Thursday, 25 April 2019

SHETKARI SAHITYA SAMMELAN GADCHIROLI DR SANAP SPEECH II New25 FEB 2017







Ø  तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी
साहित्य संमेलन गडचिरोली

Ø  डॉ. तिसरे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून
केलेले भाषण-2

तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी
साहित्य संमेलन गडचिरोली या आदिवासी भागात दि. 25 फेब्रुवारी 2016  रोजी सुप्रसिद्ध शेतकरी साहित्याचे भाष्यकार, संघटक,
शेतकरी नेते, कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. डॉ.
अभय बंग यांनी संमेलनाचे उद्घाटन केले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर सानप तर स्वागताध्यक्ष
श्री शालिक पाटील नाकाडे होते. संमेलनात शेतकर्‍यांच्या आजच्या वर्तमान समस्यांचा वास्तविक
वेध सर्वच वक्त्यांनी घेतला. शेतकरी साहित्याचे प्रवर्तक व शेतकरी साहित्याचे भाष्यकार
व शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या गझल माझी
निराळी
या गझल काव्यसंग्रहाच्या तिसर्‍या आवृत्तीला डॉ. किशोर सानप यांनी प्रस्तावना
दिली व संमेलनात तिसर्‍या आवृत्तीचे व ई-आवृत्तीचेही प्रकाशन प्रमुखांच्या उपस्थितीत
पार पडले.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि नव्या पिढीचा अघोषित संप



डॉ. किशोर सानप


      आपल्या शेतकर्‍यांच्या पुढच्या पिढीने पुकारलेला अघोषित संप देशाला
अंधाराकडे घेऊन जाणारा असेल...शनिवार, दि. 18 फेब्रुवारी 2017 च्या लोकसत्तातील संपादकीय
अग्रलेखातून पहिल्यांदा कुण्या सांस्कृतिक जगात वावरणार्‍या कुबेराने जगाला आणि आपल्या
देशालाही धोक्याचा गंभीर इशारा दिला आहे. कुणीही अंतर्मुख व्हावे, अशीच आजच्या शेतीच्या
जगबुडीची अवस्था आहे. लगेच दि. 22 फेब्रुवारी 2017 च्याच अंकात; आयन रँड व भारतीय शेती  हा गिरधर पाटलांचाही लेख प्रकाशित झाला. जागतिकीकरणाचे
लाभ भारतातील शेतीला मिळाले नाहीत आणि जागतिकीकरण गुंडाळून, पुन्हा बंदिस्तीकरणाची
तयारी अमेरिका-ब्रिटनकडून सुरू असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. नव्या पिढीच्या
शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांची घराणी निर्माण करण्याची गरज असल्याचे रा. रा. कुबेरांनी
सूचवले; ते एकूणच शासकीय आणि सामाजिक वर्तमान ग्लोबल युगातील शेतीचा-परिस्थितीचा सर्वंकष
विचार करता; भारतीय शेतीजीवनाला नवसंजीवनी मिळणे अशक्यच असल्याचेही भाकीत, गिरधर पाटलांच्या
लेखातून व्यक्त झाले आहे; ते ही सहजच पटण्यासारखे आहे.
      शरद जोशी यांनी महाराष्ट्रातील कृषिजीवनात शेतकरी संघटेचे क्रांतिपर्व
निर्माण केले. पहिल्यांदा शेतकर्‍यांच्या आंदोलनाची  क्रांतिकारी ऊर्जा महाराष्ट्राच्या भूमीवर निर्मून
आणि पुढे गल्ली ते दिल्लीपर्यंत अनेक वर्षे जागती ठेवली. शेतीचे कायदे आणि शेतीची सबंध
व्यवस्थाच सरकार नियंत्रित करीत असल्यामुळे, भारतीय शेतीवरील सर्वच जाचक कायदे-बंधने
हटवून शेती पूर्णपणे मुक्त केल्यानेच ती जागतिकीकरणाच्या रेट्यात टिकू शकेल; असा आग्रहही
शरद जोशींनी केला होता. परंतु शेतकरी संघटना आणि महेन्द्र टिकैत, शरद जोशींच्या क्रांतिकारक
विचारांना तिलांजली देण्याचे राजकीय डावपेच यशस्वी झाल्यामुळे, भारतीय शेतकर्‍यांच्या
जीवनातील एकमेव आशेचीही ज्योत मालवली गेली. शेतकर्‍यांची व्होट-बँक देशातील मोठी व्होट-बँक
असल्यामुळे, पॅकेजच्या भुलथापांनी भारतीय शेती कायमच डायलीसीसवर राहिली. कृषी-कृषकांचे
अर्थशास्त्र अधिकाधिक बिघडतच गेले. भूसंपादन कायदे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राबवून, सेझ-कल्चर
सरकारनेच अस्तित्वात आणले. सक्तीने शेतजमिनी बळकावून शेतकर्‍यांना शेती-निकाला केले.
