Sunday, 25 February 2018

‘पुण्य नगरी’ nagpur 26-02-2018
‘उजळावया आलो वाटा़’
डॉ़ किशोर सानप

सोडवा हो अनंता



मंबाजी हा नेहमीच आपल्याला त्रास का देतो म्हणून तुकोबाही चिंताग्रस्त
होते. खरेतर मंबाजी हा तुकोबांचा प्रतिस्पर्धी नव्हता. तुकोबा भक्त तर
मंबाजी लोकांना लुबाडणारा गोसावी होता. अनेकदा तो तुकोबांच्या कीर्तनातही
हजर असायचा. मंबाजी सुधरला, असेही कधी कधी तुकोबांना वाटायचे; परंतु
विंचवाच्या नांगीसमान असलेल्या सर्वांगी दुर्जन असलेल्या मंबाजीने
तुकोबांची वारंवार छळवणूक केली. फजिती केली. ‘‘का होती का होती। देवा
एवढी फजिती।।’’ असे तुकोबांना विठ्ठलाला विचारावेसे वाटले. आपली कुठे चूक
तर नाही ना झाली? आपलं मूळ वर्म तर नाही ना चुकलं? मंबाजीला आपण भक्त
समजलो ही आपली चूक झाली काय? असे विविध प्रश्न तुकोबांना सतावीत होते.

कां होती कां होती। देवा एवढी फजिती।।
मुळी वर्म नसतो चुकलो। तो मी ऐसे चित्ती।।
होणार होऊनि गेले। मिथ्या आता खंती रे।।
तुका म्हणे पुरे आता। दुर्जनाची संगती रे।।

