीतून मांडलेल्या जिवंत
सामजिक प्रश्नांचं आंदोलन का करीत नाहीत? लेखक-कवी कृतिशील का होत नाहीत? वाङ्मयीन
संस्कृतीनं, सामाजिक बांधिलकी आणि पुरोगामित्व जपणार्या सांस्कृतिक धुरिणांनी असे
अनेक प्रश्न सोडविल्याशिवाय साहित्यकृतीची सामाजिकताही सिद्ध करता येणार नाही.
शेवटी, आम्ही जलमलो मातीत, किती होणार गा माती! खापराच्या दिव्यात
या कधी पेटणार वाती? शेतकर्यांनी आपुलाचि वाद आपणाशी करून, आपले प्रश्न सोडविण्याचाच
खरंतर हा वर्तमान काळ आहे. जगाचं भविष्य असणार्या शेतकर्याचं वर्तमान ज्या देशात
काळवंडलं जातं, त्या देशात खरंच सोन्याचा धूर निघत होता काय? जिकडे तिकडे चोहीकडे हिरवेगार
गालीचे आमच्या शेतीवाडीचे! असं चित्रण केलं जायचं ते खरं होतं काय? असे कितीतरी प्रश्न
आपणच आपल्याला विचारले पाहिजेत.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाचं भयावह वास्तव दुसर्या दशकाच्या
प्रारंभातच मानवी जीवनाला उधळी लावेल, असं कुणालाही वाटलं नाही. पण एकूणच जगातल्या
सर्वहारा माणसांच्या जीवनालाच आता उधळी लागलेली आहे. पिपात मेले ओल्या उंदिरासारखी
स्थिती आज जगात सर्वत्र दिसून येते. मर्ढेकरांचा गणपत वाणी बापुडा बिडी पितांना मरून
गेला. एक मागता डोळे दोन, देव देतसे जन्मांधाला...सर्वहारा शेतकर्यांचा आणि शोषित
वर्गाचा सखासोबती असलेला भुवैकुंठीचा विठू आणि रखुमाई सुद्धा एकविसाव्या शतकात विठ्ठलाच्या
पायी थरारली विट, म्हणून आपल्या वारकरी-शेतकरी बांधवांना सोडून निघून गेले की काय?
असे अनेक प्रश्न आता पडायला लागले आहेत.
शेतकर्यांच्या आत्महत्या आणि नव्या पिढीचा अघोषित संप
आपल्या शेतकर्यांच्या पुढच्या पिढीने पुकारलेला अघोषित संप देशाला
अंधाराकडे घेऊन जाणारा असेल...शनिवार, दि. 18 फेब्रुवारी 2017 च्या लोकसत्तातील संपादकीय
अग्रलेखातून जगाला धोक्याचा गंभीर इशारा संपादकानं दिला. शरद जोशी यांनी महाराष्ट्रातील
कृषी जीवनात शेतकरी संघटेचे क्रांतिपर्व निर्माण केले. पहिल्यांदा शेतकर्यांच्या आंदोलनाची
क्रांतिकारी ऊर्जा महाराष्ट्राच्या भूमीवर निर्मून, पुढे गल्ली ते दिल्लीपर्यंत अनेक
वर्षे जागती ठेवली. शेतीचे कायदे आणि शेतीची सबंध व्यवस्थाच सरकार नियंत्रित करीत असल्यामुळे,
भारतीय शेतीवरील सर्वच जाचक कायदे-बंधने हटवून शेती पूर्णपणे मुक्त केल्यानेच ती जागतिकीकरणाच्या
रेट्यात टिकू शकेल; असा आग्रह शरद जोशींनी केला होता. शेतकरी संघटना आणि महेन्द्र टिकैत यांच्या किसान
आंदोलनासह; शरद जोशींच्याही क्रांतिकारक विचारांना-चळवळीला तिलांजली देण्याचे राजकीय
डावपेच यशस्वी झाल्यामुळे; भारतीय शेतकर्यांच्या जीवनातील एकमेव आशेचीही ज्योत मालवली
गेली.