दुःखमुक्तीची मृत्यू-सेज बहाल केली. शेतीच्या बुडित व्यवसायात नवीन पिढीने येऊ नये
म्हणून शेतकर्‍यांनी आपली मुले शहरात शिकवून-शहरी नोकरीपेशात रुजवून-प्रसंगी शेतजमिनी
विकून, नव्या पिढीचे शेती कसण्याचे सर्वच रस्ते बंद करून टाकले. ही सर्व भूमीची दुर्दैवी,
अमानुष मशागत गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून आपल्या देशात सुरू असल्यामुळे, भारतीय जुन्या
पिढीतील मायबाप शेतकरी मोठ्याप्रमाणावर आत्महत्या करू लागले आणि नव्या पिढीने शेतीविरूद्ध
अघोषित संप पुकारून, पांढरपेशा समाजात आपलं जगणं सुकर करून घेतलं.
      लोकसत्तातून वारंवार कृषिजीवनाच्या महाविनाशाची चाहूल देणारे-हादरे
देणारे लेखन, निर्भयपणे प्रकाशित होताना दिसते. वर्तमानपत्रे ही केवळ चहा पिताना वाचण्यासाठी
आणि नंतर महिनाभराने दहा रूपये किलोने विकून पैसा वसूल करण्याचीच मानसिकता असलेल्या
समाज व्यवस्थेत; डोकेफूट प्रबोधनाने कोणत्याही क्रांतिच्या शक्यताच कधी निर्माण होताना
दिसणार नाहीत; अशीच गोळीबंद व्यवस्था बुर्ज्वा सुखवस्तू व्यवस्थाप्रिय लोकांनी-भांडवलदारांनी-सत्तापटूंनी
रुजवत आणलीच आहे. जगभर महाविनाशाचे हादरे बसत असतानाही आपण कसे शांत-स्वस्थच आहोत...मनातल्या
सुखवस्तू तलावात सारंकसं सामसूमच आहे...आपलं कशाशीच काही घेणंदेणं राह्यलं नाहीय. आपण
आणि आपला परिवार भला...पण, हे त्रिकालाबाधित सत्य नाहीच. ही मानसिकता क्षणकालातच नेस्तनाबूत
होण्याची दुःचिन्हे ठळकपणे जगभर दिसू लागली आहेत. जगबुडीत जगच बुडते. तेव्हा बुडत्याचे
पाय डोहाकडेच असतात...कुणीही वाचवायला मागंच उरणार नाही...जग अंधारात बुडू लागल्याचे
भाकित अमेरिकन-रशियन लेखिका आयन रँड यांनी सन् 1957 मध्ये लिहिलेल्या अ‍ॅटलास श्रग्ड
या फॅन्टसी-नॉव्हेलमध्ये मांडलेच आहे.
कृषिजगताच्या
नव्या पिढीने शेती न करता शेती विकून, शहरात नोकरी करण्याचा व्यवसाय स्वीकारला. शहरी
जीवनात सर्वच सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर गावगाड्यातून पांढरीला
विकून, शहरी स्थलांतरित झाल्याचेही वास्तव गेल्या तीनचार तरी दशकांपासून, शेतीच्या
घाट्याचे पोवाडे गात गातच नागरी समाजात स्थिरावल्याचेही ठळकपणे समोर आलेच आहे. एकप्रकारे
आपल्या मायबापांच्या आत्महत्याग्रस्त ग्रामजीवनाचे वास्तव लक्षात घेऊन, शेतीच न करण्याचा
विडा नव्या पिढीने उचलला आहे. नव्या पिढीने काही चूक केल्याचेही म्हणण्याची आज कुणाला
उजागीरी नाही. प्रकाशयुगातून अंधारयुगात उजळ माथ्याने प्रेवश केल्याचे धोके सबंध देशालाच
महाविनाशाच्या गर्तेत खेचणारे आहेत. अत्यंत कळवळ्यापोटी संपादक महाशयांनी अग्रलेखातून
समाजाला महाविनाशाची चाहूल तीव्रपणे करून दिली आहे. पेडन्यूज मीडियाच्याही युगात कुणीएक
संपादक मूल्यांची किंमत चूकवून, देशाच्या आणि शेतकर्‍यांच्या जगबुडीविषयी चिंता व्यक्त
करतो; तेव्हा शेतकर्‍यांची चिंता वाहणार्‍या समाजाने, शासनाने, कृषितज्ज्ञांनी, विद्यापीठ
आणि शास्त्रज्ञांनी, संघटनांनी, प्रधानमंत्री-अर्थमंत्री-कृषिमंत्री आदींनी वेळीच धोका
ओळखून, गंभीरपणे परिस्थितीचा अभ्यास करण्याची निकड असते. येऊ पाहणार्‍या महाविनाशाच्या
लाटांना थोपविण्यासाठी उपाय योजना करण्याचीही तत्काल गरज असते. अन्यथा, जमिनीच्या पोटातून
केव्हाही बाहेर पडून जगबुडीच्या अग्रभागावर संवेदनशीलपणे युगांताची वाट पाहातच सबंध
जग उभे असल्याची आयन रँड या लेखिकेची फॅन्टसी; विज्ञानाचाच नवा आविष्कार वास्तवात येण्याचे
सत्य नाकारता येणार नाही...जो न देखे रवी, वो देखे कवी...हेही कदाचित या जगाचे भविष्यच
असू शकेल!
