सूर्योदय सर्वसमावेश मंडळ, जळगाव
अष्टपैलू पद्मश्री डॉ. भवरलाल जैन एक दिवशीय मराठी साहित्य
संमेलन,
अध्यक्षीय भाषण-डॉ.किशोर सानप
दिनांक 24 फेब्रुवारी 2019
जळगाव
जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील वाकोद या लहानशा खेडेगावी (12 डिसेंबर 1937) भाऊंचा
जन्म झाला. वाणिज्य व कायदा या दोन्ही विषयात पदवी घेतल्यावर त्यांनी भारतीय प्रशासनिक
सेवा अधिकार्याची (डेप्युटी कलेक्टर) नोकरी नाकारून ’खेती भविष्य का पेशा है’ हे मानून
भाऊंनी आपल्या शेती-उद्योगमय जीवनाला प्रारंभ केला. वडिलोपार्जित शेती करण्याचा, कष्ट
करूनच जगण्याची तयारी भाऊंनी केली. आरामदायी चाकरी, सुखी जीवनाचाही त्याग केला. भारतातील
शेतकरी हा अर्धपोटी उपाशी राहून, कष्ट करून मानवी समाजाच्या उदरनिर्वाहाची तजवीज करतो.
शेतकर्यासारखेच मानवी सृष्टीच्या संगोपन व पालनपोषणाचे व्रत, उमेदीच्याच काळात भाऊंनी
अंगिकारले. मूलतः भाऊ गांधीवादी. जैन धर्माने मानवी समाजासमोर जगण्याचे आदर्श तत्त्वज्ञान
ठेवले; उदाहरणार्थ, सत्य, अहिंसा, शांती, अपरिग्रह, अनेकांतवाद आदींचे आचरण आयुष्यभर
भाऊंनी केले आहे. भाऊ म्हणजे बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले; या निकोप, विशुद्ध
भावस्थितीत जगणारे ’आधुनिक युगातील शेतकर्यांचे संत’ होते. 25 फेब्रवारी 2016 ला भाऊ अनंतात विलिन झाले. 70 वर्षांच्या आयुष्यात भाऊंनी
महाराष्ट्रासह भारतीय शेती व औद्योगिक व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तने घडवून आणली. भाऊ
जागतिक स्तरावर दुसर्या क्रमांकाच्या सूक्ष्म सिंचन उद्योगाचे निर्माते व जैन इरिगेशन
सिस्टिम लि. चे संस्थापक व प्रवर्तक म्हणूनही प्रख्यात आहेत. गांधीतीर्थचेही संस्थापक
म्हणून गांधींचा शोध घेणारे भाऊ जगाला माहित आहेत. भाऊंच्या जीवनाचे सारतत्त्व संत
तुकोबांच्या एका अभंगातून लक्षात घेता येते.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारें । उदास विचारें वेच
करी ॥
उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगील
जीव खाणी ॥
परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रिया सदा
बहिणी माया ॥
भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन
वनामाजी ॥
शांतीरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी
महत्त्व वडिलांचे ॥
तुका म्हणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद
बळ वैराग्याचे ॥
भाऊ
: अभिजात सृजनशीलता
भाऊंच्या
व्यक्तिमत्त्वाला अभिजात सृजनशीलतेचे अनोखे पैलू लाभले. शेती-उद्योग-शिक्षण-आर्थिक
विकास आदींमधून भाऊंची सृजनशीलता ओतप्रोत वाहताना दिसते. खानदेशसारख्या दुष्काळी भागात
राहून, शून्यातून शेती व उद्योगांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कार्य करणारे भाऊ म्हणजे
जगासमोर एक आदर्श वस्तूपाठ आहेत. मुळातच भाऊ शेतकरी असल्यामुळे शेती आणि शेतकर्यांचा
सर्वंकष आर्थिक विकास हेच एकमेव सूत्र भाऊंच्या उद्यमशीलतेमागे व सृजनशीलतेमागे होते.
शेतकरी हा उद्योजक असावा, हे स्वप्न भाऊंनी शेती व उद्योगाच्या विकासाचे विश्व जैन
समूहाच्या रूपात साकार करून दाखविले. काळ्या दगडालाही पाझर फोडून, शेतीच्या सृजनाची
तहान भागवण्याची अतूट जिद्द भाऊंनी प्रत्यक्षात साकार केली. आपल्या देशातील शेतकर्यांना
जागतिक बाजारपेठेत नेण्याचे स्वप्नंही भाऊंनी साकार केले. निर्यात बाजारपेठेत फळांची
थेट निर्यात सुरू केली. शेतकर्यांच्या मालाला हमीभाव मिळवून दिला. शेतीउत्पन्नातील
जुगार भाऊंनी बर्याच प्रमाणात बंद केला. एकेकाळी उजाड व पाण्याची वानवा असलेला डोंगर
भाऊंनी घेतला व तिथे जैन हिल्स उभारून या डोंगरावरून खानदेशात हरित क‘ांतीची आश्चर्यकारक
सुरुवात केली. शेतकर्याला उद्योजक बनवले. शेतीत नवेनवे प्रयोग केले. शेतकर्यांच्या
भल्यासाठी शास्त्रशुद्ध व अद्ययावत प्रयोगशाळा सुरू केल्या. जळगावात आंतरराष्ट्रीय
स्तरावरील सिंचन परिषदेचेही आयोजन केले.
भाऊ
: प्रतिभा व नैतिकतेचा समृद्ध आविष्कार
भाऊंच्या
मनात एक सृजनशील प्रतिभावंत नैतिकतेने कार्यरत राहिला. खरेतर भाऊंमध्ये कृषी व उद्योगात
नवनिर्मितीचे प्रयोग यशस्वी करणारा शिस्तबद्ध व द्रष्टा नियोजक व शास्त्रज्ञ दडलेला
आहे. भोवतालातल्या आपल्या माणसांच्या दुःखमुक्तीचे पर्याय शोधणारा संवेदनशील कवीही
लपलेला आहे. गांधीवादी दृष्टीने वैष्णवजनांची पीडा दूर करणारा संतही दडलेला आहे. माणसाशी
सुसंवादी राहून, त्याचे प्रश्न समजून घेत, त्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा मनस्वी माणूसही
लपून बसलेला आहे. भाऊ विचारवंत, प्रतिभावंत, कवीवृत्तीचे संवेदनशील लेखकही होते. एक
कलावंत व कलांची कदर करणारा रसिकही भाऊंच्या व्यक्तिमत्त्वात नांदताना दिसतो. सृष्टीला
हिरवे व सृजनसन्मुख करणार्या सृजनाच्या अनेक शक्यतांनी भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाला
सतत अंतर्मुख केल्याचेही दिसते. इतके असूनही कुठलाही दूराभिमान व अनाठायी स्वाभिमान
भाऊंनी कधी बाळगला नाही. कुणीही असो, कोणताही भेदभाव न करता, भाऊंनी दोन्ही हात जोडूनच
अभ्यागतांचे स्वागत केलेले आहे.
भाऊंनी
जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये उदाहरणार्थ, ‘‘ परिवार-समाजकारण-राजकारण-नीतिशास्त्र-मैत्री-धर्म-विज्ञान-कला-साहित्य-संस्कृती
इत्यादीमध्ये रस घेतला. त्या सर्वांवर सखोल निरीक्षण, विचार केला. जे काही बरेवाईट
घडले, अनुभवले त्यातून अधिकाधिक समृद्ध व परिपक्वच होत गेले. जन्मापासून मिळालेले सृजनशीलतेचे
अंकूर विकसित होत गेले. निष्पक्ष, निर्मल दृष्टी, संवेदनशीलता, व्यापक चिंतन, उदार
दृष्टिकोण आणि अलिप्त वृत्ती या गुणांनी अंगी असलेल्या नवनवोन्मेषशाली सृजनक्षमतेला
उत्तम खत-पाणी दिले. त्यामुळेच भवलालजींची सृजनक्षमता प्रत्येक क्षेत्रातच वृद्धिंगत
व समृद्ध होत गेली.’’ सुंदरलालजी मल्हारा यांनी
भाऊंच्या सृजनशील व्यक्तिमत्त्वाचे अचूक महात्म्य उद्धृत केले आहे.
भाऊंनी
पडित जमिनीला सृजनक्षम केले. नापिक जमिनीला पाणी पुरवून, तिलाही उत्पादनक्षम केले.