शेतकर्यांची व्होट-बँक देशातील मोठी व्होट-बँक असल्यामुळे, पॅकेजच्या
भूलथापांनी भारतीय शेती कायमच डायलिसिसवर राहिली. कृषी-कृषकांचे अर्थशास्त्र अधिकाधिक
बिघडतच गेले. भूसंपादन कायदे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राबवून, सेझ-कल्चर सरकारनेच अस्तित्वात
आणले. सक्तीने शेतजमिनी बळकावून शेतकर्यांना भूमी-निकाला केले. दुःखमुक्तीची मृत्यू-सेज
बहाल केली. शेतीच्या बुडित व्यवसायात नवीन पिढीने येऊ नये म्हणून, शेतकर्यांनी आपली
मुले शहरात शिकवून-शहरी नोकरीपेशात रुजवून-प्रसंगी शेतजमिनी विकून, नव्या पिढीचे शेती
कसण्याचे सर्वच रस्ते बंद करून टाकले. ही सर्व भूमीची दुर्दैवी, अमानुष मशागत गेल्या
तीस-चाळीस वर्षांपासून आपल्या देशात सुरू असल्यामुळे; भारतीय जुन्या पिढीतील मायबाप
शेतकरी मोठ्याप्रमाणावर आत्महत्या करू लागले. नव्या पिढीने शेतीविरूद्ध अघोषित संप
पुकारून, पांढरपेशा समाजात आपलं जगणं सुकर करून घेतलं. शरद जोशींच्याही नंतर शेतकरी
चळवळ काही काळ थंडावली. पुन्हा नव्या जोमाने अमर हबीब, विजय जांवधीया, गंगाधर मुटे,
शेषराव मोहिते, चंद्रकांत वानखेडे, विजय विल्हेकर व अन्यही भागातील शेतकरी आंदोलनाचे
नेतृत्व करणार्यांच्या पुढाकाराने व समर्थ नेतृत्वाने पुढे नेली. मराठवाड्यात तर अमर
हबीब यांचे शेतकरी आंदोलनाचे कार्य एकूणच चळवळीला दिशा देणारे आहे.
डोकेफूट प्रबोधनाने कोणत्याही क्रांतिच्या शक्यताच कधी निर्माण होताना
दिसणार नाहीत; अशीच गोळीबंद व्यवस्था बुर्ज्वा सुखवस्तू व्यवस्थाप्रिय बुद्धिवाद्यांनी-भांडवलदारांनी-सत्तापटूंनी
रुजवत आणल्याच आहेत. जगभर महाविनाशाचे हादरे बसत असतानाही आपण कसे शांत-स्वस्थच आहोत...मनातल्या
सुखवस्तू तलावात सारंकसं सामसूमच आहे...आपलं कशाशीच काही घेणंदेणं राह्यलं नाहीय. आपण
आणि आपला परिवार भला...पण, हे त्रिकालाबाधित सत्य नाहीच. ही मानसिकता क्षणकालातच नेस्तनाबूत
होण्याची दुःचिन्हे ठळकपणे जगभर दिसू लागली आहेत. जगबुडीत जगच बुडते. तेव्हा बुडत्याचे
पाय डोहाकडेच असतात...कुणीही वाचवायला मागंच उरणार नाही...
सांस्कृतिक विश्व, समाज व संघटना काय करीत आहेत?
जगातील तमाम बुद्धिवंत, शास्त्रज्ञ, उद्योजक, कलावंत, साहित्यिक संपावर
गेले तर या जगाचे काय होईल?...काहीही होणार नाही. परंतु शेतकरी जर संपावर गेले तर मात्र
जगबुडी जरूर होईल! लोकप्रिय तत्त्ववेत्त्या आयन रँड यांनी ङ्कअॅटलास श्रग्डङ्ख या
1957 साली लिहिलेल्या फॅन्टसी नॉव्हेलमधून
जगाला धोक्याची सूचना दिली आहे. ङ्ग जगामध्ये संपत्ती निर्माण करणारी, समृद्धी
आणणारी, जगाला पोसणारी ही माणसे; एका क्षणी ठरवतात की, आता खूप झाले. यापुढे जगाला
आपल्या खांद्यावरून नाही वाहून न्यायचे. एकेक करून ते सारे आपले काम बंद करतात. एकमेकांवर
जगणार्या बांडगुळांप्रमाणे जगणार्या माणसांना लाथाडून दूर कुठे तरी निर्जन बेटावर
निघून जातात...आणि सारे जग अंधारात बुडते.ङ्खङ्ख या सत्याच्या जवळच आपण पोहोचलो आहोत.