      जगातील तमाम बुद्धिवंत, शास्त्रज्ञ, उद्योजक, कलावंत, साहित्यिक संपावर
गेले तर या जगाचे काय होईल?...काहीही होणार नाही. परंतु शेतकरी जर संपावर गेले तर मात्र
जगबुडी जरूर होईल! लोकप्रिय तत्त्ववेत्त्या आयन रँड यांनी अ‍ॅटलास श्रग्ड या कादंबरीतून
जगाला हीच धोक्याची सूचना दिली आहे. जगामध्ये संपत्ती निर्माण करणारी, समृद्धी आणणारी,
जगाला पोसणारी ही माणसे; ती एका क्षणी ठरवतात की, आता खूप झाले. यापुढे जगाला आपल्या
खांद्यावरून नाही वाहून न्यायचे.  एकेक करून
ते सारे आपले काम बंद करतात. जगाला, येथील एकमेकांवर जगणार्‍या बांडगुळाप्रमाणे जगणार्‍या
माणसांना लाथाडून दूर कुठे तरी आपल्या विश्वात निघून जातात...आणि सारे जग अंधारात बुडते...
या सत्याच्या जवळच आपण पोहोचलो आहोत. हे रा.रा.कुबेराचे भाकितही सूचकच आहे.
      शेतकर्‍यांची पुढची पिढी आज शेतातून निघून चालली आहे. ती शेतात राबण्यासाठी
येतच नाही. जेष्ठ शेतीसंशोधक एम. एस. स्वामीनाथन यांनीही गेल्या दहातरी वर्षांपासून
हेच सत्य वारंवार समाज-शासन व्यवस्थेसमोर मांडलेले आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार,
कनिष्ठ नोकरी-हे या देशातले जमिनीवरचे सत्य कधीच नव्हते. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून,
शेती फायद्यात आणण्याचे तंत्रज्ञान जर आधीच विकसित झाले असते; तर शेतकर्‍यांची घराणीही
शेतीत राबलीच असती. पांढरीतच दम तोडणार्‍या मायबापांनीही शेतीचा वारसा हसतखेळत मुलांना
बहाल केलाच असता! पण, वास्तव विपरितच अवतरले. मायबाप कंटाळून पांढरीतच गळफास लावून
जगनिकाला झाले. मुलांना वारसा देणारे हातच काळानं हिरावून घेतले. परिणामतः शेतकर्‍यांच्या
घरातून शिक्षित नव्या पिढीने, गावगाड्यात दम तोडून मरण्यापेक्षा, कनिष्ठ नोकरीचाच उत्तम
पर्याय स्वीकारला. शेतकर्‍यांच्या शिक्षित मुलांपुढे आज जगण्याचे समृद्ध पर्याय उपलब्ध
असताना; त्यांनी शेतीच का करावी? याचे उत्तर समाज आणि शासनाने आधी दिले पाहिजे.
      आम्ही मेंढरं मेंढरं यावं त्यानं हाकलावं, पाचा वर्षाच्या बोलीनं होते
आमचा लीलाव! कवी विठ्ठल वाघांच्या मेंढरं कवितेचेच जर वास्तव समाजात रुजले असेल; तर
शेतकर्‍यांच्या पुढच्या नव्या पिढीने शेती कसण्याविरूद्धच अघोषित संप पुकारला असेल;
तर त्याला जबाबदार कोण? संपादक महाशयांनी मात्र, शेतीच्या प्रश्नावर गेली दहा वर्षे
नुसती चर्चाच होत आहे. स्वामीनाथन यांनी शेतकर्‍यांचा विचार करून मांडलेले देशी धोरणही
धूळ पडून राहिले आहे. शेतकर्‍याला ना बाजाराचे स्वातंत्र्य आहे, ना सरकारचे संरक्षण.
