35 वे रजधूळ राज्यस्तरीय एक दिवसीय साहित्य
संमेलन, अकोला
दि. 18 मार्च 2018
संमेलनाध्यक्ष : डॉ. किशोर सानप यांचे अध्यक्षीय
भाषण
35 वे रजधूळ राज्यस्तरीय एक दिवसीय साहित्य
संमेलन, अकोला
दि. 18 मार्च 2018
संमेलनाध्यक्ष : डॉ. किशोर सानप यांचे
अध्यक्षीय भाषण
संमेलनाचे
उद्घाटक मराठीतील प्र‘यात लेखक आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे, स्वागताध्यक्ष व रजधूळ
साहित्य चळवळीच्या सर्वेसर्वा कवयित्री-लेखिका-संपादिका श्रीमती देवकाताई देशमुख, प्रमुख
अतिथी गुरूवर्य डॉ. विठ्ठल वाघ सर, कविवर्य सुखदेव ढाणके, कविवर्य बबनराव सराडकर, विजयाताई
मारोतकर; विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व इतर सर्व कार्यकर्ते, आयोजक, स्वागत समितीचे
निष्ठावान सेवक असलेले सर्व सदस्यगण; मराठी साहित्याचा सांस्कृतिक अक्षर वारसा जपणार्या
विविध भागातून खास रजधूळ साहित्य संमेलनासाठी अकोला नगरीत पदार्पण केलेल्या साहित्यिक,
रसिक, विविध पुरस्कारप्राप्त कवी-लेखक आणि सत्कारमूर्ती; परिसरातील माझ्या सग्यासोयर्यांनो...
देवकाताई देशमुखांची रजधूळ चळवळ
आपण देवकाताई देशमुख यांच्या परिवारातील सन्माननीय मंडळी आहात. देवकाताई
साठीत पोहोचल्या तरी अत्यंत उत्साहपूर्वक साहित्यातील लेखनाला चळवळीचे रूप त्यांनी
सन् 1984 पासूनच दिले. गेल्या पस्तीस वर्षांपासून विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात
आणि बृहन्महाराष्ट्रातही नवोदित साहित्यिकांना पुरस्कार, प्रोत्साहन, लेखन आणि प्रकाशन
अशा अनेक आघाड्यांवर देवकाताईंनी समर्थपणे आपल्या लेखन आणि संपादनासह वाङ्मयीन आणि
सांस्कृतिक चळवळीवर रजधूळचा जगन्नाथाचा रथ कृतार्थपणे एकखांबी नेतृत्वाच्या खांद्यावरून
वाहून नेला आहे. गेल्या पस्तीस वर्षांपासून रजधूळ साहित्य संमेलन, विविध वाङ्मयीन आणि
सांस्कृतिक कार्यक‘मही त्यांनी विदर्भाच्या भूमीवर रुजवले आहेत. या सर्वच सांस्कृतिक
व वाङ्मयीन योगदानाला खुद्द देवकाताईंच्या अंगी असलेल्या मानवताविषयक गुणांची आणि समाजातील
सर्वहारांविषयी असलेल्या आस्थेतून त्यांनी लिहिलेल्या महामानवाची जीवनगाथा, अखल, हाय,
राजयोगीनी, रक्तफांद्या, मनस्विनी आदी ग‘ंथातील जीवन जाणिवेचीही किनार लाभलेली आहे.
योगीनी
समाजसेवा महिला संस्था स्थापन करून ग‘ामीण भागातील निराधार मुला-मुलींचे पालकत्व स्वीकारून,
निवासी शाळाही त्या चालवितात. विविध मुला-मुलींचे वसतीगृहे, वाचनालये, महिला मेळावे
आदींबाबत महिला सबलीकरण आणि सामाजिक सबलीकरणाचेही कार्य देवकाताईंनी अकोल्याच्या परिसरात
आजवर केलेले आहे. तात्पर्य, देवकाताई ह्या जगन्नाथपुत्री असल्यामुळेच कौटुंबिक-सामाजिक-शैक्षणिक-वाङ्मयीन-सांस्कृतिक
चळवळीचा जगन्नाथरथ यशस्वीपणे समाजाच्या भल्यासाठी पुढे नेऊ शकल्या. पुढेही त्यांचे
कार्य रजधूळ चळवळीच्या माध्यमाने अखंडपणे सुरू राहावे, म्हणून आपण सर्वच देवकाताई देशमुखांना
शुभेच्छा देऊया...
सांस्कृतिक आणि वाङ्मयीन अकोला
परिसर
अकोल्यालाही एक स्वतंत्र ओळख आणि अस्मिता आहे. बालपण अकोला परिसरातील
हनुमानबस्ती, सुभाषचौक, नगरपालिका चौक, सिताबाई कला महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय,
जिल्हा सार्वजनिक वाचनालय, बाबुजी देशमुख वाचनालय, प्रमिलाताई ओक हॉल, मानेक टॉकीज
ते चित्रा-वसंत-रिगल-शाम-प्लाझा-शालिनी, अशोक वाटिका, पीकेव्ही, नेहरू बगीचा-पाण्याची
टाकी, राजेश्वर मंदिर, जुने शहर, नवे शहर, लोखंडी पूल, दगडी पूल, मोर्णा नदी, दिपक
चौक, परिसरातील चित्रा टॉकीज ते शहरात सर्वत्र पसरलेले दादालोक आणि त्यांच्या टोळ्या,
बैलजोडी चौक, शासकीय दवाखाने, उमरी, राजपूत पूरा, रिक्षा चौक, टांगे चौक, गणपती उत्सव,
गणपती विसर्जन आणि मस्जिदजवळून मिरवणूक काढण्याची उन्मादी परंपरा; साहित्य संमेलने,
मेळावे, चर्चासत्रे, खुले रंगमंच, व्या‘याने, नवरात्र व्या‘यानमाला अशा कितीतरी जागा
आजही मनाच्या तळाशी जिवंत आहेत. अकोला ही खरेतर आजही माझ्या जडणघडणीची संस्कारक्षम
भूमीच आहे. लेखक ज्या मातीतून आला त्या मातीला तो कधीच विसरत नाही. गतकाळात रमण्याची
नॉस्टेलजीयावृत्ती ही प्रत्येक लेखकाच्या सृजनाला कायमच खुणावत असते.