समाज, शासन आणि सांस्कृतिक क्षेत्रांत कृषिजगताकडे कसे पाहिले जाते?
याचा आत्मशोध घेतला की मुख्यत्वे ग्रामीण साहित्यातून गावगाड्याचे आणि शेतकर्यांचे
जीवन-वास्तव मांडण्याचा प्रयत्न खूप आधीपासूनच झालाय. शेतकर्यांची भाषा, शेती, हालअपेष्टा,
जीवन जगण्याची निसर्गशैली आदींचे चित्रण आभासी परंतु मनोरंजनाच्या पातळीवर सुरूवातीला
झाले, हेही खरे आहे. शेतकर्यांच्या जीवन शैलीला-जगण्याच्या बोलीभाषेला नागरी लोक हसून
भाषेची खिल्ली उडवतात, हेही खरे आहे. बोली भाषेतील ग्रामीण अस्सल अनुभवनिष्ठ साहित्य
हे विनोदी साहित्याच्या अंगाने पाहिले गेले, हेही खरे आहे. साठोत्तरी कालखंडात मात्र
ग्रामीण साहित्यातून गावगाड्याच्या अवकळाग्रस्त जीवन जाणिवांची वास्तवाभिमुख अभिव्यक्ती
झाली, हेही खरे आहे. कवी विठ्ठल वाघांची शेतकरी दिंडी, साहेबराव पाटील ही शेतकर्यांच्या
आत्महत्येची परखड मीमांसा करणारी कविता; हे साहित्यातील परिवर्तनाचे तरंग लक्षात घेतले
की; सबंध महाराष्ट्रातून साठोत्तरी काळात लिहित्या पिढीने, ग्रामीण साहित्याची परिमाणे
बदलत्या वास्तवानुसार समाजमनात पेरण्याची मौलिक कामगिरी केल्याचेही सत्य नाकारता येणार
नाही.
साठोत्तरी कालखंडात उद्धव शेळके, रा. रं. बोराडे, आनंद यादव, कवी
ना. धों. महानोर, कवी विठ्ठल वाघ, शंकर बढे, इंद्रजीत भालेराव, बाबाराव मुसळे, सदानंद
देशमुख, शेषराव मोहिते, भास्कर चंदनशीव, भारत काळे तसेच कवी श्रीकांत देशमुख, कवी प्रकाश
होळकर, कवी संतोष पद्माकर पवार, कवी शशिकांत शिंदे, कवी सुरेश शिंदे, कवी जगदीश कदम,
कवी जयराम खेडेकर, कवी दगडू लोमटे, कवी भास्कर बढे, श्रीराम गव्हाणे, प्रकाश किनगावकर,
ऐश्वर्य पाटेकर, विनायक येवले, कवी गणेश मरकड, कवी रमेश चिल्ले, केशव वसेकर, कैलास
दौंड, सुचिता खल्लाळ, रावसाहेब कुंवर व इतरही अनेक नव्या पिढीच्याही कवी-लेखकांनी शेतकर्यांच्या
वर्तमान हलाखीविरूद्ध आपल्या लेखनातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण
साहित्यातील एकूणच नवी पिढी शेतकर्यांच्या घरातून शहरात आल्यावर, त्यांनी आपल्या साहित्यातून
आपल्या काबाडकष्ट करणार्या मायबापांचे व गावगाड्यातील बकालीचे प्रश्न ऐरणीवर मांडले
आहेत. काही मोजक्या खुद्द शेती कसणार्या साहित्यिकांनी मात्र शेतकर्यांच्या जीवनाची
वाताहत-आत्महत्या-दुष्काळ-शेतीचे बुडीत अर्थशास्त्र-जातवास्तव-गावठी राजकारण आदींच्या
अंगाने शेतकर्यांचे व गावगाड्याचे जीवन-वास्तव आपल्या सृजनशील साहित्यातून मांडल्याचेही
दिसते.