तुकोबा ज्या देहू गावी राहत होते त्यांच्या घराशेजारीच मंबाजी गोसावी हा
तुकोबांचा सतत छळ करणारा द्वेष्टाही राहत होता. सरकारी गाथेत क्र. ३५५ ते
३६७ पर्यंतचे अभंग मंबाजी गोसावी यांनी स्वामीस पीडा केली याबाबतचे आहेत.
विंचवाची नांगी। तैसा दुर्जन सर्वांगी।। असे अचूक वर्णन मंबाजीचे केले
जाते. मंबाजी हा ब्राह्यणवादी होता आणि ब्राह्मणांशिवाय वेदपठणाचा आणि
अभंग लेखनाचाही अधिकार शूद्र जातींना नाही, असे त्याचे मानणे होते.
तुकोबा हे शूद्रवंशी असून त्यांना अभंग लेखन आणि कीर्तनाचा अधिकार नाही
म्हणून त्याने तुकोबांविरुद्ध नेहमीच कुभांड रचले. रामेश्वर भटांजवळ
तुकोबांची तक्रार केली. तुकोबांच्या अभंगाच्या वह्याही सन १६४५ मध्ये
इंद्रायणीत बुडविण्यास भाग पाडले. तुकोबांना अनेकदा मारहाण केली.
तुकोबांच्या विठ्ठल टीके मंदिराच्या वाटेवर काटेरी कुंपण घातले.
तुकोबांकडे बाईलाही पाठविण्यास त्याने मागेपुढे पाहिले नाही. मंबाजी हा
वर्णवर्चस्ववादी आणि धर्मांध होता आणि तुकोबांची परिसरातील संत म्हणून
ख्यातीही त्याला सहन होत नव्हती. मंबाजीनेच तुकोबांचा धूलिवंदनाच्या
दिवशी घात केला, असे मत प्रचलित आहे.
‘‘अमंगळ वाणी। नये ऐको ते कानी।। सतत अमंगळ कामे करण्यात मंबाजीचा
हातखंडा होता. याति वर्ण श्रेष्ठ। परि तो चांडाळ पापिष्ट।।’’ हे
तुकोबांनी केलेले वर्णन तंतोतंत मंबाजीला लागू होते. ‘‘कैसा सिंदळीचा।
नव्हे ऐसी ज्याची वाचा।। वाचे नुच्चारी गोविंदा। सदा करी परिनिंदा।।
तसेच, आचरणा ठाव। नाही अंगी स्वत: भाव।। करवी आणिकांचे धाता खोडी काढूनि
पंडित।।’’ असा तो सतत परनिंदा करणारा आणिकांच्या खोड्या काढून घात करणारा
गोसावी होता. ‘‘गर्भाचे धारण। तिने वागविला सिण।। व्याली कुºहाडीचा
दांडा। वर न घाली च तोंडा।।’’ मंबाजी हा तुकोबांच्या मते अभक्त होता आणि
अशा अभक्ताच्या आईने कुºहाडीचा दांडाच जन्माला घातला होता. ‘उपजला काळ।
कुळा लाविला विटाळ।। तुका म्हणे जाय। नरका अभक्ताची माय।।’’ अशा अभक्ताची
मायसुद्धा नरकालाच जाते. ‘पतनासि नेती। तिचा खोटा स्नेह प्रीती।।’’ जी
माय आपल्या मुलाला पतनाकडे नेते तिचा स्नेह खोटा असतो. कुळाला बुडविणाºया
ह्या मंबाजीचा तुकोबांनी कधी प्रतिकार केला नाही.
‘‘तुका म्हणे दंड। कैसा न पावे तो लंड।।’’ आपण जर भक्त आहोत आणि
विठ्ठलाचे पाईक आहोत तर विठ्ठलच त्याला शिक्षा करेल, अशी तुकोबांची धारणा
होती. ‘‘सोडवा सोडवा। सोडवा हो अनंता।। तुजविण ऐसा। कोण दुजा प्राणदाता।।
कोणा लाज नेणां ऐसे। आणिका शरण आम्ही जाता।। तुका म्हणे सखया। माझ्या
रखुमाईच्या कांता।।’’ ही तुकोबांची दृढ बुद्धी आणि समर्पणवृत्ती होती.
मंबाजीने तुकोबांचा शारीरिक छळ केला होता. त्याचे वर्णनही तुकोबा करतात.
‘‘न सोडी न सोडी न सोडी। विठोबा चरण न सोडी।। भलते जड पडो भारी। जीवावरी
आगोज।। शतखंड देह शस्त्रधारी। करिता परी न भीये।। तुका म्हणे केली आधी।
दृढ बुद्धी सावध।।’’ कितीही मारहाण झाली, कितीही मोठ्या दगडांनी आपल्याला
मारले, जीवाचे शस्त्राने शंभर तुकडे केले तरी आपण विठोबांचे चरण सोडणार
नाही. कारण भक्त म्हणून भीती नाही आणि आधीच जीवाचे तुळशीपत्र हाती घेतले
आहे. भीत नाही आता आपुल्या मरणा, कारण दु:खी होता जना न देखवे डोळा.
लोकांसाठी आपण आपला जीव विठ्ठलाला अर्पण केल्यामुळे आणि बुद्धीही सावध
केल्यामुळे मंबाजीच्या कोणत्याही कपट-कारस्थानांची तुकोबांनी कधी पर्वा
केली नाही.
‘‘बरवे बरवे केले विठोबा बरवे। पाहोनि अंत क्षमा अंगी कांटीवरी मारविले।।
शिव्या गाळी नीत नाही। बहू फार विटंबिले।। तुका म्हणे क्रोधा हाती।
सोडवूनि घेतले रे।।’’ मंबाजीने काटेरीने तुकोबांना मारहाण केली आणि नीती
सोडून त्याने शिवीगाळ केली. बहू विटंबना केली. तरी तुकोबांनी क्रोध
आवरला. आपल्या सहनशीलतेची विठोबांनी परीक्षा पाहिली आणि त्यात आपण यशस्वी
झालो, असे तुकोबा म्हणतात. हाच तुकोबांचा गुण पुढे महात्मा गांधींच्याही
व्यक्तिमत्त्वात पाझरल्याचे दिसते.
‘‘सोज्वळ कंटकवाटा भावे करू गेलो रे। तुका म्हणे करूनि वेगळा केलो रे।।’’
भक्तांच्या मार्गी पसरविलेले काटे तुकोबांनी दूर केले म्हणून काटेरीने
मंबाजीने तुकोबांना मारले; परंतु भक्तांसाठी मार्ग मोकळा केल्याचे सुख
तुकोबांना अनुभवता आले. भक्तांच्या कल्याणासाठी तुकोबांनी कधी आपल्या
जीवाची पर्वा केली नाही. तरी मंबाजी हा नेहमीच आपल्याला त्रास का देतो
म्हणून तुकोबाही चिंताग्रस्त होते. खरेतर मंबाजी हा तुकोबांचा
प्रतिस्पर्धी नव्हता. तुकोबा भक्त तर मंबाजी लोकांना लुबाडणारा गोसावी
होता. अनेकदा तो तुकोबांच्या कीर्तनातही हजर असायचा. मंबाजी सुधरला,
असेही कधी कधी तुकोबांना वाटायचे; परंतु विंचवाच्या नांगीसमान असलेल्या
सर्वांगी दुर्जन असलेल्या मंबाजीने तुकोबांची वारंवार छळवणूक केली. फजिती
केली. ‘‘का होती का होती। देवा एवढी फजिती।।’’ असे तुकोबांना विठ्ठलाला
विचारावेसे वाटले. आपली कुठे चूक तर नाही ना झाली? आपलं मूळ वर्म तर नाही
ना चुकलं? मंबाजीला आपण भक्त समजलो ही आपली चूक झाली काय? असे विविध
प्रश्न तुकोबांना सतावीत होते; परंतु मंबाजीने जी फजिती -विटंबना केली ती
आता मागे पडली. उगीच आता मिथ्या गोष्टींची खंत तरी कशाला करीत बसायचे?
असे तुकोबांना वाटले.
शेवटी मंबाजीसारख्या दुर्जन लोकांची संगत यापुढे आपण करायची नाही, असे
ठरवून तुकोबा मंबाजीलाही विसरू पाहतात. अपमान, विटंबना व फजिती
झाल्यावरही आपणाला क्रोध आला नाही. आपण शांतपणे मूकपणे प्रतिकार केला.
आपल्या सहनशीलतेची ही परिसीमा होती आणि त्यात आपण पुरून उरल्याची भावना
तुकोबांना झाली होती. तुकोबांच्या सहनशीलतेचा हा त्यांच्या जीवनातील
उच्चांक होता.
(लेखक हे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक व संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.)