Friday, 4 January 2019


·        पद्मगंधा राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन, 29 व 30 डिसेंबर 2018
§  संक्षिप्त अध्यक्षीय भाषण-डॉ. किशोर सानप

भाषांचे ग्लोबलायझेशन झाले असून एकच एक ग्लोबल भाषेकडे हळूहळू जग सरकत आहे...

Ø म-मराठीचा हे बिद्रवाक्य : भाषामृत पसायदान वाटणारी चळवळ
  पद्मगंधा रौप्य महोत्सवी वर्षांत आयोजित साहित्य संमेलनातून मराठी भाषेचे संवर्धन, मराठी भाषेचे लावण्य, माधुर्य, गोडवा भारताच्या कानाकोपर्‍यात पोहोचावा यादृष्टीने माझा मर्‍हाटीचा बोलू कवतिके, परि अमृतातेही पैजा जिंके हे ज्ञानोबा-तुकोबा परंपरेतून पाझरत आलेले भाषामृताचे पसायदान वाटण्याच्या शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, या हेतूने यापुढे मराठी भाषेच्या स्वाभिमानाची व भाषेचे अस्तित्व टिकविण्याची चळवळ उभारणार आहे.
        म-मराठीचा, मी-मराठी, माझी-मराठी अशी जाणीवपूर्वक घोषणाही पद्मगंधाने केलेली आहे. मराठीच्या बाराखडीचाही आम्हाला विसर पडत चालला आहे. मराठी माणसाला आजच्या काळात म-मराठीचा, मी-मराठीचा, माझी-मराठी हे वारंवार सांगण्याची वेळ आली आहे.