साहित्यसृजनाने आंदोलन उभारून, शेतकर्यांच्या हालअपेष्टा दूर केल्याचे
एकही उदाहरण आधुनिक मराठी साहित्याच्या इतिहासात तरी आजवर घडल्याचे दिसत नाही. शरद
जोशींच्या शेतकरी संघटनेने जी काही क्रांती महाराष्ट्राच्या शेती जीवनात मधल्या काळात
घडवून आणली, त्याचेच पडसाद आजही पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्यांच्या संप, रास्ता रोको,
उठावातून आजही दिसून येतात. तेवढाच केवळ एक अपवाद आहे. बाकी तर, सारं कसं सामसूम तरंग
नाही तलावात, वळं कलंडती असे कुठे गेले झंझावात...अळीमिळी गुपचिळी जगन्याची रीत झाली,
निंघे अर्थाचं दिवायं शब्दाची तं पत गेली...हेही सांस्कृतिक वास्तव-समाज वास्तव-शासन
वास्तव कवी वाघांनी मांडलेच आहे.
जगभर गांधींचे तीन बंदर कार्यरत
जगातल्या तमाम समस्यांकडे दुर्लक्ष झाले तरी त्यामुळे जगबुडी होणार
नाही. परंतु शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र जर असेच अखंड-अविरत सुरू राहिले, तर
या सृष्टीला जन्माला घालणारे-सृष्टीचे पालनपोषण करणारे लोकच ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये
माणसांना जन्माला घालण्यासाठीही भविष्यात शेष उरणार नाहीत. मायबापच नसले तर माणसांच्या
सृष्टीची उत्पत्ती तरी कशी होईल? त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न तरी कसे सुटतील? हाच
खरेतर ह्या वर्तमानाला गिळंकृत करणारा एकमेव कळीचा मुद्दा आहे...
मुख्य मुद्दा हा आहे की, संतप्रवृत्तीने जगासाठी जगणार्या सृष्टीच्या
पालनहार्याविषयीचा खोलवरचा करुणाभाव-कर्तृत्वभाव-जग्गदाताभाव एकूणच सृष्टीला जगवणार्या
व्यवस्थेला कितपत जाणवला आहे? याचाच खरेतर शोध घेण्याची गरज आहे. असेही लक्षात येते
की, जगात शेतकर्यांविषयी केवळ कोरडी सहानुभूतीच शेष आहे. गांधीजींच्या तीन बंदराची
अवस्था जगभर दिसते आहे. शेतकर्यांविषयी काहीही बोलायचं नाही! शेतकर्यांच्या बुडीत
जगाविषयी काहीही ऐकायचे नाही! मृत्युपंथाला कवटाळणार्या शेतकर्यांची मढीही पाहायची
नाहीत! समाज, शासन, साहित्य, संघटना अशा सर्वच स्तरांवर गांधीजींचे तीन बंदर सृष्टीच्या
तारणहार्याला केवळ वाकुल्या दाखवीत आहेत. मित्रहो, इतकी उदासिनता असेल, आपल्याच जन्मदात्याकडे
पाहण्याची, तर या नव्या ग्लोबल व्हिलेजला नक्कीच भवितव्य नाही...
अच्छे दिन-मेक इन इंडिया-स्मार्ट भारत-स्वच्छ भारत केव्हा?
मेक इन इंडिया! स्वच्छ भारत, तेव्हाच निर्माण होईल; जेव्हा स्वच्छ-निकोप
दृष्टीने भारतीय शेतकर्यांच्या अवकळेचा कलंक समूळ पुसला जाईल!...हे करायचे की नाही?
याचाच विचार करण्याचे हे युग आहे...अर्थातच, जगबुडीची नांदी तर आपल्या शेतकर्यांच्या
पुढच्या पिढीने पुकारलेल्या अघोषित संपामुळे, देशाला अंधाराकडे घेऊन जाण्याची तीव्र
चाहूल तर महाराष्ट्रातल्याच मराठवाड्यातील शेतकर्यांनी दिलीच आहे!... या निमित्ताने
तरी समाज जागरण होईल. समाज आणि शासनाची कुंठितावस्था दूर होईल. ती झालीच तर मात्र,
आपल्या कृषिप्रधान देशाला आणि कृषीवलांची काळजी घेणार्या समाज-शासन-सांस्कृतिक व्यवस्थेलाही
भवितव्य राहणार आहे!..
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या
विचारपीठावरून...