अकोल्याच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक तसेच वाङ्मयीन जडणघडणीत डॅडी
देशमुख, तत्कालिन लोकप्रिय नगराध्यक्ष विनयकुमार पाराशर, मा. मधुसुदन वैराळे, मा. अण्णासाहेब
कोरपे, गो. रा. वैराळे, बाजीराव पाटील, गुरुवर्य विठ्ठल वाघ, डॉ. मधुकर वाकोडे, प्रा.
किशोर मोरे, उ. रा. गिरी अशा अनेकांचे योगदान मोठे आहे. गझलनवाज भीमराव पांचाळे, नाटककार प्रा. मधु जाधव,
स्वरयात्राकार सुधाकर प्रधान असे अनेक कलावंत आमच्या समकाळात म्हणजेच साधारणतः
1975 ते 1985 च्या काळात नावारूपाला आलेले होते.
बाबाराव मुसळे, नामदेव कांबळे,
कविवर्य नारायण कुळकर्णी कवठेकर, वसंत वाहोकार, पुरुषोत्तम बोरकर, श्रीकृष्ण राऊत,
अरविंद विश्वनाथ कुळकर्णी, पुरुषोत्तम रोहणकर, पाचघरे गुरूजी, श्रीकांत तिडके, दिवाकर
इंगोले, प्रशांत असनारे, गजानन डामरे, श्रीकृष्ण गवळी, देवकाताई देशमुख आणखीही अशी
बरीचशी मंडळी वाङ्मय प्रकारात आपले अस्तित्व सिद्ध करीतच होती. अकोल्याला सांस्कृतिक
आणि प्रतिभावंतांचा एक समृद्ध चेहरा लाभलेला आहे. आजही अकोल्यातून नव्या पिढीतील अनेक
लेखक-कवी-कथाकार-कादंबरीकार-नाटककार आपापली प्रतिभाक्षमता सिद्ध करताना दिसून येतात.
या सर्व नवांकुरांचे आम्ही मनापासून स्वागत करतो.
अकोला ही माझी जन्मभूमी.
अकोला
ही माझी जन्मभूमी. याच भूमीवर मी जाणता झालो. अकोल्याच्या परिसस्पर्शाने माझ्या आयुष्याची
सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक-वाङ्मयीन पार्श्वभूमी जगासमोर उजळमाथ्याने आली. साहित्यिक,
मान्यवर, मित्रमंडळीच्या दीर्घ सहवासातच माझी जडणघडण झाली. लोकवाङ्मय गृह, मुंबईने
सन् 1994 मध्ये प्रकाशित झालेली पांगुळवाडा कादंबरी त्याची कृतार्थ साक्ष आहे.
अकोल्याच्या
भूमीपुत्रास रजधूळ साहित्य संमेलनाध्यक्षाचा सन्मान बहाल केल्याबद्दल रजधूळ परिवार
आणि आयोजक संस्थेचा मी शतशः ऋणी आहे. गेल्या
पस्तीस वर्षांपासून देवकाताईंशी बंधू व रजधूळचा लेखक म्हणून जे काही ऋणानुबंध निर्माण
झाले, ते केवळ आमचे परममित्र आणि देवकाताईंचे बंधूवर्य प्रा. कृष्णा देशमुख यांच्यामुळेच
केवळ! अकोला या माझ्या गावात आपण माझ्याच परिवारातील मान्यवर आणि मित्रांशी सुसंवाद
साधण्याचा अवसर मला प्रदान केला, हीच खरंतर
माझी कृतार्थता आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी...हीच माझी याप्रसंगी अवस्था झाली
आहे.
लेखकाचा समकाल आणि भौगोलिक परिसर
लेखक ज्या समकाळात आणि भौगोलिक
परिसरात राहतो त्या काळातल्या आणि परिसरातल्या गुणसूत्रांनीच त्याची सर्वंकष जडणघडण
होत असते. लेखकाची प्रतिभा ही समकाळातील आणि परिसरातील जीवन जाणिवांची यथार्थता आणि
मूलतत्त्वे शोधून, त्यांचाच कालसापेक्ष अन्वयार्थ आपल्या साहित्यकृतीतून आविष्कृत करीत
असते. प्रस्तुत लेखकही याच प्रातिभ वलयात आजवर जगत आणि लिहित आला आहे. यालाच खरेतर
लेखकाची नैतिकता आणि प्रतिभेचा अन्योन्य आविष्कार-अनुबंध मानायला हरकत नाही. अकोला
ही जन्मभूमी. वर्धा ही कर्मभूमी. समाज ही लेखनभूमी राहिली आहे. वर्हाडातील अकोल्याला
माझा जन्म झाला. मला माझ्या वर्हाडी भाषेचा-मातृभाषा मराठीचा अभिमान वाटतो. गेल्या
चाळीस वर्षांपासून मी लेखनाला व‘त मानून; कविता-कथा-कादंबरी-समीक्षा-संतसाहित्य-संत
तुकाराम अशा विविध वाङ्मय प्रांतात लेखन केलं आहे. जवळपास पंचवीस पुस्तकं आजवर माझी
प्रकाशित झाली आहेत. 25 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. विजय प्रकाशनच्या सचिन उपाघ्यायनं
प्रकाशित केलेलं समग‘ तुकाराम दर्शन आणि साकेत बाबा भांड यांनी साकेत प्रकाशनाकडून
प्रकाशित केलेली वारकरी संप्रदायावरील भूवैकुंठ ही कादंबरी, संत तुकाराम चतुर्थ जन्मशताब्दी
वर्षांत प्रकाशित झाली; हा माझ्या वाङ्मयीन
कारकिर्दीचा उत्कट क्षण...
वेदाआधी तू होतास!