आता मात्र गंभीर धोका लक्षात घेऊन सरकारने तरी जागे होणे गरजेचे आहे...हा गंभीर धोक्याचा
इशाराही दिला आहे. याचाही विचार किमान आपल्या देशातील समाज-शासन-तत्त्वज्ञ-शास्त्रज्ञ-पर्यावरणवादी-निसर्गवादी-सांस्कृतिक
क्षेत्रातील उमेदवारांनी-सेवाभावी संस्थांनी अग्रक्रमाने करण्याचीच ही खरी वेळ आहे.  
      समाज, शासन आणि सांस्कृतिक क्षेत्रांत कृषिजगताकडे कसे पाहिले जाते?
याचा आत्मशोध घेतला की  मुख्यत्वे ग्रामीण साहित्यातून
गावगाड्याचे आणि शेतकर्‍यांचे जीवन-वास्तव मांडण्याचा प्रयत्न खूप आधीपासूनच झालाय.
शेतकर्‍यांची भाषा, शेती, हालअपेष्टा, जीवन जगण्याची निसर्गशैली आदींचे चित्रण आभासी
परंतु मनोरंजनाच्या पातळीवर सुरूवातीला झाले, हेही खरे आहे. शेतकर्‍यांच्या जीवनशैलीला-जगण्याच्या
बोलीभाषेला नागरी लोक हसून भाषेची खिल्ली उडवतात, हेही खरे आहे. विनोदी साहित्य म्हणून
ग्रामीण साहित्याकडे पाहिले गेले, हेही खरे आहे. साठोत्तरी कालखंडात मात्र ग्रामीण
साहित्यातून गावगाड्याच्या अवकळाग्रस्त जीवनजाणिवांची वास्तवाभिमुख अभिव्यक्ती झाली,
हेही खरे आहे. कवी विठ्ठल वाघांची शेतकरी दिंडी, साहेबराव पाटील ही शेतकर्‍यांच्या
आत्महत्येची परखड मीमांसा करणारी कविता; हे साहित्यातील परिवर्तनाचे तरंग लक्षात घेतले
की; सबंध महाराष्ट्रातून साठोत्तरी काळात लिहित्या पिढीने, ग्रामीण साहित्याची परिमाणे
बदलत्या वास्तवानुसार समाजमनात पेरण्याची मौलिक कामगिरी केल्याचेही सत्य नाकारता येणार
नाही. साठोत्तरी कालखंडात उद्धव शेळके, रा. रं. बोराडे, आनंद यादव, कवी ना. धों. महानोर,
कवी विठ्ठल वाघ, सदानंद देशमुख, शेषराव मोहिते, भास्कर चंदनशीव, बाबाराव मुसळे, भारत
काळे, कैलास दौंड अशा काही मोजक्या खुद्द शेती कसणार्‍या शेतकरी साहित्यिकांनी मात्र
शेतकर्‍यांच्या जीवनाची वाताहत-आत्महत्या-दुष्काळ-शेतीचे बुडीत अर्थशास्त्र-जातवास्तव
अशा सर्वहारा अंगाने शेतकर्‍यांचे जीवन-वास्तव आपल्या सृजनशीलतेतून मांडल्याचेही दिसते.
परंतु साहित्यसृजनाने आंदोलन उभारून काही शेतकर्‍यांच्या हालअपेष्टा दूर केल्याचे उदाहरण
नाही. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने जी काही क्रांती महाराष्ट्राच्या शेती जीवनात
घडवून आणली, तेवढाच केवळ एक अपवाद आहे. बाकी तर, सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात,
वळं कलंडती असे कुठे गेले झंझावात...अळीमिळी गुपचिळी जगन्याची रीत झाली, निंघे अर्थाचं
दिवायं शब्दाची तं पत गेली...हेही सांस्कृतिकवास्तव-समाजवास्तव-शासनवास्तव कवी वाघांनी
मांडलेच आहे.
      मुळातच सृष्टीच्या जगद्व्याळात जन्मणार्‍या प्रत्येकाची नाळ सृष्टीच्या
पालनकर्त्या-पोषणकर्त्या-संतवृत्तीने बुडीत धंद्दाचा शेती-व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांशीच
जुळलेली असते. परंपरागत शेती कसण्याची पद्धत कालबाह्य झाली. परंपरागत शेतीत केवळ कर्जच
पिकते. पिकलेले भरमसाठ कर्ज स्वाभिमानी शेतकर्‍याला आत्महत्या करायला प्रवृत्त करते.