भूमी व पाण्याच्या सृष्टीत मुक्तपणे विहार करणार्या भाऊंनी खरेतर भारतीय शेती व उद्योगक्षेत्रात
जल- क्रांती केली. आर्थिक क्रांतीच्या
अडलेल्या पायवाटा मोकळ्या केल्या. तात्पर्य, जैन व्हॅली म्हणजे भाऊंच्या भव्यदिव्य
कल्पकतेचे उदात्त शिखर होय. जैन समूह म्हणजे भाऊंच्या द्रष्टेपणाने व साधनशुचिता व
कार्यशुचितेचे साक्षात्कारी उदाहरण होय. नैतिकता व प्रतिभेचा अन्योन्य आविष्कार ही
भाऊंची खाजगी व सार्वजनिक, व्यावसायिक जीवनाचीही कर्तव्यनिष्ठ शैली होती.
गांधीतीर्थ
: विवेक आणि अध्यात्माचा वैज्ञानिक साक्षात्कार
गांधीतीर्थ
हे जळगावच्या जैन व्हॅलीवर स्थित विवेक, विज्ञान आणि अध्यात्माचे गांधीवादी विचारांचे
जागतिकस्तरावरील खुले विद्यापीठ होय. भाऊंच्या स्वप्नातील सुंदर आणि अद्वितिय असे गांधी
विचार व संशोधनाचे तीर्थक्षेत्र आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे भाऊंनी गांधीतीर्थ
व म्युझिअम साकार केले. 25 मार्च 2012 रोजी तत्कालिन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई
पाटील यांच्या हस्ते गांधीतीर्थचे रितसर उद्घाटन झाले. भाऊंच्या मते, ‘‘ गांधीजींचे
हे तीर्थ! तीर्थ या शब्दात एक शक्ती आहे. पिढ्यांपिढ्या या वास्तूचे मांगल्य कायम राहावे
यादृष्टीने गांधीतीर्थ असे नाव दिले आहे. माणसापेक्षा माणसाने केलेल्या कामाकडे पाहून
माणसाची ओळख पटावी. गांधीजींच्या सद्विचारांचा प्रवाह मला कुठपर्यंत ओढत नेईल ते मला
आज सांगता येणार नाही. पण त्या विचारांनी प्रेरित होऊन मी तसे वागायला सुरुवात केली
आहे. त्यातूनच या गांधीतार्थ घराचे निर्माण आहे. कमावलेला सगळा पैसा समाजाकडूनच मिळाला
आहे तो समाजालाच परत करीत आहे. आपण सगळेच गांधीजींबद्दल विचार करणारे लोक, प्रबोधन
व चर्चा यात आघाडीवरच असतो. परंतु आधी काम करावे आणि मगच त्याविषयी बोलावे याच हेतूने
गांधीतीर्थ साकार करताना त्याविषयी बोलताना समाधान वाटते.’’ भाऊंनी धनाचा अनादर केला
नाही. परंतु धनाची आसक्ती आणि लालसाही बाळगली नाही. गांधीजींनीही लोकनिधी उभारून जनचळवळी
चालविल्या. धनाबद्दल कधी आसक्ती बाळगली नाही. हाच अनासक्ती व अपरिग‘हाचा गांधीमार्ग
भाऊंनी आयुष्यभर निष्ठेनं जोपासला होता.
भाऊ
: जीवन घडविणारे विचारपीठ
‘‘
ईश्वराने इतरांच्या पीडा आणि दुःख दूर करण्यासाठीच माणसाला हृदय दिले आहे. आपल्या शब्दांमुळे
आणि कृतीमुळेच आपले किंवा इतरांचे भले होऊ शकते. विचार अभिव्यक्तीसाठी शब्द हे केवळ
माध्यम आहेत तर आपले विचार आपल्या अंतरात्म्याचा आवाज असतो. ईश्वराकडे गेल्यामुळेच
मी यशस्वी झालो हे मला अजिबात मान्य नाही. या संपूर्ण जगामध्ये जी ’सुपर पॉवर’ आहे
ती निर्माण करणार्या यंत्रणेला जर तुम्हाला ईश्वर म्हणायचे असेल तर माझा ईश्वरावर
शंभर टक्के विश्वास आहे. अशक्य कोटीतील असलेली गोष्ट जे लोक खरी ठरवितात, त्यांनाच
आपण संत किंवा महात्मा म्हणावे. आपण सगळ्याच लोकांसोबत सहकार्याचे, समानतेचे, मित्रत्वाचे
वातावरण निर्माण करू शकलो तरच आपण चिरस्थायी समृद्धीची वाटचाल करू शकतो. आंतरिक बदल
घडवून आणला की बाहेरील बदल आपोआपच घडेल. ’’
सेवा
करणे हा पवित्र आणि श्रेष्ठ मार्ग आहेच, सोबतच सुखसमाधानाचाही निरामय मार्ग आहे. आयुष्याच्या
रणांगणावरील महाभारत टाळायचे असेल तर स्वतःबद्दल जास्त विचार न करता इतरांबद्दल जास्त
विचार करा. विज्ञानाने बुद्धी विशाल व धारदार होते तर अध्यात्माने हृदय व आत्माही सुसंस्कारित
होतो. त्याग आणि तपश्चर्येला प्रामाणिकपणाची जोड दिली तर एक व्यक्ती सुद्धा संस्थेएवढं
मोठं काम करू शकेल. आपली सद्सद्विवेक बुद्धी जागरूक आणि निष्कलंक असली तर इतर आपल्याबद्दल
काय विचार करतात? याची फिकिर करण्याची गरज नाही. कठीण समस्येवर निर्विकार व सोपा मार्ग
शोधायचा असेल तर संतांच्या मधुर उपदेशवाणीचे श्रवण करावे. त्यातूनच अध्यात्म आणि वास्तवाचा
मिलाफ असलेला मार्ग मिळतो.
मंदिर
हे जीवजीवांना जोडण्याचे उत्तम साधन असून, विवाह हा केवळ दोन आत्म्यांचा संगम नसून
सृष्टिनिर्मितीचेही बीजारोपण होय. भाऊंनी आपल्या लेखनातून व भाषणातून मांडलेली ही सद्विचारसृष्टी
म्हणजे साक्षात भाऊंच्या जगण्याचे आणि अनुभवाचे कृतिशील व कर्तव्यदक्ष भावनेतून समाजासाठी-देशासाठी
भाऊंनी आयुष्यभर जे जे उत्तम व उत्कृष्ट कार्य केले त्यातूनच समाजाच्या तळागाळातल्याही
लोकांना विवेक-अध्यात्म-विज्ञान यांच्या समन्वयातून आपले व इतरांचे तसेच सबंध सृष्टीचेही
जीवन योग्य दिशेने घडविता येते, याचाच हा भाऊंनी समाजाला दिलेला विचार-पाठ होय. बोले
तैसा चाले आणि अनुभव येथे व्हावा शिष्टाचार या संत तुकोबावृत्तीचेही भाऊ आधुनिक काळातील
विवेकशील व सृजनशील असे समाजादर्श घालून देणारे व्यक्तिमत्त्व होते.
भाऊ
: काळी माती, पाणी आणि सृजनशीलता
भाऊंचं
नातं काळ्या मातीला अधिकाधिक सृजनशील करण्याशीच अतूटपणे जुळलं. मातीशी पाण्याचा संपर्क
आला की माती सृजनशील व उपजाऊ होते. भाऊ केवळ सृजनाच्या परंपरागत पद्धतीवर अवलंबून न
राहता, सृजन म्हणजे नवनिर्मिती होय, असे भाऊ मानत होते. जे आहे त्यापेक्षा जे अस्तित्वातच
नाही अशा विशेष नवनिर्मितीला भाऊंनी महत्त्व दिले. नाविण्याचा ध्यास भाऊंना होता. निसर्ग
जसे सृष्टीच्या सौंदर्याचे निरंतर सृजन करते तसेच भाऊंसारखी सृजनशील माणसे सुद्धा मानवी
समाजाला सुखी, आनंदमय, समृद्ध करण्यासाठी सृजनाचे नवनवोन्मेषशाली प्रयोग करीत असतात.
नाविण्याचे आणि सौंदर्याचेही सृजन करीत असतात. भाऊंनी उमेदीत खनिज तेल व पेट्रोलच्या
लहानशा व्यवसायाने प्रारंभ केला. चाकरी न करता लोकांच्या सुखासाठी ’सृजनाची चाकरी’
भाऊंनी केली. भाऊंनी एक जुनी बंद पडलेली आजारी फॅक्टरी विकत घेतली. जगात सर्वश्रेष्ठ
अशा पपईच्या दुधापासून बनवलेले पपेन हे निर्यातक्षम उत्पादन लोकप्रिय केले. भाऊंनी
पीव्हीसी पाईप्सच्या उत्पादनातही सृजनशील दातृत्वाचा परिचय दिला. गोरगरीब शेतकर्यांना
ठिबक सिंचनाद्वारे उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर करण्याची सेवा रुजू केली. केवळ चारच
वर्षांत भारतीय स्तरावर पाईप विक्रीचा उपक्रम राबवला.