Ø अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याच्या वल्गना वृथा आहेत 
        भाषा ही, साहित्य आणि संस्कृती निर्माण करीत नाही तर समाजाच्या सर्वच स्तरातले लोक भाषेची सतत निर्मिती करीत असतात. भाषा मरत नसतात. भाषा मारल्या जातात. भाषा जिवंत ठेवणारे मराठी भाषेचे खेड्यापाड्यांतून भाषा घडवणारे 72 टक्के लोकच खरेतर आम्हाला भाषा संवर्धनाचे पाठ देत असतात. आम्ही शिक्षित व साहित्य, संस्कृती, माध्यमात काम करणारी मराठी माणसेच मराठी भाषेचे मारेकरी आहेत.
        अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याच्या वल्गना वृथा आहेत. मराठी साहित्यिकांनी असे कोणते क्रांतिकारक व परिवर्तनशील साहित्य लिहिले आहे की जेणे करून मराठी लेखकाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचे जाणवते ? मराठी साहित्य म्हणजे, सारंकसं सामसुम तरंग नाही तलावात...अशीच स्थिती आहे.
        इतर भारतीय भाषांच्या तुलनेत मराठी साहित्यिक आपण भले आपले जग भले, यावृत्तीने स्वांतसुखायच आहेत. गुलामीच्या आणि अभिव्यक्तिच्या मुस्कटदाबीच्या वेदना आमच्या मराठी लेखकांनी सूतराम भोगलेल्या नाहीत. मराठी लेखक-कवींना आपल्याच प्रतिमेवर खुश असण्यातून बाहेर पडावे लागणार आहे.
Ø मराठी भाषेच्या अस्तित्वासोबत तिच्या टिकण्याचेही प्रश्न आज ऐरणीवर आहेत.
        मराठी शाळा महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही वर्षांत बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रात तर मराठी शाळांची स्थिती शोचनीय आहे. येत्या पाच-दहा वर्षांत औषधालाही मराठी शाळा महाराष्ट्रात शि‘कच राहणार नाही, अशीच व्यवस्था समाज व शासनस्तरावर साकार होत आहे.
        अभिजात भाषा हा प्रतिभावंत साहित्यिकांचा अक्षर आविष्कार असतो. प्रतिभावंत आपल्या युगाचे जगण्याचे प्रश्न सोडवत असतो. रामायण-महाभारपासून तर ज्ञानोबा-तुकोबांच्या संतकाळापर्यंतचा इतिहास साक्षीला आहे. आधुनिक काळापासून तर उत्तराधुनिक ग्लोबल काळात मात्र प्रतिभावंतांची भाषा, साहित्य, संस्कृती स्वनामधन्य व सन्मानहौसेच्या मोहाला बळी पडल्याचे दिसते.
अभिजात भाषेचा प्रश्न अजून सुटला नाही. अभिजात म्हणजे 2000 वर्षे प्राचीन व उर्जितावस्थेत असलेली भाषा होय. दर्जा केंद्रसरकार देते. तमिळ, संस्कृत, मल्याळम, उडिया ह्या चारच भारतीय प्रादेशिक भाषा अभिजात आहेत. अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार 300 ते 500 कोटी रूपये अनुदान देते. त्यासाठीच हा खरेतर मराठी अभिजात भाषेचाही अनुदानप्राप्तीचाच भाषा संघर्ष होय.
        सन् 2017-18 या शैक्षणिक सत्रापासून दिल्ली विद्यापीठाच्या आधुनिक भारतीय भाषा विभागातील बारा भाषांपैकी मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम भाषांमधले अभ्यासक‘म कायमचे बंद करण्यात आले आहेत. दिल्लीतून मराठी हद्दपार झाली आहे.
Ø सर्व भाषांचे ग्लोबलायझेशन   
        सर्व भाषांचे ग्लोबलायझेशन झाले असून एकच एक ग्लोबल भाषेकडे हळूहळू जग सरकत आहे. उद्याचा काळ भाषा विनाशाचा ग्लोबल काळ आहे. आम्ही मराठी भाषेचा अर्थ आणि वापरही आज गुगलवर शोधतो. गुगल ही जिवंत भाषा होत आहे तर बाकी सर्व भाषा गुगलच्या कैदेत गुलामीने मुक्तीदात्याचा शोध घेत आहेत.
Ø युगलेखक व्यक्ती ते समष्टीच्या अवकाशात साहित्याची निर्मिती करतात.
        आमचे मराठी साहित्यिक अभिजात साहित्याची नव्हे तर केवळ आपल्या व्यक्तीगत जीवनाच्या उदात्तीकरणाचेच साहित्य निर्माण करताना दिसतात. समष्टीचे वैभव व सौंदर्य साहित्यिकांनी जाणून घ्यायला हवे. मराठीत साने गुरुजींच्या पठडीतले संस्कारक्षम व चारित्र्याची जडणघडण करणार्‍या साहित्यांची निर्मिती खुंटली आहे. शुभांगीताईंसारेखे वामनराव चोरघड्यांच्या संस्कारक्षम साहित्यसृजन परंपरेतले साहित्यिक अलिकडच्या काळात अपवादच मानले पाहिजेत.
        वाचन संस्कृती व नवीन पिढी घडवणार्‍या साहित्याची निर्मिती साहित्यिकांनी करणे गरजेचे आहे. वाचन व प्रकाशन व्यवसाय बुडत चाललाय. त्याला जसे शासन व समाज जबाबदार आहेत,तसेच ग्रंथनिर्मिती करणारे लेखक-प्रकाशक-ग्रंथालये-अभ्यासक्रमातील मिळमिळितपणाचे साहित्यही जबाबदार आहे. याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा.
Ø भारतीय शेतकर्‍यांच्या आत्महत्या : जगबुडीचा धोका
        सन् 1995 ते 2016 पर्यंत एकूण 22 वर्षांत भारतातील एकूण 3,33,398 शेतकरी-शेतमजूरांनी आत्महत्या केल्या. याचाच अर्थ दरवर्षी सरासरीने भारतात 15,155 शेतकरी व शेतमजूर आत्महत्या करून भूमीवर सृजनाचे कष्ट करणारं जीवन संपवतात. नॅशनल क‘ाईम रेकॉर्ड्स ब्युरोनं वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. अर्थातच ही सरकारी आकडेवारी आहे. ती पुरेशी विश्वसनीय कुणीही मानत नाही. 
         नेटवर श्री मुजफ्फर हुसेन या अभ्यासकाने सर्वेक्षण केल्यानुसार 1995 ते 2011 पर्यंत भारतात एकूण 7,50,860 शेतकरी व शेतमजूरांनी आत्महत्या केल्याची माहिती दिलेली आहे. पैकी एकट्या सधन व विकसित शेती असणार्‍या महाराष्ट्रात याच काळात एकूण 50,860 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. अनुक्रमे महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश मध्ये सर्वाधिक जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. नंतरच कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ मध्ये परिस्थिती बिकट होत गेली. खरेतर भविष्यातील जगबुडीची ही सूचनाही आहे.
        भारतात शेतीवर आधारित लोकसंख्या 70 टक्के असून, त्यापैकी एकूण 11.2% पेक्षाही अधिक शेतकरी व शेतमजूरांनी आत्महत्या केल्याचे नॅशनल क्राईम ब्यूरोनेच सांगितले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान व उद्योगप्रधान देशात सन् 2018 मध्येही जवळपास 2 कोटी लोक दररोजच उपाशी असतात. त्यांना दोनवेळचं अन्नही मिळत नाही. आपल्या शेतकर्‍यांच्या पुढच्या पिढीने पुकारलेला अघोषित संप देशाला अंधाराकडे घेऊन जाणारा असेल... नव्या-जुन्या पिढीने शेतीचा व्यवसायच बंद केला आहे. 70,00,000 शेतकर्‍यांनी शेती करणे बंद केले आहे.
         आमचे तुकोबा मढे झाकुनि करिती पेरणी कुणबियांचे वाणी लवलाहे असे म्हणायचे तर आमच्या महाराष्ट्रातल्या कवी-लेखकांनी मात्र, मढे दाखवूनि करिती सृजन मराठी साहित्याचे, यापेक्षा वेगळे वास्तव साहित्य व संस्कृतीने का निर्माण केले नाही? हे असेच चालत राहिले तर सृष्टीच्या विनाशाचीच ती नांदी ठरेल. शासनाला कळत नाही. लेखक-कवींनी शासनावर लेखणीचा दबाब का आणू नये? आंदोलन का करू नये? केवळ कोरडी साहित्य निर्मिती म्हणजे समाजाच्या तोंडाला पाने पुसणे आहे.