शेतकर्‍याचाच घास घेते, बळी घेते. शेती आणि नफ्याची सांगड घालणारे तंत्रज्ञान कार्पोरेट
अ‍ॅग्रीकल्चरने-सेझ कल्चरने ग्लोबल युगात अंमलात आणले आहे. तसे लहान लहान गटशेतीचे
प्रकल्प गावोगावी उभारून शेतीची लागवड केवळ नफ्यातच होईल, यासाठी शेती आणि शेतकर्‍यांसाठी
कळवळा असलेल्या शासनाने, समाजाने, स्वयंसेवी संघटनांनी निरपेक्ष पुढाकार घेण्याची आज
आवश्यक्ता आहे. कारण, शेतकरी हा सृष्टीतील चराचराला जगवणारा अन्नदाता आहे. तो नसला
तर ह्या सृष्टीचाही प्रलय अटळच आहे. शेतकरी जगला तर जग जगेल. शेतकरी मेला तर जगही मरेल!
शेतकरी आत्महत्या करतो, ही टोकाची निरिच्छाच त्याच्या अंतःकरणात का प्रवेश करते? याचाही
शोध घेण्याची गरज आहे.
      आज आपण भौतिक सुखसोयीत जगण्याच्या शैलीचे गुलाम झालो आहोत. आपल्याच
सुखाच्या वर्तुळात आपण जगतो. व्यवस्थाही सुखेनैव जगत आहे. जगातल्या तमाम समस्यांकडे
दुर्लक्ष झाले तरी त्यामुळे जगबुडी होणार नाही. परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे
सत्र जर असेच अखंड-अविरत सुरू राहिले, तर या सृष्टीला जन्माला घालणारे-सृष्टीचे पालनपोषण
करणारे लोकच ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये माणसांना जन्माला घालण्यासाठी भविष्यात शेष उरणार
नाहीत. मायबापच नसले तर माणसांच्या सृष्टीची उत्पत्ती तरी कशी होईल? हाच खरेतर ह्या
वर्तमानातला कळीचा मुख्य मुद्दा आहे...
      मुख्य मुद्दा हा आहे की, संतप्रवृत्तीने जगासाठी जगणार्‍या सृष्टीच्या
पालनहार्‍याविषयीचा खोलवरचा करुणाभाव-कर्तृत्वभाव-जग्गदाताभाव एकूणच सृष्टीला जगवणार्‍या
व्यवस्थेला कितपत जाणवला आहे? याचाच खरेतर शोध घेण्याची गरज आहे. असेही लक्षात येते
की, जगात शेतकर्‍यांविषयी केवळ कोरडी सहानुभूतीच शेष आहे. गांधीजींच्या तीन बंदराची
अवस्था जगभर दिसते आहे. शेतकर्‍यांविषयी काहीही बोलायचं नाही! शेतकर्‍यांच्या बुडीत
जगाविषयी काहीही ऐकायचे नाही! मृत्यूपंथाला कवटाळणार्‍या शेतकर्‍यांची मढीही पाहायची
नाहीत! समाज, शासन, साहित्य, संघटना अशा सर्वच स्तरांवर गांधीजींचे तीन बंदर सृष्टीच्या
तारणहार्‍याला केवळ वाकुल्या दाखवीत आहेत. मित्रहो, इतकी उदासिनता असेल, आपल्याच जन्मदात्याकडे
पाहण्याची तर या नव्या जगाला नक्कीच भवितव्य नाही...
      विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीने देशाचा विकास मोजला जातो, हीच मूलभूत
चूक आजवर आम्ही करीत आलो आहोत. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीलाही शेतकर्‍यांचीच मुलं
जगभर उपयोगी पडल्याचे वास्तव आहे. मायबाप शेतकर्‍यांची प्रगती झाली तरच त्यांची मुलं
ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत प्रगती करायला पुढे येतील. शेतीच्या तंत्रज्ञानाने-मार्केटिंगच्या
प्रयोगाने शेतीचा व्यवसाय नफ्यातच कसा आणता येईल? याचा आधी शोध घ्यायला हवा. शेतीचा
विकास हाच खरेतर उद्दोग-धंदे-विज्ञान-तंत्रज्ञानाचाही विकास मानायला हवा. कोणत्याही
देशाच्या विकासाचे मूलभूत स्त्रोत; कृषीक्षेत्र-सृजनशील जमीन-नैसर्गिक संपत्ती हेच
असते. कृषिवलांच्या भूमी-कृषिसह कृषिवलांची प्रगती; कोणत्याही देशाच्या प्रगतीचे मोजमाप
करण्याचेच मुख्य स्त्रोत असले पाहिजे. मापदंड असला पाहिजे. शेतकर्‍यांच्या आर्थिक आणि
सांस्कृतिक प्रगतीनेच; देशाच्या विकासाचे मोजमाप करण्याचा पायंडा कसा पडेल? याचीच चिंता
करण्याचा हा काळ आहे. शेती आणि शेतकर्‍यांकडे पाहण्याची उदासिन दृष्टीच मुळातून बदलायला
हवी.