भूमिपुत्र
असलेल्या भाऊंनी सबंध भारताला सुजलाम सुफलाम करण्याचेही स्वप्न जैन इरिगेशन सिस्टिम
लि. ची स्थापना करून पूर्णत्वास नेले. सृजनाच्या दुर्दम्य व कष्टसाध्य महत्त्वाकांक्षेमुळे
काही वर्षांतच भाऊ ट्रॅक्टर, मोटारसायकल, बी-बियाणे, खते, पाईप, कीटकनाशके, फोमशीट,
टिश्यू कल्चर, सोलर हिटर, लिक्विड फर्टिलायझर्स, ग्रेनाईट उत्पादन, हायड्रोजनसह पपेनची
निर्यात करून शेती उत्पादनाचे प्रांतीय-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अधिकृत व
विश्वासार्ह उद्योजक बनले.
भाऊंनी
सन् 1963 पासूनच शेतीची उद्योगाशी सांगड घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला खते, बी-बियाणे,
जंतुनाशके, ट्रॅक्टॅर्स, सिंचनासाठी लागणारे पंप आदींच्या वितरणाचे कार्य केले. महाराष्ट्र-गुजरात-मध्यप्रदेशातील
सुमारे 2500 शेतकर्यांना पपईची शेती करण्यास प्रवृत्त केले. पपईच्या दुधापासून प्रकि‘या
करून पपेन नावाचं एन्झाइम तयार करून सन् 1978 ते 2002 पर्यंत 100 % निर्यात केली. पपेन
हेच पहिलेवहिले शेती आधारित निर्याताभिमुख पहिले भारतीय उत्पादन होते. 1980 पासून शेती
सिंचनासाठी पीव्हीसी पाईप्स बनविण्यास प्रारंभ केला. महाराष्ट्रासह इतरही प्रांतात
तळागाळापर्यंत पीव्हीसी पाईप्स वाजवी दरात पोहोचवल्यामुळे सन् 1980 साली 500 मे. टन
विकले जाणारे हेच पाईप्स सन् 2008 मध्ये 1,20,000 मे.टनपर्यंत विक्री वाढली. 150 आस्थापने
अस्तित्वात आली. पीव्हीसीच्या वापरामुळे पाणी वाहून नेताना पाण्याचे नुकसान टळले. पाणी
बचतीमुळे शेतकर्यांच्याही सुबत्तेत वाढ झाली.
जैन
इरिगेशनने ठिबक सिंचन क्षेत्रांत प्रवेश करून शेती उद्योगात अभूतपूर्व क्रांती घडवून
आणली. शेतकर्यांना प्रशिक्षित करणे, शेतकर्यांच्या दारोदारी जाऊन ठिबक सिंचनचा प्रसार
प्रचार झाल्यामुळे सरकारी अनुदानही शेतकर्यांना उपलब्ध करून देण्यात भाऊंचा सिंहाचा
वाटा आहे. सन् 2008 मध्ये जेमतेम 600 हेक्टर्स असलेलं ठिबक सिंचनाचं क्षेत्र 2008 मध्ये
9 लाख हेक्टर्सवर पोहोचले आहे. दरवर्षी 1 लाख हेक्टर्सची भर पडत आहे. महाराष्ट्रातील
जळगावात केळीसाठी, नाशिकमध्ये द्राक्षांसाठी, सोलापूर जिल्ह्यात डाळिंबांसाठी तर विदर्भात
फलोद्यान, मराठवाड्यात कपाशी, पश्चिम महाराष्ट्रात ऊसासाठी, गुजरात व मध्यप्रदेशात
मिरची व बटाट्यांसह देशातील एकूण 45 पिकांसाठी प्रामु‘याने ठिबक सिंचनाचाच वापर केला
जातो.
महाराष्ट्रासह
गुजराथ व मध्यप्रदेशातील शेतीचा कायापालट भाऊंनी विविध जलवाहक तंत्रज्ञानाने केला आहे.
जगाच्या ठिबक सिंचन नकाशावर भारताला दुसर्या क‘मांकाचे स्थान मिळवून देण्यात भाऊंच्या
जैन इरिगेशन समूहाचा सिंहाचा वाटा आहे. खरेतर भाऊ म्हणजे शेतीतील जल व जैव तंत्रज्ञानाच्या
मूलगामी शोध व कृती यांचे मसिहाच आहेत.
‘ग्रँडनैन’ नावाची उती सवर्धित केळी रोपांची नवी
जात व्यापारी तत्त्वावर संशोधित करून ह्या जातीची ताजी परिपक्व केळी निर्यात करण्याचा
प्रारंभही भाऊंनीच केला. भाज्यांचे निर्जलीकरण व फळ प्रकि‘या कारखान्यातही भाऊंच्या
जैन समूहाने सुमारे 150 कोटींची भांडवल गुंतवणूक करून फळे भाज्यांच्या नव्या जाती विकसित
करून, शेतकर्यांच्या उत्पन्नात तर वाढ झालीच आहे परंतु निर्यातीमुळे देशाच्या विदेशी
मुद्रेच्याही उत्पन्नात वाढ झाली.
तात्पर्य,
भाऊंच्या यशोगाथेची पाळेमुळे शेती संस्कृतीत केलेल्या क्रांती मध्ये शोधावी लागतात.
गोरगरिब शेतकर्यांना माफक दराने शेतीपुरक साधने पुरविली. गोरगरीब शेतकर्यांच्याही
जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली. जैन उच्च-तंत्र
शेती संस्थानाद्वारे शेतमालाचे संशोधन, विकास व प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि विस्तार
केंद्र, पडिक जमिनीचा विकास, नापिक जमीन लागवडीखाली आणणे, मृदसंधारण, डोंगराळ व खडकाळ
जमिनीवर लागवड करणे, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, जलसंधारणाचे व्यवस्थापन, खत,
पाणी, हरितगृहे व त्याच बरोबर सेंद्रिय आणि जैव खते तसेच जैव-किटकनाशके हे सर्व एका
छत्राखाली आणून, भाऊंनी शेती आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून
आणली. भाऊंचे सर्वच व्यवसाय व संशोधन-प्रशिक्षण संस्था शेती व शेतकर्यांच्या सर्वंकष
विकासाशी निगडित आहेत. तनमनधन झोकून भाऊंनी शेती व शेतीनिष्ठ उद्योगांची आधुनिक विज्ञान
व तंत्रज्ञानाशी सांगड घालून, भारतीय ग्रामीण व कृषी जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून
आणली.
भारतीय
शेती अर्थव्यवस्थेचा मूलभूत पाया मानून सर्व उद्योगांची जननी ही शेती-उद्योगच असल्याचे
भाऊंनी जाणले. शेतीला उद्योग मानून शेती-उद्योगांचा पाया त्यांनी रचला. जळगाव परिसरातील
बंजर भूमीलाही सृजनशील भूमीमध्ये, उपजाऊ जमिनीमध्ये परिवर्तीत केले. जळगावला जलसाठा
उपलब्ध करून देणार्या योजना यशस्वी केल्या. भाऊंनी प्रथम वाया जाणार्या पाण्याचं
ऑडीट करून खानदेशचा चेहरामोहरा ग्रीनरी व वाहत्या पाण्यानं उजळून टाकला. पुढे महाराष्ट्र
व देशाच्या इतर प्रांतांना व्यापत भारतीय शेतीत जल-क्रांती घडवून आणली. जैन हिल, जैन
व्हॅली, जैन फूड पार्क हे भाऊंनी फुलवलेले नंदनवन आजही त्याचे साक्षीदार आहेत. शेतीच्या
विकासासाठी आयुष्यभर अनेक संशोधन प्रकल्प राबवले.
पाणी हेच शेतीचेही आणि माणसाचेही जीवनामृत आहे, हे भाऊंनी जैन इरिगेशन सिस्टम
लि.ची स्थापना करून व महाराष्ट्रासह देशातील तहानलेल्या शेतीला ठिबक सिंचनाची संजीवनी
दिली. पावसाचे पाणी अडवणे व पडित जमीन लागवडीखाली आणणे, जैविक व सेंद्रिय खतांचा शेतीसाठी
वापर करणे, वनीकरण व पर्यावरण संवर्धन, फळ आणि भाज्या प्रक्रिया व निर्यात, मनुष्यबळ
सशक्तीकरण करून शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भाऊंनी आयुष्यभर कार्य केले.