मित्रहो, माणूस हाच या सृष्टीला
सत्यम-शिवम-सुंदरम करणारा अलौकिक बुद्धीची देणगी मिळालेला अंतिमतः सत्य-अहिंसा-शांतीचीच
आस असलेला प्रतिभावंत आहे. प्रत्येक माणसाच्या आत विधाय ऊर्जा असलेला एक माणूस असतो.
त्याला अस्तित्वाची आणि अस्मितेची जाणीव फक्त करून द्यायची व घ्यायची असते. थोर लेखक-कवी
बाबुराव बागुलांनी वेदांच्या आधी तू होतास...या कवितेतून करून दिलीच आहे. माणूस सर्वश्रेष्ठ
आहे. त्याच्या अंतःकरणात विधायक सौंदर्यऊर्जा दडलेली आहे. वेदांच्याही आधी आणि नंतरही
तोच आज युगांतरातही जिवंत आहे. खरेतर माणसाला माणूसच कळत नाही. तो कळला तर ह्या जगाच्या
कल्याणाचा मार्गही मोकळा होईल.
वेदाआधी तू होतास!
वेदाआधी तू होतास
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास
पंच महाभूतांचे पाहून विराट, विक‘ाळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ऋचा...
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस
हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले...
हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्वकाही
तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही...
-कवी बाबुराव बागुल
( वेदाआधी तू होतास या कविता
संग‘हातून...)
ग्लोबल युग आणि अच्छे दिन
!
मित्रहो, आज आपण ज्या समकाळात
जगत आहोत, त्याची नांदी मिडियानं आपल्याला विसाव्या शतकाच्या सायंकाळीच दिली होती.
जग ग्लोबल व्हिलेज होईल आणि तळागाळातल्याही लोकांना अच्छे दिन येतील, असेही नगारे धुमधडाक्यात
वाजवण्यात आले. खरेतर एकविसाव्या शतकाच्या दुसर्याच दशकात ग्लोबल व्हिलेज, हे भांडवली
युगाचे सर्वहारांच्या सृष्टीतत्त्वांसह शोषणाचे आणि मानवी सौहार्दाच्या अनुबंधाचे नासधूस
करणारे विनाशकारी युग म्हणूनच अस्तित्वात आले. जग जाळून काढणार्या महाविनाशकारी विद्ध्वंसक
किरणोत्सर्गाने जगाच्याच भूमीचा समूळ विनाश हळूहळू होत आहे. भूमी आणि पर्यावरणाचा विनाश
म्हणजेच सृष्टीतील चराचरांच्या जगण्याचाही महाविनाश असतो. सोबतच सृष्टीच्या नैसर्गिक
जगण्याला उधळी लागली म्हणजे, ती मानवी जीवन मूल्यांसह सृष्टीतील जीवनसत्त्वांना हळूहळू
खाऊन, एकूणच सृष्टीचा समतोल खिळखिळा करून टाकते. मग मात्र संत तुकोबांचे वृक्षव‘ींचे
सृष्टीतत्त्व आणि माणूस हे सौहार्दाचे नातेसंबंधच संपुष्टात येतात. ह्याच महाविनाशाच्या
ज्वालामुखी केंद्रावर आज आपण सर्व भयभीतपणे आणि केव्हाही होत्याचे नव्हते होऊ; या चिंताग‘स्त
आजाराने दिवसेंदिवस खंगत आहोत. सृष्टीचेच आरोग्य धोक्यात असताना या ग्लोबल भूमीवर कायम
शितयुद्धजन्य दहशतीचे साम‘ाज्य हळूहळू भांडवली जेसीबी महाकाय यंत्रयुगात उदय पावत आहे.
सृष्टीला गिळंकृत करणारी सत्तालालसा भांडवली आणि नतद्रष्ट राजकीय युगाचे महाभक्ष बनल्याचे
दिसते. एक लोकम्हण आहे, जो दुसर्यासाठी खड्डा खोदतो, तोच त्या खड्ड्याचे भक्ष बनतो.
हेच ग्लोबल भांडवली शोषण सत्ता आणि उन्मत्त फॅसिस्ट युगाचे उद्याचे भविष्य आहे...
धार्मिक उन्माद आणि धर्मांधतेचा विद्ध्वंस
जीवनाची
जुनी पुराणी सर्वच मूल्ये आणि व्यवस्था बदलली. बदल आणि परिवर्तन हा युगधर्म असतो. या
युगाला गेल्या दोन हजार वर्षांत अनेक संत, राजेमहाराजे, सुधारक, महापुरुष, विचारवंत,
तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, कलावंत, युगलेखक-युगकवी, धर्मवेत्ते, धर्मचिंतक, ग‘ंथकार, भाषातज्ज्ञ,
देशविदेशातील विद्वान अशा अनेकानेक थोरांनी-प्रतिभावंतांनी सौंदर्यशील आकार दिलेला
आहे. अनादी काळापासूनची युगांतराची आस बाळगणार्यांनी आपल्या प्रतिभेचा आविष्कार केवळ
जगाला सुंदर जगता यावे यासाठीच केलेला आहे. विसावे शतक हे खरेतर गांधी-आंबेडकरांचे
शतक होते. एकविसावे शतक हे गांधी-आंबेडकरांची तत्त्वे समूळ नष्ट करणार्या गनीमी काव्याचे
युग आहे.