      हा बदल हळूहळू समाजात रुजतो आहे. जगात सर्वात आधी परिवर्तन व्हायला
हवे असे हे शेतीचे मूलभूत क्षेत्र आहे. बाकी परिवर्तन आपोआपच होईल. आपल्या देशात-किमान
महाराष्ट्रातल्या काही भागात सेवाभावी कार्यकर्ते आणि आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या
मुलांनी शेतीच्या आर्थिक विकासाचे प्रयोग नेटाने सुरू केलेले आहेत. मराठवाड्यात काही
सामाजिक संघटनांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची
मुलं एकत्र करून; जनजागृती दिंडी दरवर्षी राज्यात 15 दिवस गावोगावी जाऊन शेतकर्‍यांना
जगण्याची हिंमत देताना-आमचे आईवडील सोडून गेले आणि आम्ही पोरके झालो. आईपासून दूर एका
आश्रमशाळेत शिकतो. तुमच्या मुलाबाळांची परवड होऊ नये असं वाटत असेल तर आत्महत्या करू
नका...तुमच्या मुलांना आश्रमशाळेत शिकावं लागू नये म्हणून तरी आत्महत्या करू नका...असा
संदेश देतात. ही लहान मुलं गावोगावी शेतकर्‍यांना शपथ देऊन त्यांच्याकडून, काहीही झाले
तरी आत्महत्या करू नका, असं वचन घेतात...ह्याही जागरण दिंड्या देशभर सतत निघत राहण्याचीही
गरज आहे. 
      गेल्या तीन वर्षांपासून दिंडीचा उपक्रम राबविणार्‍या त्र्यंबक गायकवाडांच्या
मते,  तशी मदत देणारे खूप आहेत. या मुलांना
त्रास होऊ नये म्हणून सर्वतोपरी सहकार्यही मिळतं, पण असं आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या
मुलांना सांभाळायचं काम पुढे उभंच राहू नये, अशी परिस्थिती निर्माण करणं आवश्यक आहे.
ते केवळ निसर्गावर अवलंबून नाही. त्यासाठी सरकारलाही नीट धोरणं आखावी लागतील...गटशेतीसाठी
काम करणारे भगवान कापसे यांच्या मते, बहुतांश आत्महत्या करणार्‍यांच्या शेतीचा आकार
आक्रसलेला असतो. तो वाढविण्यासाठी गटशेती हा अत्यंत चांगला मार्ग आहे. जालना आणि औरंगाबाद
जिल्ह्यात तीन हजार शेतकरी आता गटशेतीचा प्रयोग करीत आहेत. उत्पादन खर्चात होणारी बचत
आणि मालाला एकत्रित बाजारपेठ मिळत असल्याने अनेकांचे आयुष्य बदलू लागले आहे. काही नवे
प्रयोग करण्यासाठी व गावोगावी गटशेतीला प्रोत्साहित करण्यासाठी कार्यकर्ते निर्माण
व्हायला हवेत. तरच शेती परवडेल...शेतीसमस्या सोडविण्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या मुलांच्या
भवितव्यासाठी गावोगावी शेतीसमस्या सोडविणारे-शेती करणारे कार्यकर्ते व राबणार्‍याची
गरज आहे. (दिंडी चालली...पोरक्या मुलांची, शेतकरी जागृतीसाठी...रविवार लोकसत्ता, मुखपृष्ठावरील
वृत्तांत, दि. 15 जानेवारी 2017) गटशेती हा एक चांगला उपाय मराठवाड्यात सुरू आहे, तो
देशपातळीवर राबवायला समाज-शासन-संघटना-कार्यकर्ते आदींनी पुढे येण्याची गरज आहे.
      जेष्ठ गांधीवादी कार्यकर्ते, आयआयटी दिल्ली आणि चेन्नईत प्राध्यापक
राहिलेले, तामिळनाडूच्या गांधीग्राम आणि मध्य प्रदेशातील चित्रकूट विद्यापीठाचे कुलगुरू
राहिलेले सेवाभावी कार्यकर्ते डॉ. करुणाकरन वर्तमानात गांधीग्राम-वर्धा येथे स्थायिक
झाल्यावर त्यांनी स्मार्ट किसान कृतिकार्यक्रम आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांना
सोबत घेऊन वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात राबवला. 