भारतीय
पारंपरिक शेतीचा चेहरामोहरा भाऊंनी बदलून टाकला. शेतीची गुणवत्ता व उत्पादन क्षमता
वाढविण्यासाठी उच्च तंत्रज्ञान विकसित केले. मूलभूत व उपयोजित शेती संशोधन आणि प्रात्यक्षिकांद्वारे
शिक्षण, प्रशिक्षण, प्रदर्शने आदी मार्गांनी गावोगावी विस्तार कार्यक्रम राबविले. विविध
पडित जमिनींना लागवडीखाली आणून वनशेती, फळबागायतींची लागवडीची कामे केली. पावसाच्या
पाण्याचं पुनर्भरण करून पाण्याची पुनर्प्राप्ती आणि पुनर्भरण यंत्रणा, मृदसंधारण, जलसंधारणाच्या
योजना राबवून पडित जमिनीचे हरितीकरण घडवून आणले. सुयोग्य शेती तंत्रज्ञानाचा प्रचार
प्रसार करून ग्रामीण समृद्धी घडवून आणण्यातही भाऊंचा वाटा आहे.
भाऊंच्या
शेती व पाणी नियोजनामुळे 50 लाख शेतकरी कुटुंबांना आर्थिक लाभ मिळून, त्यांच्या उत्पन्नात
व राहणीमानात सुधारणा झाली. सुमारे 250 नवीन उद्योजकांनी प्रेरणा घेऊन भाऊंच्या औद्योगिक
मॉडेलनुसार आपल्या औद्योगिक प्रकल्पांची रचना केली. भाऊंच्या उद्योगप्रवण प्रेरणेने
स्वयंरोजगार-शेतीपुरक लहानमोठ्या उद्योगात 2 कोटी माणसे लाभदायक कामात गुंतली. पाणी
व वीज यांच्या बचतीद्वारे प्रतिवर्षी सुमारे 18,000 कोटी पेक्षाही अधिक बचत झाली.
प्रगत
शिक्षणाची संस्कारक्षम नांदी : अनुभव शाळा
भाऊंच्या
मते, ‘‘ भविष्याचा विचार जिथे सुरू होतो तेथे शाळा ही
संस्था सर्वप्रथम समोर येते. घराला जशा चार भिंती तशाच शिक्षणाच्या यशातही व्यवस्थापन,
पालक, पाल्य आणि समाज हे चार पिल्लर महत्त्वाचे असतात.’’ विद्यार्थ्यांची मने संवेदनशील
करता यायला हवीत. जीवनातील दुःखाशी समरस होता आले पाहिजे आणि आनंदाचाही अनुभव घेता
आला पाहिले. बालकांना केवळ दोनच भाषा कळतात. राग आणि प्रेम. शिक्षकांच्या जागलेपणात
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची ज्योत प्रज्वलित होत असते म्हणून शिक्षकाची भूमिका विद्यार्थी
घडवण्यात महत्त्वाची असते. वरिष्ठ नागरिक हे अनुभवसंपन्न ज्ञानपीठच असतात. जीवनात निर्माण
झालेले संभ‘म केवळ हेच अनुभवी नागरिक दूर करू शकतात. समाजाने त्यांना दिपस्तंभ मानून
त्यांचा योग्य सन्मान-सत्कार केला पाहिजे.
भाऊ
अत्यंत काबाडकष्टानं शिकले. गरिबीतून मार्ग काढला. प्रतिकूल परिस्थितीवर सदैव मातच
केली. समाजात व्यावसायिक नीतिमत्तेचा आदर्श घालून दिला. भाऊ म्हणजे, मातीतून सोने काढण्याची
जिद्द बाळगणारे द्रष्टा होते. प्रचलित शिक्षण पद्धतीत श्रमाला महत्त्व नसल्याचं अनुभवून
भाऊंनी बी. कॉम., एल. एल. बी. असे दुहेरी पदवी शिक्षण घेऊनही नोकरीतून करिअर उभे केले
नाही. भाऊ परिवर्तन व जीवनाला सुंदर करणार्या सर्व क्षेत्रात मुक्त संचार करणारे व
शोधकदृष्टीचे भविष्यनिर्माता होते. नवीन पिढीला अनुभवाधारित शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी
’अनुभव शाळा’ ही अभिनव शैक्षणिक संकल्पना आपल्याच जैन समूहामधून साकार केली.
अनुभव
शाळेतून गुणी, कुशल, चांगली माणसं घडावी या हेतूने भाऊंनी गोरगरिबांच्या मुलांपासून
तर मध्यमवर्गीयांच्या मुलांनाही अनुभव शाळेत प्रेवश दिला. बालवाडी, माध्यमिक, उच्च
माध्यमिक ते महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था ह्या अनुभव शाळांमधून करून देण्यात आली.
यासंदर्भात भाऊ म्हणतात, ‘‘ खरं म्हणजे एखादी संस्कारी, सुंदर शाळा हे माझ्या
आयुष्यातलं खूप वर्षांपासूनचं स्वप्नं होतं. जे काही करायचे ते उत्तमच करायचे नाहीतर
करायचेच नाही ही माझी सवय आहे...शिक्षण क्षेत्रात मी एकाला घडवू शकलो तर अनेक पिढ्या
घडू शकतील या हेतूनेच शिक्षणाला प्राधान्य दिले. शिक्षण झाल्यावर विद्यार्थ्यांना विशिष्ट
असं कौशल्य प्राप्त होईल. त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना आमच्या सेवाभावी किंवा औद्योगिक,
व्यावसायिक प्रकल्पांमध्ये सामावून घेण्याचाही प्रयत्न करू. शिक्षणापासून तर कामापर्यंत
अशी ही ’एकात्मिक शिक्षण योजना’ आहे.
जो
मोठी स्वप्ने पाहू शकत नाही, तो मोठा होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहायला
शिकवणार आहोत. आम्ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचं सोनं करू शकतो. हे जगासमोर ठेवायचं
आहे. ही मुलं गरिबांची असूनही आमच्या नातवांपेक्षा चांगलं काम करू शकतात, हे उदाहरण
कुठेतरी निर्माण केलं पाहिजे. या उदात्त हेतुने अनुभव शाळेची सुरुवात करायची आहे. संस्कार,
अभ्यास, आदर्श ह्या तीन जबाबदार्या पालकांनी पार पाडाव्या. बाकी उत्तम आचार, विचार,
संस्काराचं जीवनशिक्षण आम्ही त्याला देऊ. किती कठोर परिश्रमाने कितीतरी लोकांनी हा
संसाराचा गाडा गरिबीतूनच इथपर्यंत आणला. तुम्हालाही आत्मविश्वास असायला पाहिजे की भाऊंसारखा
माणूस जर वाकोद खेड्यातून येऊन हे विश्व सुंदर करू शकतो तर तुम्ही तर जळगावसार‘या शहरात
असताना हे का करू शकणार नाही.’’ भाऊंनी पाल्य,
पालक व समाजालाही उदात्त हेतूने सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी शिक्षण हा सर्वोत्तम
मार्ग असल्याचे सांगितले. भाऊंनी सामाजिक ऋणमुक्तीला जीवनात सर्वात वरचे स्थान दिले.
समाजाचे ऋण एवढे मोठे असते की आपण अंशतः परतफेड करण्याचाच प्रयत्न करू शकतो. जो दुसर्यांसाठी
जगतो त्याला महात्मा म्हणतात. जो दुसर्यांवर विजय मिळवतो त्याला वीर म्हणतात. जो स्वतःवर
विजय मिळवतो त्याला महावीर म्हणतात. ह्या सर्व महापुरुषांच्या कसोट्यांवर गांधीजींसारखे
महामानव खरे ठरतात. खरेतर ’भाऊ आधुनिक युगातील दुसरे गांधी’ होते.
पाणीटंचाई
: मानवी समाजाच्या असंतोषाची नांदी
जल
व संस्कृतीचा अनुबंध अतूट असतो. पाण्याला आपण जीवन मानतो. भारतीय संस्कृतीत पाण्याला
ईश्वर मानले जाते. जिथे पाण्याचा प्रवाह तिच्या काठाने मानवी वसाहती व संस्कृती जन्माला
आल्या. पाणी हेच मानवी संस्कृतीच्या स्थापनेचे, विकासाचे आणि र्हासाचेही मूळ कारण
आहे. जलाशयात गाळ साचने, भयंकर पूर, पाण्याचा खारटपणा, अतीव वृक्षतोड, पर्यावरण विनाशा
व प्रदूषणामुळे जगातल्या अनेक वाहत्या नद्या नष्ट झाल्या. सरस्वती नदीला लागून असलेली
विकसित भारतीय पुरातन संस्कृती इसवी सनापूर्वी सहा हजार वर्षे अस्तित्वात होती. नंतर
धरणीकंप व पर्यावरणीय असमतोलामुळे सरस्वती नदी लय पावली. सुमेरीयन संस्कृती टायग्रिस,
युफ्रेटिस नद्यांच्या खोर्यांमध्ये इसवी सनापूर्वी चार हजार वर्षे अस्तित्वात होती.