माणूस
सुखी-समाधानी-सन्मानाने जगावा यासाठीच ह्या दोन्ही युगपुरुषांनी सबंध युगातील मानवी
संचिताचा पुनर्विचार केला. जगातील मानवजात समता-न्याय-स्वातंत्र्य या मूल्यत्रयींसह
आर्थिकदृष्ट्या सबल व्हावी यासाठीच आयुष्य वेचले. समताधिष्ठित समाजाची रचना सुफल व्हावी,
हेच एकविसाव्या शतकातील मानवी जगाच्या सर्वंकष कल्याणाचे समत्व-ममत्वपूर्तीचे स्वप्नच
गांधी-आंबेडकरांनी विसाव्या शतकात पाहिले होते. परंतु एकविसाव्या शतकात जगभर धार्मिक
उन्माद आणि धर्मांधतेचा विद्ध्वंस करणारी व्यवस्था शिरजोर बनली. सत्ताकांक्षा किती भयावह आणि मानवी विद्ध्वंसाचं
हिंस्त्ररूप धारण करू शकते, याचं ताजं उदाहरण म्हणजे जगातील सर्वत्र नव्याने उदयोन्मुख
व उन्मादित झालेली हिटलरी हुकुमशाही मूलतत्त्ववादी विद्ध्वंसक फॅसिस्ट सत्ताकांक्षा
होय. गेल्या दोन दशकात भारतासह अमेरिका-इस्लामिक राष्ट्रे-चीन-पाकिस्तान-अफगाणिस्तान
आदी आखाती-आशीयाई-जगाच्या चोहीकडे देशाविदेशात झालेली सत्तांतरे त्याची साक्ष देतात.
धर्म ही अफूची गोळी आहे आणि सबंध जगाला अफूच्या गुंगीत रोबोटसारखं झुलवता-वाकवता-तोडता-मोडता-मारता
येतं; हे सत्य धर्मांध सत्ताधार्यांनी आणि मूलतत्त्ववाद्यांनी मनोमन जाणलं. अत्यंत
चतुरपणे जगभरातल्या फॅसिस्ट बुद्धिवादी सत्ताधार्यांनी भांडवली लोकांच्या नफेखोर क‘ूर
भांडवलावर ही हिंस्त्र-पाशवी धर्मांध व्यवस्था राबवली. त्यात त्यांना यशही आल्याचे
वर्तमान आज तरी आपल्या समोर दत्त म्हणून उभे आहे...
सत्ताबदल आणि सामाजिक परिवर्तनाची
अस्त्रे
मित्रहो, सत्ताबदल आणि सामाजिक
परिवर्तनाची अस्त्रे जेव्हा जगातले फॅसिस्ट लोक वापरू लागतात; तेव्हा सर्वप्रथम बुद्धिवादी
आणि प्रतिभावंतांना सहज विकत घेता येते. सुप्त महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी संपूर्ण व्यवस्थाच
मायावी वर्तुळांकित चक‘व्यूहात बंदिस्त करण्याचे प्रथमदर्शनी तंत्रज्ञान वापरण्यात
व्यवस्था वाकबगार असते. कुणालाही खरेदी करता येण्याची खात्री पटल्यामुळे; सत्ताधारी
आणि कुंठित समाजव्यवस्था मात्र; पुरस्कार, देणग्या, बक्षिसे, समित्या, लोकप्रतिनिधीची
निरर्थक कुचकामी पदे, राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांच्या निमित्ताने शासकीय व शासनमान्य
अनुदानित सन्मानहौसांना वापरूनच, प्रतिभावंतांना आपल्या सत्ताकांक्षेच्या पूर्तीसाठी
आणि सर्वहारांची शोषणयंत्रे म्हणून वापरतात. आज हेच सर्व क्षेत्रातील प्रतिभावंतांच्या
वर्तमान प्रगतीचे रहस्य आहे. यात सर्वच प्रकारचे आणि सर्वच क्षेत्रातले प्रतिभावंत
आणि जगाचे तारणहारा पुरोगामी विचारवंत, कलावंत, शास्त्रज्ञ, सामाजिक संस्थांचे प्रवर्तक
वगैरे गुण्यागोविंदाने सामिल झालेले असतात. डॉ. नरेन्द्र दाभोळकर, डॉ. गोविंद पानसरे,
डॉ. कलबुर्गींसारखे काही अपवादभूत असतात.
सांस्कृतिक महाविनाशाचा समकाल
समकाळात कोण विचारवंत? कोण
पुरोगामी? कोण निष्ठावंत? कोण प्रतिभावंत? कोण सामाजिक कार्यकर्ता? कोण सुधारक? कोण
लेखक? कोण सालोमालो? कोण खरा आणि कोण खोटा? ह्या सर्वच श्रेणींचे विघटन झाल्याचे वास्तव
कुणालाही नाकारता येणार नाही. गेल्या तीस-चाळीस वर्षांत तर महाराष्ट्रासह सबंध देशात
आणि सबंध जगातच विचारांची आणि माणुसकीची पिछेहाट झालेली दिसते. सार्वत्रिक मूल्यात्मक
आणि विचारात्मक पतनामुळे जगभर भय आणि भीतीचे सावट पसरलेले आहे. धर्मांधता आणि उन्मादाच्या
भयाने सबंध जग आज अस्वस्थ वर्तमान बनले आहे. व्यवस्थेच्या खोलात, तळाशी आणि मुळाशी
कुणालाच जायचे नाही. आजचा दिवस जगून उद्याची चिंता करायची नाही. ही क्षणभंगुरता आजच्या
युगातील मानवी जगण्याचा विशेष बनली आहे. खरेतर हे सर्वकाही रोखण्याचे सामर्थ्य असलेल्या
प्रतिभाच आज लोप पावल्या आहेत.
खरेतर
आजचा समकाल हा युगांतराचा किंवा मानवी जीवनात कल्याणकारी परिवर्तन करण्याचा राहिलेलाच
नाही. भाषा, वाङ्मय, संस्कृतीसह मानवाच्या सांस्कृतिक महाविनाशाचा समकाळ आहे. याला
केवळ बुद्धिवादी आणि विकाऊ प्रतिभावंतच जबाबदार आहेत. कारण, प्रतिभावंताला नैतिकतेचे
बळ असल्याशिवाय तो समाजासाठी सृजन करू शकत नाही. आजची नैतिकता दिखाऊ-विकाऊ आहे. प्रतिभा
खोटी-ननैतिक आहे. युगलेखकाची उजळ प्रतिमा हीच खरेतर प्रतिभावंतांच्या नैतिकतेचे आणि
सृजनाचे वैभव असते. आज हे सर्वकाही आपण गमावून बसलो आहोत. आमचे सांस्कृतिक विश्व सांस्कृतिक
कारागिरीची निर्मितीकेंद्रे बनली आहेत. मठबाजी आणि अहंकारात आणि सन्मानहौसेत प्रतिभावंत
रत आहेत. कुणालाही समाजाविषयी काही घेणेदेणे उरलेले दिसत नाही.