डॉ. करुणाकरन या अभ्यासू माणसाच्या मते, आत्महत्या शेतकर्‍यांची नाही, तर शेतीची
होत आहे. एकही शेतकरी आपल्या मुलाला शेतकरी करण्यास तयार नाही. असे असेल, तर या कृषिप्रधान
देशाचे भवितव्य काय? शेती फायदेशीर आणि सन्मानजनक होत नाही, तोपर्यंत ती वाचणे कठीण
आहे. शेतीला वाचवले तरच शेतकरी वाचेल! शेती सन्मानजनक केली तरच शेतकर्‍यांची मुलंही
शेती करतील... यातूनच डॉ. करुणाकरण यांनी स्मार्ट शेती-स्मार्ट किसान योजना प्रत्यक्ष
अंमलात आणली. वर्धेजवळील दत्तपूर गावी महारोगी सेवा समितीच्या पडून असलेल्या 180 एकर
शेतजमिनीवर आत्महत्या करणार्‍या व इतरही दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या-शेतमजूरांच्या
मुलांना प्रशिक्षित करून, अ‍ॅग्रींडस(अ‍ॅग्रीकल्चर इंडस्टी)प्रकल्प उभारून,  शेतकर्‍यांच्या मुलांना स्मार्ट किसान बनवून; शेती
करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा विधायक आणि फायदेशीर शेती करण्याचा साक्षात उपक्रम
डॉ. करुणाकरन सेवानिवृत्तीनंतरच्या काळात सेवाभावीपणे राबवीत आहेत. डॉ. करुणाकरन आणि
स्वामीनाथन यांच्या शेतीला जगवणार्‍या पर्यायांची देशपातळीवर अंमलबजावणी करण्याचाही
शासकीय कार्यक्रम राबवला तर शासनालाही लालफितीत जिरणार्‍या अब्जावधी रूपयांच्या पॅकेजमधून
वाचणारा पैसा शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीच्या उपायांवर खर्च करून हरितक्रांतीची पुनरावृत्ती
करता येईल. पोकळ घोषणांनी या देशातील शेतकर्‍यांचे प्रश्न उलट गंभीरच होत गेले आहेत;
याचीही शासनव्यवस्थेने काळजीपूर्वक नोंद घ्यावी. सबंध देशातल्या शेतकर्‍यांच्या भरवशावर
शासनसत्ता टिकवणारे बहुसंख्य शेतकरी-मतदाताच जर, आयन रँडच्याअ‍ॅटलास श्रग्ड मध्ये सूचित
केल्याप्रमाणे, आपल्याच विश्वात निघून गेले! तर सत्ता तरी कुणावर गाजवायची? रिकाम्या
आणि ऐतखाऊ पांढरपेशांच्या बुर्ज्वा जमातीवर? की लालफितशाहीतल्या मगू्रर अधिकार्‍यांवर?...
      लोकसत्ताचे
वर्धाजिल्हा प्रतिनिधी, सुप्रसिद्ध पत्रकारमित्र प्रशांत देशमुख यांनी प्रत्यक्ष क्षेत्राचे
आणि प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षण करून लोकसत्ता मध्ये विस्तृत वृत्तांत देताना म्हटले,
शेतकरी आत्महत्या का करतात? काय आहे त्यांचे दुखणे? केंद्र आणि राज्य सरकारने आजवर
अब्जावधी रुपयांची पॅकेजे दिली. परंतु वाळूत पाणी टाकावे तसे त्या पैशाचे झाले. प्रश्न
जागच्या जागीच राहिला, का थांबत नाहीत शेतकर्‍यांच्या आत्महत्या? अनेकांच्या मनाला
या सवालांच्या इंगळ्या डसत आहेत. अनेक जण या ना त्या प्रकारे या प्रश्नाला भिडण्याचा
प्रयत्न करीत आहेत. डॉ. करुणाकरन हे त्यातलेच एक. त्यांनी या प्रश्नाचा आधी अभ्यास
केला आणि आपल्या परीने त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून उभे राहिले स्मार्ट
किसान असे उपक्रम आणि उपक्रमशील कार्यकर्ते पाहिले की आपल्या समोरील कलंकमुक्तीचे आव्हान
या महाराष्ट्राला नक्कीच पेलता येईल, असा विश्वास जागा होतो...(आव्हान कलंकमुक्तीचे...पेरणी
स्मार्ट किसानांची!...पत्रकार प्रशांत देशमुख, वर्धा, रविवार लोकसत्ता, पृष्ठ 6 वरील
सविस्तर वृत्तांत, दि. 15 जानेवारी 2017)
      डॉ. करुणाकरन यांचा स्मार्ट किसान प्रशिक्षण कृतिकार्यक्रम आणि कृषितज्ज्ञ
मा. स्वामीनाथन यांच्या उपाययोजनांना देशपातळीवर आणि राज्यपातळीवर केंद्र-राज्य सरकारनेही