तीही नद्यांनी प्रवाह बदलल्यामुळे नष्ट झाली. इजिप्शियन संस्कृतीचा र्हास झाला. तीही
नाईल नदीच्या अवतीभोवती इसवी सनापूर्वी चौतिसशे वर्षे नांदत होती. नद्या नष्ट झाल्याने
जगातच प्रगत संस्कृतीची जागा वाळवंटाने घेतली आहे.
भूतलावर
आणि त्याखाली असणारी प्रत्येक वस्तू, पदार्थ हा मानवाच्या चैनीसाठी व उपभोगासाठी आहे,
या मूलतत्त्वावर पाश्चात्य संस्कृती उभी आहे. पाणी हे केवळ खनीज असून, त्याचा मुक्त
वापर मानवाने केला पाहिजे, असे ही संस्कृती मानते. ग्लोबल जगातही तिचा अंमल आहे. आपण
पाश्चात्य उपभोगवादी व पर्यावरणविनाशवादी संस्कृतीचे अंधानुकरण करीत आहोत. परिणामतः
जगातच नैसर्गिक उत्पातांचे प्रमाण वाढत चालले आहे. धरणीकंप, चक्रीवादळ, अतिवृष्टी,
त्सुनामी, रासायनिक अपघात आदी संकटांमुळे जागतिक पातळीवरील हवामान बदल या सर्वांवर
मात करीत आहेत. आज आपण पर्यावरण व प्रदूषणाच्या भहाभयानक मृत्यूच्या भोवर्यात सापडलेले
आहोत. मानवी विनाशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण वेळीच जागरूक होणे
गरजेचे आहे.
भारतात
ब्रिटिश कालखंडापूर्वी सुमारे दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी पाण्याचे व्यवस्थापन समाजपातळीवर
होत असे. तलाव व सरोवरांमध्ये जलसाठवण होत असे. भूजल पुनर्भरणासाठीही व्यवस्था असे.
अंदाधुंद वृक्षतोडीवर बंदी होती. समाजाच्या गरजा सुद्धा माफक होत्या. ’जिथे गाव तिथे
पाणी पुरवठा’ असा दंडक होता. भारतात जगाच्या तुलनेत लोकसं‘या सुमारे 17 टक्के असून
पाण्याची उपलब्धता मात्र केवळ 4 टक्केच आहे. जमिनीची उपलब्धता अडीच टक्के आहे.
जगातील
एकूण पाणीवापरापैकी घरगुती वापरासाठी सरासरी केवळ आठ ते दहा टक्के पाण्याचा वापर होतो.
कारखानदारीसाठी 18 ते 20 टक्के पाणी वापरले जाते. शेतीसाठी सुमारे 70 ते 75 टक्के पाणी
वापरले जाते. शहरातील सांडपाण्यापैकी 100 टक्के पाणी वाया घालवण्यात भारताचा उच्चांक
आहे. भारतातील कारखान्यामध्ये वापरल्या जाणार्या पाण्यापैकी पुनर्वापराचे प्रमाण केवळ
पाच टक्के असून एकूण 95 टक्के पाणी वाया जाऊन घातक पद्धतीने भूगर्भाच्या पाण्यात मिळसते.
ह्या प्रदूषित पाण्याच्या झिरपण्याचे अनेक दुष्परिणाम पर्यावरणात असमतोल निर्माण करतात.
भूगर्भातले पाणीच प्रदूषित व घातक होऊन मानवी समाजाच्या मृत्युला कारणीभूत ठरते.
जगात
22 देश मुळातच दरडोई प्रती वर्षी 1,000 घनमिटर या आवश्यकतेपेक्षाही कमी पाण्यात आपली
गरज भागवत आहेत. तीव्र व भयंकर पाणीटंचाई अनुभवत आहेत. सन् 2025 पर्यंत हीच स्थिती
कायम राहिली तर जगाच्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के अर्थात चारशे कोटी लोक पाणीटंचाईचे
भक्ष्य बनतील. भारताची लोकसं‘या सन् 1947 मध्ये 35 कोटी होती सन् 2007 मध्ये 110 कोटीपर्यंत
पोहोचली. 1947 च्या तुलनेत झालेली पाण्याची घट 80 टक्के असल्यामुळे आपण सन् 2007 पासूनच
आवश्यकता, वापर, अपव्यय झपाट्याने वाढल्यामुळे आपण भयावह अशा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर
उभे आहोत. समाज जर पूर्वीसारखाच पाण्याच्या
वापराबाबत उदासिन आणि बेफिकीर राहिला तर समाज जीवन विस्कळित, विस्फोटक होईल. हा अत्यंत
धोकादायक भिषण पाणीटंचाईचा इशाराही भाऊंनी जैन हिल्सवरील जागरण या ग्रंथातून जगाला
दिलेला आहे.
या
परिस्थितीत आपण नजीकच्या काळात खूप मोठे बदल घडवून आणू शकत नाही. लोकसंख्या वाढीचा
दर कमी करणे ही लोकशाही राज्यपद्धतीला न पेलणारी गोष्ट आहे. हे गृहित सत्य मानूनच पाण्याच्या
वापरात व साठवणूकीत बदल करूनच आपण येत्या काळातील भीषण पाणीटंचाईचा सामना करू शकतो.
याकरीता पावसाचे जवळपास 90 टक्के पाणी वाहून
समुद्राला मिळते. परिणामतः ओल्या व कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. ’नदीजोड
प्रकल्प’ हा एकमेव उपाय भाऊंनी सुचवला आहे. पाण्याची पश्चिम व दक्षिण भारतातील वाणवा
आणि उत्तर व पूर्व भारतातील नद्यांच्या महापूराचा धुमाकूळ लक्षात घेता, या दोन्ही विभागांना
नदीजोड प्रकल्प जोपर्यंत आपण राबवू शकणार नाही तोपर्यंत पाणी नियोजनाला योग्य दिशाही
देता येणार नाही. घरगुती वापराकरीता शहरात वापरले जाणारे पाणी जर बचतीने व नियोजन करून
वापरले तर तेच पाणी खेड्यापाड्यातल्या लोकांची तहान भागवू शकेल.
शेतकामासाठी
वापरल्या जाणार्या पाण्यामध्ये किमान पन्नास टक्के बचत करणारे व शेतीचे उत्पादन वाढवणारे
शास्त्र, तंत्र, यंत्र, साधन सामग्री सूक्ष्म सिंचनाद्वारे यशस्वीरित्या जगात राबवली
जाते. इस्त्रायल या देशात जवळपास 100 टक्के जमीन सूक्ष्मसिंचनाद्वारे सिंचित केली जाते.
एकूण दरडोई पाण्याची उपलब्धता वर्षाला केवळ साडेचारशे घनमिटर असूनही इस्त्रायल शेतमालावर
प्रक्रिया करून निर्यात करू शकतो. हे केवळ प्रगत तंत्रज्ञानाच्या व सूक्ष्मसिंचनामुळेच
शक्य झाले आहे. भाऊंनीही सूक्ष्मसिंचनाचा आदर्श भारतीय शेती व उद्योग जगतात निर्माण
करताना पाण्याच्या घरगुती वापराच्याही नियोजनाविषयी देशाला गंभीर चिंतन करायला बाध्य
केले आहे.
शेतीत बचतीने नियोजन करून पाणी वापरले तर कमी
पाण्यात जास्त पिके घेता येतील. जैविक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, विशिष्ट पिकांचे उत्पादन
वाढवणे, अधिक पाणी पिणार्या पिकांच्या उत्पादनात घट करणे, जमिनीची धूप टाळून ओलावा
कायम राहण्यासाठी उपाययोजना करणे, शेतीत पाणी वाहून नेताना पाण्याचा अपव्यय टाळून पीव्हीसी
पाईप्स व ठिबक सिंचनचा वापर करणे अशा विविध पाणी नियोजन व व्यवस्थापनामुळे शेतीच्या
पाणी वापरात बचत करता येते. भाऊंच्या मते, ‘‘ पाण्याचे
परस्परसंबंध आई आणि अपत्याच्या संबंधाएवढे जवळचे असतात.’’
मोठी धरणे ही अनिवार्यच आहेत. परंतु नियोजन प्राधान्यक्रम
बदलणे गरजेचे आहे. आजच्या धरण विकास प्रकल्पामुळे आर्थिक विषमतेची दरी केवळ वाढली नसून
तिची खोलीही वाढत आहे. ही दरी सामाजिक अशांततेची ठिणगी ठरू शकते. राज्याराज्यातील पाणीटंचाईच्या
समस्या व पाणी वाटपाची भांडणे साक्षीला आहेतच. आपल्या देशातील शेकडो वर्षांपासून प्रचलित
असलेल्या पाणलोट विकास पद्धतीत कालानुरूप बदल करून, पाणलोट विकासाबरोबर वनीकरणाचाही
उपक‘म राबवला तर पुनर्भरणासाठी अधिक उपयुक्त होऊ शकते. नियोजनाचा प्राधान्यक्रम बदलून
क्षेत्रीय पाणलोट विकास तसेच वनीकरण, शेततळे, गावतळे, पाझर तलाव, लहान तलाव या सर्वांची
मालिका तयार करून मोठ्या धरणांचेही नियोजन करता येणे शक्य आहे. यामुळे स्थानिक पाणी
उपलब्धतेच्या समस्या दूर होतीलच परंतु शेततळे, गावतळे, नालाबांध यामुळे पाण्याचे न्याय्य
वाटप करण्यासही मदत होईल.