उद्याच्या
सांस्कृतिक जगाची बाजारपेठ बनण्याचीही जोरात तयारी सुरू आहे. खरेतर हे सांस्कृतिक सन्मानहौसेचे
गुपित कुणालाही कळणारच नाही! ओळखताच येणार
नाही ! इतके ते सत्यच मानून; असत्याच्या मुखवट्याशी एकजीव झालेले आहे. हे आपल्यालासह
सर्वहारा समाजाच्या व्यापक हितांचे कार्य तळमळीने करणार्यांना कसे थांबवता येईल ?
हाच गुंता आधी सोडवावा लागणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिजात मराठीपेक्षाही
हे व्यापक समूहजीवनाच्या सौहार्दासाठी आवश्यक आहे. प्रश्नांचा अग‘क‘म हा दिशाभूल करणारा
असतो. हेही आपण जाणले पाहिजे.
शेतकर्यांच्या आत्महत्या : मढे झांकुनिया करिती पेरणी
शेतकर्याचे पॅकेज लालफितीत लुटले जाते. शेतीचा आतबट्ट्याचा व्यवहार
करणार्या कास्तकाराला कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे, आपल्याच हक्काच्या भूमीवर झाडाच्या
फांदीला गळफास घ्यावा लागतो. मढे झांकुनिया करिती पेरणी ॥ कुणबियांचे वाणी लवलाहे ॥
घरातलं मढं झाकून पेरणी करणार्या सृष्टीच्या पोशिंद्याला स्वदेहाचं मढं का करावं लागतं?
16 वर्षांत तीन लाख शेतकर्यांनी कर्जाचा डोंगर, गरिबी, नैसर्गिक संकटे, दारिद्य‘ यामुळे
आत्महत्या केल्या. सन् 1995 ते 2011 पर्यंत शेतकरी, शेतमजूर आणि शेतीच्या व्यवसायाशी
निगडित असणार्या दोन लाख नव्वद हजार सातशे चाळीस शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची
नोंद, नॅशनल क‘ाईम रेकॉर्ड्स ब्युरोनं वार्षिक अहवालात दिल्याची माहिती, तत्कालीन केंद्रिय
कृषिमंत्री हरीश रावत यांनी राज्यसभेत दिली होती. (महाराष्ट्र टाईम्स्, नागपूर, दि.
1 सप्टेंबर 2012)
सन् 1984-85 मध्ये वर्धा जिल्ह्यातील साहेबराव पाटलानं दत्तपूर ग‘ामी
दोन मुलं, पत्नी अशा अ‘या कुटुंबासह किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. सबंध महाराष्ट्राला
हादरा देणारी ही घटना गांधी जिल्ह्यात घडली. कवी विठ्ठल वाघांनी साहेबराव पाटील कविता
लिहून, शेतकर्यांच्या आत्महत्येची नोंद मराठी कवितेत केली.
खरं म्हनजे साहेबराव तुया आत्महत्या
केलीच नाही
आमीच तुहा खून केला...तुहा अन् तुह्या बायकोपोराईचाही
तुहं सरन पेटल्यावर मसनात एक म्हतारा सांगत होता-
आता कापूसजवारी पेरसान त लेकहो हराममौतीनं मरसान
आता पेरा तासातासानं लोखंडी दगळी गोटे
चारी मेरीनं बाभुईचे खम्मन काटे...
...तू मले माफ करू नको-कधीच माफ करू नको साहेबराव
!
समाजानं आणि साहित्यवर्तुळानं वाङ्मयीन चर्चा केली. शेतकरी चळवळीनं
आणि सरकारनंही ह्या घटनेकडे गंभीरपणे पाहिलं नाही. पेल्यातलं वादळ पेल्यातच जिरलं.
कविता-कथा-कादंबरीची तरफदारी करणारे गट साहित्यकृतीत मांडलेल्या जिवंत सामजिक प्रश्नांचं
आंदोलन का करीत नाहीत? लेखक-कवी कृतिशील का होत नाहीत? वाङ्मयीन संस्कृतीनं, सामाजिक
बांधिलकी आणि पुरोगामित्व जपणार्या सांस्कृतिक धुरिणांनी असे अनेक प्रश्न सोडविल्याशिवाय
साहित्यकृतीची सामाजिकताही सिद्ध करता येणार नाही.
शेवटी, आम्ही जलमलो मातीत किती होणार गा माती ! खापराच्या दिव्यात
या कधी पेटणार वाती? शेतकर्यांनी आपुलाचि वाद आपणाशी करून, आपले प्रश्न सोडविण्याचाच
खरंतर हा वर्तमान काळ आहे. जगाचं भविष्य असणार्या शेतकर्याचं वर्तमान ज्या देशात
काळवंडलं जातं, त्या देशात खरंच सोन्याचा धूर निघत होता काय? जिकडे तिकडे चोहीकडे हिरवेगार
गालीचे आमच्या शेतीवाडीचे! असं चित्रण केलं जायचं ते खरं होतं काय? असे कितीतरी प्रश्न
आपणच आपल्याला विचारले पाहिजेत.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या
दशकाचं भयावह वास्तव दुसर्या दशकाच्या प्रारंभातच मानवी जीवनाला उधळी लावेल, असं कुणालाही
वाटलं नाही. पण एकूणच जगातल्या सर्वहारा माणसांच्या जीवनालाच आता उधळी लागलेली आहे.