Ø शब्दात अनुबॉम्बपेक्षाही अधिक ऊर्जा आणि शक्ती असते
        सृष्टीच्या पोशिद्यांचे जगण्यामरण्याचे प्रश्न मनाच्या तळठावातून आम्ही आपल्यासमोर मांडतो आहोत. आज मराठीतल्या सारस्वतांना जगाच्या उद्धारासाठी कटीबद्ध राहून कवी नरेन्द्रासारखे नैतिकता आणि प्रतिभेचे नाते जपण्याची गरज आहे. सर्वच प्रकारच्या भाषिक-सामाजिक-सांस्कृतिक जुलुमशाहीच्या विरोधात साहित्यिकांना शब्दांचीच शस्त्रे यत्ने करून साहित्यसृजनाचे उत्तरदायित्व पार पाडावे लागेल. शब्दात अनुबॉम्बपेक्षाही अधिक ऊर्जा आणि शक्ती असते, हे सारस्वतांनी ओळखायला हवे.
        संत कबीर आणि संत तुकोबांनी शब्दांची ताकद ओळखली होती. शब्दांचा प्रसंगी शस्त्रासारखाही वापर लेखकाला करावा लागतो. समाजातील पाखंड आणि ढोंगी बहुरूप्यांच्या शल्यचिकित्सेसाठी शब्दांचा एल्गारही पुकारावा लागतो. देतो तिक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. ही लेखकाची भूमिका असावी.   
Ø शब्द सत्ताधिशांचे आणि लक्ष्मीपुत्र भांडवली व्यवस्थेचे भाट बनू नयेत
      शब्द सत्ताधिशांचे आणि लक्ष्मीपुत्र भांडवली व्यवस्थेचे भाट बनू नयेत. तर शब्द हे सामाजिक  व धार्मिक रोगांची कठोर शल्य चिकित्सा करणारे असावे. समाजाच्या शरीराला झालेला दुर्धर आजार दुरुस्त करणारे आणि समाज स्वास्थ्यासाठी औषधोपचार करणारेही असावे लागतात. यासंदर्भात संत कबीर म्हणतात,
                  सब्द सब्द कोई कहे । सब्द को न हातपाव ॥
                  कोई सब्द औषधी करे । कोई करे घाव ॥
         माझीये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥  माझे सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगे ॥ शब्दांकडे पाहण्याची शालिनता, विनम‘ता कवी-लेखकांजवळ असायला हवी. शब्दप्रभूंनी शब्दांचा अहिंसात्मक वापर करावा. शब्दप्रसूतीचा वृथा अभिमान बाळगू नये. अहंकार, अभिमानानं लेखक नॉर्सिसस बनतो. तो मग समाजाचा लेखक नसतो. तर तो आपल्याच प्रतिमेत दंग होणारा सालोमालोच असतो. तुकोबांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास-
                  आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचिच शस्त्रे यत्न करू ॥
                  शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे धन वाटू जन लोका ॥
                  तुका म्हणे शब्द हाचि देव । शब्दे गौरव पूजा करू ॥
Ø जगण्याचे चैतन्य निर्माण करणारी अमोघ ऊर्जा साहित्यात असते
      समाजातील सर्वच बाजूनं अनाथ, उपेक्षित झालेल्यांच्या मनात जगण्याचे चैतन्य निर्माण करणारी अमोघ ऊर्जा साहित्यात असते.  सामाजिक प्रश्नांची चिंतनशील मांडणी विविध वाङ्मय प्रकारांतून करताना, समाजाची मनं सुसंस्कृत व ऊर्जादायक करण्याचेही मु‘य साधन साहित्य हेच आहे. समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यमही साहित्यच आहे. माणूस सर्वप्रथम कळतो तो प्रतिभावंताला. माणसाचं दुःखही प्रथम कळतं तेही प्रतिभावंतालाच. करुणा आणि प्रेम या अमृतानुभवाने माणसांना घडवतो तोही प्रतिभावंतच. प्रतिभावंत हे खरेतर लेखक-कवी-विचारवंत-शास्त्रज्ञ-सुधारक-परिवर्तनवादी-प्रगतीशील-सर्वहारांच्या उद्धाराचे पसायदान जगाला वाटणारे जगनियंता असतात.