खरेतर
पाण्याची उपलब्धता व पाण्याचा सुनियोजित वापर या दोन्ही मूलभूत मानवी जीवनाला घडवणार्या
बाबी राजकीय इच्छाशक्तीवर निर्भर आहेत. आपल्या देशात ’पाण्याचे राजकारण वा राजकारण्यांचे
पाणी’ हीच पाणीटंचाईची भिषण सामाजिक समस्या निर्माण करण्यास कारणीभूत आहे. प्रशासनामध्ये
पाण्यासंबंधित वेगवेगळ्या खात्यांचा परस्परांशी समन्वयाचा अभाव ही समस्या पाण्याच्या
समस्येपेक्षाही जास्त गंभीर झाली आहे, हे भाऊंनी नोंदविलेले निरीक्षण मार्मिक व चिंतनीय
आहे.
ऊस
व फुलशेती ही खूप पाणी पिणारी उत्पादने आहेत. महाराष्ट्रासारख्या अवर्षणग्रस्त राज्यातील
शासन व जाणकारांनी वेळीच पिकरचनेचे नियोजन न केल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या
करू लागतील. सर्वाधिक आत्महत्या कोरडवाहू शेतकर्यांच्याच कुटुंबात घडताना दिसतात. पाण्याचे राजकारण करण्यापेक्षा पाण्याकडे राष्ट्रीय
पातळीवरील भिषण पाणी-समस्या म्हणून बघण्याचा सर्वसमावेशक विचारप्रवाह समाजजीवनात निर्माण
झाल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, असे आवाहनही डॉ. भवरलाल जैन ऊर्फ भारताचेच
जेष्ठ बंधू असलेल्या भाऊंनी केले होते. पाण्यातील भ्रष्टाचार खालपासून वरपर्यंत पोचलेला
असून त्याचे उच्चाटन करण्यासाठी जाणकार मंडळीही खुर्चीचे गुलाम म्हणून भ्रष्टाचाराच्या
प्रवाहात आपले हात ओले करून घेतात. ’खर्चप्रणित राजकारण सोडून लाभप्रणित राजकारण केले
तरच हवा तेवढा वित्तीय पुरवठा विकासार्थ हवा त्या ठिकाणी पाण्याचे नियोजन करण्यासाठी
उपलब्ध होईल.’
भाऊंच्या
मते, ‘‘ भांडणे विकासासाठी व्हावीत. खर्च किंवा गुंतवणूकीसाठी नव्हे. संकल्पित गुंतवणूक
आणि खर्च हा सिंचनविकासासाठी आहे की भ्रष्टाचाराला सहीसलामत ठेवण्यासाठी आहे, याबद्दल
समाजमनात संभ्रम आहे. मोठमोठ्या पाण्याच्या योजना दहा ते वीस वर्ष रेंगाळतात. याचे
कारण अपूर्ण वित्तीय उपलब्धता नसून, हितसंबंधियांचे राजकारण हे सुद्धा आहे.’’ हे भाऊंनी
गंभीरपणे राजकीय हितसंबंधांचा विचार न करता परखडपणे नोंदवले आहे. ‘‘ हे सर्व थांबवायचे
असेल तर पाण्याचे नियोजन व वापर या विषयी राजकीय हेवेदावे, भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण
असलेल्या पाणी नियोजनाच्या राज्य व देशपातळीवरील योजना, पाणी विषयक मानवी समाजाची उदासिनता
झटकून, डोळस स्वयंसेवी संघटना ह्या ’तिसरी प्रभावी शक्ती’ म्हणून पुढे येऊ शकतात. तसे
होण्याची गरज कधी नाही, तेवढ्या प्रकर्षाने आजच्या भिषण पाणीटंचाईच्या अशांत युगात
जाणवत आहे.’’ भाऊंच्या ह्या यथार्थतेची सत्यता आजच्या शेती व शेतकर्यांच्या आत्मविनाशाच्या
काळात सहज पटण्यासारखी आहे. आजही आम्ही भाऊंनी सूचविलेल्या पाणी नियोजनाकडे व पाणी
वापराकडे गंभीरपणे पाहात आहोत, असे समाधानकारक चित्र एकूणच ह्या महाविनाशाच्या अग्रावर
उभ्या असलेल्या जगात दिसून येत नाही. ’जल संकट मानवी जीवनाच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा
भविष्यकाळ असेल.’ हेही भाऊ सूचित करतात.
तात्पर्य,
पाणीटंचाईचा भस्मासूर जगाला गिळंकृत करणार आहे. आपण जलसंकटाबाबत वैयक्तिक व सामाजिकदृष्ट्या
जागरूक राहिलो, डोळसपणे जलसंकटाची चाहूल समजून घेतली, बोलतो तसेच जर वागलो तरच लोकशाही
प्रक्रियेतून जगाला विनाशाच्या सुईवर उभ्या करणार्या जलसंकटासारख्या सार्वत्रिक विळख्यातून
मुक्त करू शकतो. भाऊंच्या मते, ‘‘ जागरूक समाज हीच खर्या अर्थाने आपले स्वातंत्र्य
अबाधित ठेवण्याची आणि चिरस्थायी विकासाची गुरूकिल्ली आहे. आपण तसे करू शकलो नाही, तर
पाण्याचा लढा आपले डोके विश्वखंड स्तरावरून देशादेशात, राज्याराज्यात व त्यानंतर जिल्ह्या
जिल्ह्यात, खेड्यापाड्यात आणि सरतेशेवटी शेता-शेतात काढायला लागेल.’’ भाऊंनी मात्र पाणीटंचाईची ही जगभरात पेटलेली महाभयंकर
ठिणगी जैन हिल्सवरूनच पाहिली. जागरण करताना मात्र त्यांनी जगाला उद्याच्या जलसंकटाची
जाणीव यथार्थरूपात सोदाहरण करूनही दिली. जागतिक शांततेसाठी, विकासासाठी पाणी हा कळीचा
प्रश्न आज जगापुढे आहे.
पाणी
हा युद्ध व संघर्ष-विद्रोहाचाही प्रश्न म्हणून, आधुनिक युग जलसंकटाला सामोरे जात आहे.
सर्वप्रथम जलसंकट आणि जलसंचयाच्या तंत्रशुद्ध शास्त्रीय पद्धतीचा शोध डॉ. भवरलाल जैन
ऊर्फ भाऊंनीच घेतला. जैन इरिगेशनच्या प्रयोगातून
तो सिद्धही करून दाखवला. जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष असताना सुमारे पन्नास वर्षांपूर्वी
त्यांनी जलसंकटाचे भवितव्य जाणून एक विचार जगासमोर मांडला होता. ‘‘ जी व्यक्ती, संस्था
किंवा देश पाण्याच्या समस्येचे निराकरण करेल तिला दोन नोबेल पुरस्कार द्यायला हवेत.
एक, शांतता प्रस्थापित करण्यासाठी. दोन, कालसापेक्ष वैज्ञानिक आविष्कारासाठी.’’ जॉन
एफ. केनेडींनी मांडलेल्या विचाराचे गांभीर्य आजही जगाला कळल्याचे दिसत नाही. जर कळले
असते तर, डॉ. भवरलाल जैन यांना जलसंचय, जलसंकटावरील पर्याय, सूक्ष्म जलसिंचनाचे शेती-उद्योगाला
विकसित करणारे प्रयोग व संशोधन आदी भाऊंचे जलसंकटावर जागतिकस्तराचे कार्य लक्षात घेता
आजवर ह्या ग्लोबल महाजलसंकट युगात तरी नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता.
पाणी
हे शास्त्र व जीवन मानून, भाऊंनी गांधीवादी ध्येयधोरणानुसार देशाच्या विकासासाठी व
शेतकर्यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर प्रयोग व संशोधन कार्याला वाहून घेतले. नोबेल
पुरस्कार हा सत्कार्य करणार्यांसाठी कवडीमोलाचाच असतो. भाऊंनी पुरस्कारासाठी नव्हे
तर देशासाठी कार्य केले आहे. या अर्थाने भाऊ हे साक्षात ’गांधीवादी अनासक्त महापुरुष’
होते. हाच त्यांच्या कार्यशैलीचा आणि कार्यकर्तृत्वाचा गोरगरीब शेतकर्यांनी केलेला
गौरव होय.