राबवायला हरकत नाही. कृषीखात्याचे अधिकारी, मंत्री, पॅकेजेस, धोरणे म्हणजे; वाळूत पाणी
जिरवल्यासारखेच होणार. लालफितीपेक्षा डॉ. करुणाकरन, स्वामीनाथन आणि तत्सम सेवाभावी
कृषितज्ज्ञांची आणि संस्थांची शासकीय समिती बनवून; कोणताही सरकारी हस्तक्षेप न करता
जर शासनस्तरावर शेतकरी आणि शेती वाचवण्याचे आवाहन कळकळीनं शेतकर्‍यांविषयी आस्था असणार्‍या
व्यवस्थेनं जबाबदारीनं, निरपेक्षभावानं, अभ्यास करून यशस्वी केल्यानेच शेतीही वाचेल
आणि शेतकरीही जगतील. शेतकर्‍यांची मुलंही शेतीचा नफ्यात चालणारा व्यवसाय-उद्योग करण्यासाठी
पुढे येतील. देश आणि अन्नदाता वाचवण्याचे महत्कार्य मात्र सर्वच क्षेत्रांच्या अग्रणी
लोकांनी, मूलभूत शेतीच्या क्षेत्राला प्राथमिक मानून; अग्रक्रमाने केल्यानेच सृष्टीच्या
निर्मार्त्याला न्याय मिळण्याची शक्यता आहे. हे होणे गरजेचे आहे, इतके जरी आपल्या आयुष्यात
अग्रक्रमाने साहित्य-संस्कृतीत उमेदवारी करणार्‍यांनी, समाजसेवेत उमेदवारी करणार्‍यांनी;
सामाजिक व शासकीय स्तरांवर कार्य करणार्‍यांनी युद्धपातळीवर केले; तरी शेती वाचेल,
जगही वाचेल, शेतकरीही वाचतील, नवी पिढीही वाचेल, त्यांनाही शेतीचा कसदार जीवन जगण्याचा
वारसा पुढे नेता येईल...
    जगभरातल्या समाजाने, शासनाने, संघटनांनी, नव्या
पिढीने शेतकर्‍यांच्या आणि गावाच्या विकासासाठी विधायकपणे-अथकपणे-सेवाभावाने शेतीच्या
अर्थशास्त्राची आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोणातून पुनर्मांडणी इमानेइतबारे करण्याची
गरज आहे. तेव्हाच शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना पूर्णविराम मिळेल. तूर्त तरी आम्ही सर्वच
या भूतलावर अन्नदात्याच्या दयेनं जगणारी माणसं; 
महाविनाशाच्या ह्या युगात जगबुडीच्या भयाने, दहशतीने अस्वस्थच आहोत!...मार्ग
आहे. व्रतस्थपणे; साहित्य, संस्कृती, समाज, शासनाला स्मार्ट किसान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा
कृतिशील संदेश देण्याचाच केवळ...
      पुन्हा एकदा लालबहादूर शास्त्री-पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कृषिक्रांतीच्या
युगाची आठवणही आपण विसरायला नको. स्वच्छ भारत तेव्हाच निर्माण होईल; जेव्हा स्वच्छ-निकोप
दृष्टीने भारतीय शेतकर्‍यांच्या अवकळेचा कलंक समूळ पुसला जाईल!...हे करायचे की नाही?
याचाच विचार करण्याचे हे युग आहे...अर्थातच, जगबुडीची नांदी तर आपल्या शेतकर्‍यांच्या
पुढच्या पिढीने पुकारलेल्या अघोषित संपामुळे, देशाला अंधाराकडे घेऊन जाण्याची तीव्र
चाहूल तर लोकसत्तासारख्या निर्भय माध्यमांनी वर्तमानाला दिलीच आहे!... या निमित्ताने
तरी समाज जागरण होईल. समाज आणि शासनाची कुंठितावस्था दूर होईल. ती झालीच तर मात्र,
आपल्या कृषिप्रधान देशाला आणि कृषीवलांची काळजी घेणार्‍या समाज-शासन-सांस्कृतिक व्यवस्थेला
भवितव्य राहणार आहे!..अन्यथा; कुणाला कशाशीच काहीही घेणेदेणे शेष नसतानाच्याही ह्या
ग्लोबल काळात; जगाचे सर्वच जैविक व्यवहार रामभरोसे सुरळीत सुरूच असताना... जहाँ डाल
डाल पर सोने की चिडियाँ करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा;
ह्याच आभासी वास्तवात आजही आम्ही जगत आहोत... केव्हा जगबुडी येईल! त्याची वाटच आम्ही
पाहत आहोत...जय जवान! जय किसान!...















































-डॉ. किशोर सानप




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.