पिपात मेले ओल्या उंदिरासारखी स्थिती आज जगात सर्वत्र दिसून येते. मर्ढेकरांचा गणपत
वाणी बिडी पितांना मरून गेला. एक मागता डोळे दोन, देव देतसे जन्मांधाला...सर्वहारा
शेतकर्यांचा आणि शोषित वर्गाचा सखासोबती असलेला भुवैकुंठीचा विठू आणि रखुमाई सुद्धा
एकविसाव्या शतकात विठ्ठलाच्या पायी थरारली विट, म्हणून आपल्या वारकरी-शेतकरी बांधवांना
सोडून निघून गेले की काय? असे अनेक प्रश्न आता पडायला लागले आहेत.
शेतकर्यांच्या आत्महत्या आणि
नव्या पिढीचा अघोषित संप
आपल्या शेतकर्यांच्या पुढच्या पिढीने पुकारलेला अघोषित संप देशाला
अंधाराकडे घेऊन जाणारा असेल...शनिवार, दि. 18 फेब‘ुवारी 2017 च्या लोकसत्तातील संपादकीय
अग‘लेखातून जगाला आणि आपल्या देशालाही धोक्याचा गंभीर इशारा संपादकानं दिला आहे. शरद
जोशी यांनी महाराष्ट्रातील कृषिजीवनात शेतकरी संघटेचे क‘ांतिपर्व निर्माण केले. पहिल्यांदा
शेतकर्यांच्या आंदोलनाची क‘ांतिकारी ऊर्जा
महाराष्ट्राच्या भूमीवर निर्मून आणि पुढे गल्ली ते दि‘ीपर्यंत अनेक वर्षे जागती ठेवली.
शेतीचे कायदे आणि शेतीची सबंध व्यवस्थाच सरकार नियंत्रित करीत असल्यामुळे, भारतीय शेतीवरील
सर्वच जाचक कायदे-बंधने हटवून शेती पूर्णपणे मुक्त केल्यानेच ती जागतिकीकरणाच्या रेट्यात
टिकू शकेल; असा आग‘ह शरद जोशींनी केला होता. परंतु शेतकरी संघटना आणि महेन्द्र टिकैत
यांच्या किसान आंदोलनासह; शरद जोशींच्याही क‘ांतिकारक विचारांना-चळवळीला तिलांजली देण्याचे
राजकीय डावपेच यशस्वी झाल्यामुळे; भारतीय शेतकर्यांच्या जीवनातील एकमेव आशेचीही ज्योत
मालवली गेली.
शेतकर्यांची
व्होट-बँक देशातील मोठी व्होट-बँक असल्यामुळे, पॅकेजच्या भूलथापांनी भारतीय शेती कायमच
डायलिसिसवर राहिली. कृषी-कृषकांचे अर्थशास्त्र अधिकाधिक बिघडतच गेले. भूसंपादन कायदे
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राबवून, सेझ-कल्चर सरकारनेच अस्तित्वात आणले. सक्तीने शेतजमिनी
बळकावून शेतकर्यांना भूमी-निकाला केले. दुःखमुक्तीची मृत्यू-सेज बहाल केली. शेतीच्या
बुडित व्यवसायात नवीन पिढीने येऊ नये म्हणून, शेतकर्यांनी आपली मुले शहरात शिकवून-शहरी
नोकरीपेशात रुजवून-प्रसंगी शेतजमिनी विकून, नव्या पिढीचे शेती कसण्याचे सर्वच रस्ते
बंद करून टाकले. ही सर्व भूमीची दुर्दैवी, अमानुष मशागत गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून
आपल्या देशात सुरू असल्यामुळे; भारतीय जुन्या पिढीतील मायबाप शेतकरी मोठ्याप्रमाणावर
आत्महत्या करू लागले. नव्या पिढीने शेतीविरूद्ध अघोषित संप पुकारून, पांढरपेशा समाजात
आपलं जगणं सुकर करून घेतलं.
डोकेफूट प्रबोधनाने कोणत्याही क‘ांतिच्या शक्यताच कधी निर्माण होताना
दिसणार नाहीत; अशीच गोळीबंद व्यवस्था बुर्ज्वा सुखवस्तू व्यवस्थाप्रिय बुद्धिवाद्यांनी-भांडवलदारांनी-सत्तापटूंनी
रुजवत आणलीच आहे. जगभर महाविनाशाचे हादरे बसत असतानाही आपण कसे शांत-स्वस्थच आहोत...मनातल्या
सुखवस्तू तलावात सारंकसं सामसूमच आहे...आपलं कशाशीच काही घेणंदेणं राह्यलं नाहीय. आपण
आणि आपला परिवार भला...पण, हे त्रिकालाबाधित सत्य नाहीच. ही मानसिकता क्षणकालातच नेस्तनाबूत
होण्याची दुःचिन्हे ठळकपणे जगभर दिसू लागली आहेत. जगबुडीत जगच बुडते. तेव्हा बुडत्याचे
पाय डोहाकडेच असतात...कुणीही वाचवायला मागंच उरणार नाही...जग अंधारात बुडू लागल्याचे
भाकित अमेरिकन-रशियन लेखिका आयन रँड यांनी सन् 1957 मध्ये लिहिलेल्या अॅटलास श्रग्ड
या फॅन्टसी-नॉव्हेलमध्ये मांडलेच आहे.
जगातील तमाम बुद्धिवंत, शास्त्रज्ञ, उद्योजक, कलावंत, साहित्यिक संपावर
गेले तर या जगाचे काय होईल?...काहीही होणार नाही. परंतु शेतकरी जर संपावर गेले तर मात्र
जगबुडी जरूर होईल! लोकप्रिय तत्त्ववेत्त्या आयन रँड यांनी अॅटलास श्रग्ड या कादंबरीतून
जगाला हीच धोक्याची सूचना दिली आहे. जगामध्ये संपत्ती निर्माण करणारी, समृद्धी आणणारी,
जगाला पोसणारी ही माणसे; ती एका क्षणी ठरवतात की, आता खूप झाले. यापुढे जगाला आपल्या
खांद्यावरून नाही वाहून न्यायचे. एकेक करून ते सारे आपले काम बंद करतात. जगाला, येथील
एकमेकांवर जगणार्या बांडगुळाप्रमाणे जगणार्या माणसांना लाथाडून दूर कुठे तरी आपल्या
विश्वात निघून जातात...आणि सारे जग अंधारात बुडते... या सत्याच्या जवळच आपण पोहोचलो
आहोत.