भाऊ
: उद्योग व व्यावसायिक नीतिमत्तेचा महामेरू
भाऊंनी
जंगल संपत्तीचे जतन व संरक्षण करण्यासाठी भारतात सर्वप्रथम लाकडाला उत्तम पर्याय म्हणून
प्लॅस्टिक उत्पादनाचा प्रारंभ केला. देशांतर्गत व विदेशी बाजारपेठेतही प्लॅस्टिकच्या
उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली. सौर व जैव ऊर्जेच्या वापरावर भर दिला. शेती
उत्पादनावर प्रक्रिया करून फळे व भाजीपालाही निर्यात करणारे उद्योग उभारले. पाणी अधिकाधिक
शेतीसाठी वापरण्याकरिता प्लॅस्टिक पॉलीमर्सचा मोठ्या प्रमाणावर शेती व उद्योगांसाठी
वापर केला. भाऊंनी शेती व शेतीपुरक उद्योगात क्रांतिकारक प्रयोग घडवून; त्याची प्रात्यक्षिके,
सहली, भेटी, व्याख्याने, सुसंवाद आदींच्या द्वारे शैक्षणिक, क्रीडा, संस्कृती, आरोग्य,
शेती, उद्योग आदींमध्ये रुची घेणार्या गुणवत्तापूर्ण व्यक्तिंना, संस्था व समूहांना
आर्थिक मदत देऊन, उत्तेजन देऊन सामाजिक विकासातही मोलाचा वाटा उचलला आहे.
राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन धडककृती संघ, विकास गट-प्लॅस्टिक
प्रक्रिया उद्योग, राष्ट्रीय फलोद्यान मंडळ या भारत सरकारच्या सार्वजनिक उपक‘मात व
दुसरा जल आयोग, अंजता फार्मास्युटिकल्स लि. या राज्य सरकारच्या उपक्रमातही भाऊंनी मोलाचे
योगदान दिले आहे. भाऊंच्या शेती व उद्योगांच्या विकासाच्या यशाची पाळेमुळे माणूस व
निसर्ग यांचे अतूट नाते जोपासण्याच्या व्यावसायिक नीतिमत्ता व सेवाभावाच्या तळाशी दडलेली
आहेत. अर्थातच ही सर्व गांधींच्या स्वदेशीची सुधारित व आधुनिक आवृत्ती आहे.
भाऊंच्या
कार्यशैलीची व सृजनक्षमतेची दखल
भाऊनी
शेती, पाणी, उद्योग या क्षेत्रांत नेत्रदिपक कार्य केल्याबद्दल भारतीय व आंतरराष्ट्रीय
संस्थांनी व विद्यापीठांनी भाऊंचा गौरव केला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावने
(2006) कृषी, फलोद्यान, सूक्ष्म सिंचन, जलसंरक्षण मध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर्स
ऑफ लेटर्स; दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाने (2006); जयपूरच्या महाराणा प्रताप शेती
व तंत्रज्ञान विद्यापीठाने (2006); तामिळनाडू कृषि विद्यापीठाने (2008) मध्ये भाऊंना
कृषी विज्ञान व औद्योगिक, सूक्ष्म सिंचन, जलरक्षण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल
डॉक्टर्स ऑफ सायन्स उपाधीने सन्मानित केले. भाऊंच्या सामाजिक, शेती व उद्योग, पाणी
आणि विज्ञान, अभियांत्रिकीकरण आदी क्षेत्रात नेत्रदिपक कार्यकर्तृत्वाबद्दल सन्
2008 मध्ये भारत सरकारने पद्मश्री बहुमान प्रदान केला. याशिवाय उद्योगभूषण, फाय फौंडेशन,
फोर्ब्स आशियाचा पुरस्कार, जीवनगौरव, गांधी-आंबेडकर
सामाजिक न्याय, शेती-तंत्र रत्न, भारताचा जलरक्षक, समाजरत्नसह इरिगेशन असोसिएशन अमेरिकेचा
क्रॉफर्ड रीड स्मृती पुरस्कार, यशोदिप पुरस्कार, यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजिक
व्यवस्थापन पुरस्कार, भारत सेवक रत्न, जळगाव रत्न अशा अनेक मान-सन्मानांनी भाऊंच्या
कार्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली.
भाऊंची
ग्रंथसंपदा : भाऊ, जनातले आणि मनातले
भाऊंच्या
जीवनावर व कार्यावर आधारित विविध भाषांमध्ये शकडो लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. भाऊंना
उत्तम साहित्य वाचण्याची, आत्मसात करण्याची आणि नवनवीन जीवनविषयक विचारांचा शोध घेण्याची
जिज्ञासा होती. एक कलासक्त माणूस भाऊंच्या व्यक्तिमत्त्वात केंद्रस्थानी नांदत होता.
खुद्द भाऊ सुद्धा सृजनशील लेखक होते. जीवनावर संस्कार करणार्या आणि जीवनाला उभारी
देणार्या साहित्याचेही सृजन भाऊंनी केले होते. शब्दांच्या नव्या छटा निर्माण करणे,
सृष्टीविषयी सतत चिंतनशील असणे, भाषा व निसर्गाचा सुसंवाद व्यक्त करणे, वृक्षवल्लीविषयी
नवेनवे चिंतन मांडणे अशा अनेक कसोट्यांवर त्यांनी प्रतिभा व नैतिकतेचा जीवनदायी शैलीनिष्ठ
आविष्कार आपल्या लेखनातून केलेला आहे. प्रेमभाव व गांभीर्य हे भाऊंच्या सृजनशील साहित्यनिर्मितीचे
मुख्य लक्षण होते.
सामाजिक,
उद्बोधनपर, समाज जनजागरण अशा उदात्त हेतूने आजची बदलती समाजव्यवस्था आणि पुनर्बांधणीच्या
दृष्टीने, आजची समाज रचना : तिचे स्वरूप व पुनर्बांधणी
हा भाऊंचा ग्रंथ मराठीमध्ये सन् 2001 मध्ये प्रकाशित झाला. जल संरक्षणविषयक ’A Telling Tale’ (2003), 25 वर्षांची सोबत ‘Uniting Bond’ (2010), जैन हिलचे परिवर्तनावर ‘Then and Now’ (2011),
भाषणविषयक संकलन ‘The
Enlightened Enterpreneur’(2013), ‘she and me’(2014)
हे इंग्रजी ग्रंथ तर ती आणि मी (2009) हा काहीसा आपल्या पत्नीविषयक
स्मृतींना उजाळा देणारा मराठी आत्मपर ग्रंथ याशिवाय जीवनातील शाश्वत मूल्ये, जैन हिल्सवरील जागरण भाग 1 व 2, कहाणी कष्टलाटांच्या
पाणलोटाची, एक न संपणारा प्रवास, पाषाणातून पाझर, ग्रामीण विकास, वाघूरचं पाणी, थेंबभर
पाणी-अनंत आकाश अशा मौलिक ग्रंथांच्याही सृजनाचे प्रातिभ भाऊंच्या सृजनशील व नैतिक
लेखनगुणांची साक्ष देते.
प्रेमभाव
हा भाऊंच्या लेखनाचा स्थायिभाव होता. यासंदर्भात सुंदरलालजी मल्हारा यांनी भाऊच्या
सृजनशीलतेची सार्थ शब्दात उपासना केली आहे. ‘‘ भवरलालजी सृजनवेडे होते. त्यांच्या हातून
जितके सृजन बाह्य विश्वात झाले तितकेच आंतरिक विश्वातही झाले. दोन्ही प्रकारच्या सृजनामुळे
भवरलालजी समग्र व्यक्ती बनले. एकांगी सृजन केव्हा केव्हा विनाशकारी सिद्ध होते. दुसर्या
महायुद्धाच्या वेळी सृजनशील वैज्ञानिकांनी अणुबॉम्बची निर्मिती केल्यामुळे हिरोशिमा
व नागासाकीसारखी गजबजलेली समृद्ध शहरे बेचिराख झाली. ह्या वैज्ञानिकांच्या अंतःकरणात
प्रेमाला जागा नव्हती. विद्ध्वंसाला जागा होती. निसर्गापासून मिळालेल्या अणुऊर्जेचे
मानवी कल्याणासाठी मनोभावे जतन केले असते तर महाविनाश घडला नसता. आतासुद्धा महादेशांच्या
वैज्ञानिकांनी कितीतरी पटीने जास्त अणुशक्तीचा साठा केलेला आहे. आज तर मानवी प्रेमाची,
प्रेमाच्या आंतरिक सृजनाची अत्यंत आवश्यकता आहे. अन्यथा कोणत्याही दुर्दैवी क्षणी हे
संपूर्ण विश्वच बेचिराख होईल. भवरलालजींनी मात्र आपल्या बाह्य व आंतरिक विश्वात मानवी
कल्याणार्थ प्रेमभावाने सृजनाचे स्तूप उभे केले आहेत.’’