        प्रतिभावंताजवळ प्रतिभेचा तिसरा डोळा असतो. तिसर्‍या डोळ्यातून पाहिलेल्या मानवी जगाचे स्वप्न त्याला वर्तमानातच समाजाच्या भूमीत पेरायचे असते. साहित्यिकालाही उद्याच्या जगाचे भवितव्य आजच आपल्या सृजनशील प्रतिभेच्या मुशीतून शब्दसंहितेच्या निर्मितीने आजच जगाला दाखवायचे असते. संतकाळात ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस, याच वारकरी संत परंपरेनं हजार वर्षांच्या काळात निर्माण झालेले मानसिक व भौतिक प्रश्न भक्ती चळवळीच्या द्वारा सोडविल्याचा इतिहास आजही साक्षीभूत आहे.
        आधुनिक काळातले म्हणजेच 19-20 व्या शतकातले प्रश्न महात्मा फुले-सावित्रीबाई-ताराबाई शिंदे-पंडिता रमाबाई-शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-गोखले-आगरकर-टिळक-नेताजी-महात्मा गांधी-गाडगे बाबा-राष्ट्रसंत तुकडोजी-पंजाबराव देशमुख-कर्मवीर भाऊराव पाटील-विठ्ठल रामजी शिंदे-महर्षी धोंडो केशव कर्वे-रवीन्द्रनाथ टागोर-बाबा आमटे-अब्दुल कलाम आझाद-मदर तेरेसा-मेधा पाटकर आदींनी सोडविण्यासाठी आपलं जीवन सर्वस्व समाज आणि देशाच्या जनतेला समर्पित केलं.
        बिकट व पतनशील वर्तमान सांस्कृतिक व्यवस्थेत प्रतिभावंताला आपल्या लेखनस्वातंत्र्याचं, प्रतिभेचं, नैतिकतेचं सत्व अबाधित राखून लिहिता आलं, तरच कदाचित वर्तमानातही अक्षरकृतीचे सृजन करता येणे शक्य आहे. त्यासाठी तरी सारस्वतांना; अणूरेणूया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ ही आत्मस्फोटक अनुभूती नाही का येऊ शकणार? शब्दांची हृदयभेदी-हृदयस्पर्शी शस्त्रे आपल्याला नाही का तयार करता येणार?
Ø  तमाम लेखक-कवी-वाचक-विचारवंतांनी थोडेसे कोषातून बाहेर पडावे
        तमाम लेखक-कवी-वाचक-विचारवंतांनी थोडेसे कोषातून बाहेर पडावे. लोकांच्या हृदयासी संवाद साधावा. साहित्यात क्रांतीची ताकद असते. लोकांमध्ये क्रांतीची मानसिकता सबळ करण्याची ताकद शब्दच देत असतात.
Ø संभवामि युगे युगे...
        खरे तर प्रतिभावंत युगनायक आणि महानायक पुन्हा पुन्हा जन्माला येतात. कधी ते कृष्ण असतात तर कधी ते संत कबीर असतात. संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम असतात. कधी ते गाडगे बाबा-तुकडोजी महाराज म्हणून जन्माला येतात. संभवामि युगे युगे...हीच खरं तर प्रत्येक युगाला तारणारी सृष्टीच्या निर्मात्यांची गर्जना असते. प्रत्येक कालखंडात युगनायक प्रतिभेचा तिसरा डोळा उघडून, जगातल्या पाखंडांचा विद्ध्वंस करतात.         
  एकविसाव्या शतकातही विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो...जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात...दुरितांचे तिमिर जावो...खळांची व्यंकटी सांडो...जगात सत्य, न्याय, बंधूभाव, सेवाभाव, स्वातंत्र्य आणि समता नांदो...हेच विश्व कल्याणाचं पसायदान महानायक मागतात. आजही युगपुरुषांचंच पसायदान हिंदुस्थानासह जगातही सत्य-अहिंसा-शांती-समता-बंधूभावाची प्रतिष्ठापना करणार असल्याचा विश्वास आम्ही बाळगायला हवा.
Ø पद्मगंधा प्रतिष्ठानच्या विचारपीठावरून...
        मानवी जीवनाला महा-विनाशाच्या चक्रव्यूहातून वाचविण्याचा संदेश, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनातून आपण जगाला देवू या...

-डॉ. किशोर सानप
मानेवाडा बेसा रोड, 249/ए, दिविशा,
शाहू नगर, नागपूर-440 034
PHONE- 9518368976, 9326880523
dr.kishorsanap@gmail.com

     



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.