समाज, शासन आणि सांस्कृतिक क्षेत्रांत कृषिजगताकडे कसे पाहिले जाते?
याचा आत्मशोध घेतला की मु‘यत्वे ग‘ामीण साहित्यातून गावगाड्याचे आणि शेतकर्यांचे जीवन-वास्तव
मांडण्याचा प्रयत्न खूप आधीपासूनच झालाय. शेतकर्यांची भाषा, शेती, हालअपेष्टा, जीवन
जगण्याची निसर्गशैली आदींचे चित्रण आभासी परंतु मनोरंजनाच्या पातळीवर सुरूवातीला झाले,
हेही खरे आहे. शेतकर्यांच्या जीवन शैलीला-जगण्याच्या बोलीभाषेला नागरी लोक हसून भाषेची
खि‘ी उडवतात, हेही खरे आहे. बोली भाषेतील ग‘ामीण अस्सल अनुभवनिष्ठ साहित्य हे विनोदी
साहित्याच्या अंगाने पाहिले गेले, हेही खरे आहे. साठोत्तरी कालखंडात मात्र ग‘ामीण साहित्यातून
गावगाड्याच्या अवकळाग‘स्त जीवन जाणिवांची वास्तवाभिमुख अभिव्यक्ती झाली, हेही खरे आहे.
कवी विठ्ठल वाघांची शेतकरी दिंडी, साहेबराव पाटील ही शेतकर्यांच्या आत्महत्येची परखड
मीमांसा करणारी कविता; हे साहित्यातील परिवर्तनाचे तरंग लक्षात घेतले की; सबंध महाराष्ट्रातून
साठोत्तरी काळात लिहित्या पिढीने, ग‘ामीण साहित्याची परिमाणे बदलत्या वास्तवानुसार
समाजमनात पेरण्याची मौलिक कामगिरी केल्याचेही सत्य नाकारता येणार नाही. साठोत्तरी कालखंडात
उद्धव शेळके, रा. रं. बोराडे, आनंद यादव, कवी ना. धों. महानोर, कवी विठ्ठल वाघ, बाबाराव
मुसळे, सदानंद देशमुख, शेषराव मोहिते, भास्कर चंदनशीव, भारत काळे, कैलास दौंड अशा काही
मोजक्या खुद्द शेती कसणार्या शेतकरी साहित्यिकांनी मात्र शेतकर्यांच्या जीवनाची वाताहत-आत्महत्या-दुष्काळ-शेतीचे
बुडीत अर्थशास्त्र-जातवास्तव-गावठी राजकारण आदींच्या अंगाने शेतकर्यांचे जीवन-वास्तव
आपल्या सृजनशीलतेतून मांडल्याचेही दिसते.
साहित्यसृजनाने
आंदोलन उभारून, शेतकर्यांच्या हालअपेष्टा दूर केल्याचे एकही उदाहरण आधुनिक मराठी साहित्याच्या इतिहासात तरी आजवर घडल्याचे
दिसत नाही. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने
जी काही क‘ांती महाराष्ट्राच्या शेती जीवनात मधल्या काळात घडवून आणली, त्याचेच पडसाद
आजही पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्यांच्या संप, रास्ता रोको, उठावातून दिसून येतात.
तेवढाच केवळ एक अपवाद आहे. बाकी तर, सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात, वळं कलंडती
असे कुठे गेले झंझावात...अळीमिळी गुपचिळी जगन्याची रीत झाली, निंघे अर्थाचं दिवायं
शब्दाची तं पत गेली...हेही सांस्कृतिक वास्तव-समाज वास्तव-शासन वास्तव कवी वाघांनी
मांडलेच आहे.
आज आपण भौतिक सुखसोयीत जगण्याच्या शैलीचे गुलाम झालो आहोत. आपल्याच
सुखाच्या वर्तुळात आपण जगतो. व्यवस्थाही सुखेनैव जगत आहे. जगातल्या तमाम समस्यांकडे
दुर्लक्ष झाले तरी त्यामुळे जगबुडी होणार नाही. परंतु शेतकर्यांच्या आत्महत्यांचे
सत्र जर असेच अखंड-अविरत सुरू राहिले, तर या सृष्टीला जन्माला घालणारे-सृष्टीचे पालनपोषण
करणारे लोकच ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये माणसांना जन्माला घालण्यासाठी भविष्यात शेष उरणार
नाहीत. मायबापच नसले तर माणसांच्या सृष्टीची उत्पत्ती तरी कशी होईल? हाच खरेतर ह्या
वर्तमानातला कळीचा मु‘य मुद्दा आहे...
मु‘य मुद्दा हा आहे की, संतप्रवृत्तीने जगासाठी जगणार्या सृष्टीच्या
पालनहार्याविषयीचा खोलवरचा करुणाभाव-कर्तृत्वभाव-जग्गदाताभाव एकूणच सृष्टीला जगवणार्या
व्यवस्थेला कितपत जाणवला आहे? याचाच खरेतर शोध घेण्याची गरज आहे. असेही लक्षात येते
की, जगात शेतकर्यांविषयी केवळ कोरडी सहानुभूतीच शेष आहे. गांधीजींच्या तीन बंदराची
अवस्था जगभर दिसते आहे. शेतकर्यांविषयी काहीही बोलायचं नाही! शेतकर्यांच्या बुडीत
जगाविषयी काहीही ऐकायचे नाही! मृत्यूपंथाला कवटाळणार्या शेतकर्यांची मढीही पाहायची
नाहीत! समाज, शासन, साहित्य, संघटना अशा सर्वच स्तरांवर गांधीजींचे तीन बंदर सृष्टीच्या
तारणहार्याला केवळ वाकुल्या दाखवीत आहेत. मित्रहो, इतकी उदासिनता असेल, आपल्याच जन्मदात्याकडे
पाहण्याची तर या नव्या जगाला नक्कीच भवितव्य नाही...