नरखेडच्या चौथ्या जनसाहित्य संमेलनाच्या (1998) आणि नाशिक जिल्ह्यातील
तारुखेडले येथे संपन्न झालेल्या तिसर्या भटक्याविमुक्तांच्या साहित्य संमेलनाच्या
(2001), सन् 2012 मध्ये गोंदियात संपन्न झालेल्या 62 व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या,
राजूरा येथील दुसर्या राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलनाच्या (2016), अकोल्याच्या
35 व्या राज्यस्तरीय रजधूळ साहित्य संमेलनाच्या (2018) अध्यक्षपदावरून; सृष्टीचा पालनहारा
असलेला शेतकरी मृत्युपंथ का स्वीकारतो? जगाची पोटभूक शमविणार्या सृष्टीच्या निर्मात्याला
आयुष्यभर फाटक्या चिंध्या पांघरून उपाशी का मरावं लागतं? कृषिप्रधान भारत देशात शेतीच्या
व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देवून, सरकार त्यांचे प्रश्न निकालात का काढत नाही? असे
अनेक प्रश्न मांडले होते.
आज पुन्हा 20 वर्षांनी हेच अजूनही न सुटलेले दुःखकोडे; शेतकर्यांविषयी
अपार करुणा व सहानुभूतीपूर्वक आपल्या समोर मांडतो आहे. कृषिविकास व कृषिपुरक उद्योगांचे
आधुनिक जनक असलेल्या यशवंतराव चव्हाण समारोहाच्याही विचारपीठावरून; सृष्टीच्या पोशिद्यांचे
प्रश्न मनाच्या तळठावातून आपल्यासमोर मांडतो आहे. पोशिंद्याच्या आत्महत्येबाबत सरकारनं,
समाजानं, शेतकरी संघटना, विचारवंतांनी, साहित्यिकांनी संयुक्तपणे शेतकर्यांच्या पाठीशी
ऊभे राहायला हवे. जनआंदोलन उभारून सांस्कृतिक दबावगट निर्माण केल्याशिवाय सर्वहारांचे
प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी आपण सर्वहारा समाजाच्या दुःखमुक्तीसाठी, शेतकर्यांच्या
आर्थिक समृद्धीसाठी, समाजात एक सशक्त दबावगट तयार करू या...जोपर्यंत हे कार्य नैतिकता
आणि निष्ठेने आपण करणार नाही, तोपर्यंत आपल्याला निर्भयपणे जगता येणार नाही. दुःखमुक्तीचेही
पर्याय सापडणार नाहीत. शेवटी, समाजाचे सर्वच प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्यासाठी शक्ती
प्रदर्शनाचे तंत्र, एकजूटीने वापरायला हरकत नाही.
यशवंतराव चव्हाणांच्या समतोल विकासाचा आराखडा पुन्हा एकदा भूमीच्या
विनाशावर विकासाचा पर्याय ठरू शकेल काय? याचाही विचार सांस्कृतिक व सामाजिक विश्वाने
करायला हरकत नाही. वर्तमान भ्रष्ट राजकीय वर्तमान काळात यशवंतरावांसारखी राजकारण्यांची
सर्वहारांच्या कल्याणार्थ उपयोगिता सूताएवढीही उरलेली नाही. परिणामस्वरूप, शासन व प्रशासनाच्या
शोषण चक्रव्यूहातून, कृषी व कृषिवलांना स्वयंभू व आत्मनिर्भर करण्याचे राजकारण आता
खुद्द शेतकर्यांनाच करावे लागेल की काय? या सर्व गंभीर प्रश्नांच्या सोडवणुकीत यशवंतराव
चव्हाणांच्या आर्थिक विकास विषयक नियोजनाचा निश्चितच उपयोग होऊ शकेल असे वाटते. यादृष्टीनेही
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात तीन दिवस चर्चा, चिंतन, उपाय यावरही मंथन होईल, अशी
अपेक्षा व्यक्त करतो...
-डॉ.किशोर सानप
दिविशा,
249/ए, मानेवाडा-बेसा
रोड,
शाहू नगर, नागपूर-440
034
Email-
dr.kishorsanap@gmail.com
Web-www.kishorsanap.com
Phone-9326880523,
9518368976
Subscribe to:
Posts (Atom)