मेक इन इंडिया! स्वच्छ भारत, तेव्हाच निर्माण होईल; जेव्हा स्वच्छ-निकोप
दृष्टीने भारतीय शेतकर्यांच्या अवकळेचा कलंक समूळ पुसला जाईल!...हे करायचे की नाही?
याचाच विचार करण्याचे हे युग आहे...अर्थातच, जगबुडीची नांदी तर आपल्या शेतकर्यांच्या
पुढच्या पिढीने पुकारलेल्या अघोषित संपामुळे, देशाला अंधाराकडे घेऊन जाण्याची तीव‘
चाहूल तर महाराष्ट्रातल्या शेतकर्यांनी दिलीच आहे!... या निमित्ताने तरी समाज जागरण
होईल. समाज आणि शासनाची कुंठितावस्था दूर होईल. ती झालीच तर मात्र, आपल्या कृषिप्रधान
देशाला आणि कृषीवलांची काळजी घेणार्या समाज-शासन-सांस्कृतिक व्यवस्थेला भवितव्य राहणार
आहे!..
धर्मा शेतकर्याची आत्महत्या !
मित्रहो, शहरांसाठी आणि महानगरांसाठी
अच्छे दिन आले! हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. बुद्धिवादी आणि भाषा साहित्य संस्कृतीच्या
प्रश्नांपेक्षाही अग‘क‘मानं दररोज महाराष्ट्रासह देशभर सतत सुरू असलेले आत्महत्येचे
सत्र कुठवर चालणार आहे? स्मार्ट किसान ऐवजी स्मार्ट सिटीसाठी भूमीचे संपादन आणि भूमीची
सृजनशीलता नष्ट करणार्या व्यवस्थेचे कुठवर समर्थन करणार आहोत आपण? विकासाच्या नावाखाली
शेतकर्यांच्या भूमीचे-घरादारांचे संपादन करून शासनच शेतकरी विरोधी कायदे करून, गावगाड्याच्या
व शेतकर्यांच्या जीवनावरच जेसीबी चालवीत आहे. खरेतर विकासाचं बुजगावण उभं करून शेतकर्यांसह
समाजाची दिशाभूल केली जात आहे. खरेतर विकासाचा हा तोतया मूलमंत्र आहे. यात शासन आणि
शहरी लोक सामिल आहेत. मुठभर लोकांच्या जीवनाची वाताहत झाली तरी बहुसं‘यांक नगरांचा
विकास होतो! त्याला विरोध तरी का? अशी विकासाची उलटी गंगा विकासयुगात जगभर वाहत आहे.
धर्मा पाटलांसारखे अनेक भक्ष टिपण्याचे हे कारस्थान गावगाड्यातल्या लोकांनी तरी का
मान्य करायचे? धर्मा पाटलानं भूसंपादनाचा मोबदला नीट न मिळाल्यामुळे मंत्रालयातल्या
लालफितशाहीला आणि भ‘ष्टाचाराला कंटाळून दि. 29 जानेवारी 2018 रोजी मंत्रालयातच विष
प्राशन करून दिवसाढवळ्या आत्महत्या केली. चार दिवस मिडियात न्यूज बनल्यावर धर्मा पाटील
कोण? हा प्रश्न काळजमा होतो. शेतकर्यांचे किती पातळ्यांवर शोषण होते? त्याचे धर्मा
पाटील हे जिवंत उदाहरण आहे.
रजधूळच्या विचारपीठावरून...
नरखेडच्या चौथ्या जनसाहित्य
संमेलनाच्या (1998) आणि नाशिक जिल्ह्यातील तारुखेडले येथे संपन्न झालेल्या तिसर्या
भटक्याविमुक्तांच्या साहित्य संमेलनाच्या (2001) तसेच सन् 2012 मध्ये गोंदियात संपन्न
झालेल्या 62 व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून; सृष्टीचा पालनहारा असलेला
शेतकरी मृत्युपंथ का स्वीकारतो? जगाची पोटभूक शमविणार्या सृष्टीच्या निर्मात्याला
आयुष्यभर फाटक्या चिंध्या पांघरून उपाशी का मरावं लागतं? कृषीप्रधान भारत देशात शेतीच्या
व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देवून, सरकार त्यांचे प्रश्न निकालात का काढत नाही? असे
अनेक प्रश्न मांडले होते.
आज
पुन्हा 20 वर्षांनी हेच अजूनही न सुटलेले दुःखकोडे; रजधूळ साहित्य संमेलनाच्याही विचारपीठावरून;
सृष्टीच्या पोशिद्यांचे प्रश्न मनाच्या तळठावातून आपल्यासमोर मांडतो आहे. पोशिंद्याच्या
आत्महत्येबाबत सरकारनं, समाजानं, शेतकरी संघटना, विचारवंत आणि साहित्यिकांनी संयुक्तपणे
शेतकर्यांच्या पाठीशी ऊभे राहायला हवे. जनआंदोलन उभारून दबावगट निर्माण केल्याशिवाय,
सर्वहारांचे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी आपण सर्वहारा समाजाच्या दुःखमुक्तीसाठी आणि
शेतकर्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी समाजात एक सशक्त दबावगट तयार करू या...जोपर्यंत
हे कार्य नैतिकता आणि निष्ठेने आपण करणार नाही, तोपर्यंत आपल्याला निर्भयपणे जगता येणार
नाही. दुःखमुक्तीचेही पर्याय सापडणार नाहीत. शेवटी, समाजाचे सर्वच प्रश्न अग‘क‘माने
सोडवण्यासाठी शक्ती प्रदर्शनाचे तंत्रही आपण मिळून, एकजूटीने वापरायला हरकत नाही...
-डॉ. किशोर सानप
दिविशा,
249/ए, मानेवाडा बेसा रोड, शाहू नगर,नागपूर-4400 034
दूरध्वनी-9326880523,
9422894205
Email-dr.kishorsanap@gmail.com












No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.