तात्पर्य,
खरेतर भाऊंसारखे सृजनशील लोकच ह्या सृष्टीवर विद्ध्वंसाचे आलेले सावट दूर करून सृष्टीला
अधिक सौंदर्यशील व स्वागतशील बनवतात. सृष्टी ही तारक आहे. मारक नाही. हे तत्त्व आम्हाला
केव्हा कळेल? भाऊ त्याचा साक्षात दृष्टांत आहे...
हे
प्रतिभावान माणसा, तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही सृष्टी...
मित्रहो,
माणूस हाच या सृष्टीला सत्यम-शिवम-सुंदरम करणारा अलौकिक बुद्धीची देणगी मिळालेला, अंतिमतः
सत्य-अहिंसा-शांतीचीच आस असलेला सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत आहे. प्रत्येक माणसाच्या आत
विधायक ऊर्जा असलेला एक माणूस असतो. त्याला अस्तित्वाची आणि अस्मितेची जाणीव फक्त करून
द्यायची व करून घ्यायची असते. या सृष्टीच्या चराचरांत नांदणारी मानवी सृष्टी व मानवेतर
सृष्टीचे साहचर्यबंध प्रकट करणे हेच भाषा, कला, साहित्य, इतिहास, संस्कृतीचे एकमेव
प्रयोजन असते. ज्या कला व साहित्यात मानवाचे वृक्षवल्लीशी नाते नाकारले जाते. जीवनातल्या
दुःखाशी नाते तोडले जाते. भूमीच्या सृजनाशी रक्तसंबंध नाकारला जातो; ती कला असो की
साहित्य असो, समकाळात जगणार्या माणसांच्या सुखसमृद्धीलाच अशा न-नैतिक साहित्यनिर्मिती
आणि अनैतिक कलांचा विरोध असतो. असे साहित्य वास्तव असले तरी सम्यक वास्तवाशी नाते नाकारून,
स्वांतःसुखाय कोलाहलातच जीवनाचे स्वर हरवलेले असतात. सतारीचे बोलांचा बिघाड उत्पन्न
करणार्या कला, संगीताचे ते व्यावसायिक ध्वनी व शब्द असतात. थोर लेखक-कवी बाबुराव बागुलांनी
वेदांच्या आधी तू होतास...या कवितेतून ही जाणीव करून दिलीच आहे. माणूस सर्वश्रेष्ठ
आहे. त्याच्या अंतःकरणात विधायक सौंदर्यऊर्जा दडलेली आहे. वेदांच्याही आधी आणि नंतरही
तोच आज युगांतरातही जिवंत आहे. खरेतर माणसाला माणूसच कळत नाही. तो कळला तर ह्या जगाच्या
कल्याणाचा मार्गही मोकळा होईल.
वेदाआधी तू होतास!
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास
पंचमहाभूतांचे पाहून विराट, विक‘ाळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ऋचा...
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस...
हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र,
चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले...
हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्वकाही
तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही...
-कवी
बाबुराव बागुल ( वेदाआधी तू होतास 2004)
भारतीय
शेतकर्यांच्या आत्महत्या : महाराष्ट्र आघाडीवर
सन्
1995 ते 2011 पर्यंत 17 वर्षांत शेतकरी, शेतमजूर आणि शेतीच्या व्यवसायाशी निगडित असणार्या
दोन लाख नव्वद हजार सातशे चाळीस शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची नोंद,
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनं वार्षिक अहवालात दिल्याची माहिती, तत्कालीन केंद्रिय
कृषिमंत्री हरीश रावत यांनी राज्यसभेत दिली होती. (महाराष्ट्र टाईम्स्, नागपूर, दि.
1 सप्टेंबर 2012)
सन्
1995 ते 2016 पर्यंत एकूण 22 वर्षांत भारतातील एकूण 3,33,398 शेतकरी-शेतमजूरांनी आत्महत्या
केल्या. याचाच अर्थ दरवर्षी सरासरीने भारतात 15,155 शेतकरी व शेतमजूर आत्महत्या करून
भूमीवर सृजनाचे कष्ट करणारं जीवन संपवतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनं वार्षिक
अहवालात ही माहिती दिली आहे. अर्थातच ही सरकारी
आकडेवारी आहे. ती पुरेशी विश्वसनीय कुणीही मानत नाही. नेटवर श्री मुजफ्फर हुसेन या अभ्यासकाने सर्वेक्षण
केल्यानुसार 1995 ते 2011 पर्यंत भारतात एकूण 7,50,860 शेतकरी व शेतमजूरांनी आत्महत्या
केल्याची माहिती दिलेली आहे. पैकी एकट्या सधन व विकसित शेती असणार्या महाराष्ट्रात
याच काळात एकूण 50,860 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. अनुक्रमे महाराष्ट्रातील मराठवाडा,
विदर्भ, खानदेश मध्ये सर्वाधिक जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नंतरच कर्नाटक,
आंध्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ मध्ये परिस्थिती बिकट होत गेली. अभ्यासकाच्या मते, ‘‘ प्रत्येक किसान समय पर अपना कर्ज खत्म करने का
प्रयास करता है, किंतु फसलों की बर्बादी से वह ऐसा नही कर पाता है। इस चिंता में वह
भीतर से टूट जाता है और अंततः आत्महत्या का
मार्ग चुन लेता है। कृषक बंधु अब खेती को घाटे का धंदा मानते हैं। इसलिए उनकी आने वाली
पीढी अपने मां-बाप की तरह कर्ज में न तो मरना चाहती हैं और न ही आत्महत्या करना चाहती
है।’’ खरेतर भविष्यातील जगबुडीची ही सूचनाही आहे.
जगात
इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूरांनी आत्महत्या करणारा कृषिप्रधान भारत हा
पहिलाच देश होय. सरकार कुणीही असो, मुळांपासूनच इथल्या शेतकर्यांच्या समस्यांचे व
शेतीचे नियोजन कालानुसार काळजीपूर्वक केले असते तर आज शेती आणि गावं उजाड माळरानं झाली
नसती. सरकार कोणतेही असो, मतांची बँक व सत्ता टिकवण्यातच माहीर असते. सरकार शहरात राहते.
शहराच्या विकासाकडे लक्ष दिले जाते. शेतकरी बिचारा असंघटित. निरक्षर, अडाणी, खेडूत,
कंगाल, निर्धन, निराश, समस्याग्रस्त. त्याच्याकडे सरकारचे लक्षच नसते. लक्ष देण्यापेक्षा
शेतकर्यांच्या आरत्या ओवाळण्यातच प्रत्येक सरकार धन्यता मानते. खेड्यातील मतदारांचा
कौल मात्र हमखास प्राप्त करण्याची शैली सरकारला अवगत असते.
शेतकरी
आत्महत्या का करतात?
भारतात
शेतीवर आधारित लोकसंख्या 70 टक्के असून, त्यापैकी एकूण 11.2% पेक्षाही अधिक शेतकरी
व शेतमजूरांनी आत्महत्या केल्याचे नॅशनल क्राईम ब्यूरोनेच सांगितले आहे.
मुक्त
ज्ञानकोश विकिपीडियानुसार भारतात शेतकर्यांच्या आत्महत्यांची स्थिती1990 नंतर निर्माण
झाली. कारणे देताना-
1.
भारतीय शेती मान्सूनवर निर्भर आहे. मान्सून नियमित नसल्यामुळे कधी ओला तर कधी कोरडा
दुष्काळ शेतकर्यांच्या आर्थिक विघटनाला जबाबदार आहे.
2.
खरिप व रब्बी अशी दोन्ही पिके नष्ट होतात. दुबार पेरणी व अस्मानी सुलतानी संकटांमुळे शेतकर्यांना आर्थिक दिवाळखोरीवर नियंत्रण ठेवता
येत नाही.
3.
कर्जबाजारीपणाचे दडपण व भार मोठा असतो. पहाडाएवढ्या कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबून
जातो. त्याला कर्जबोजा उतरवण्याचे मार्गच सापडत नाहीत.
4.
सावकार, बँका, मध्यस्त-दलाल यांच्या शोषणचक्रातून शेतकर्याला मुक्त होता येत नाही.
5.
कौटुंबिक कारणे, जबाबदार्या, शिक्षण, मुलींची लग्ने, निराशा-वैफल्यामुळे लागलेली व्यसनाधिनता
आदींसाठी कर्ज घ्यावे लागते व नंतर तेही फेडता येत नाही.
4.
कृषी मालाला किंमत मिळत नाही. लागत खर्च वसूल होत नाही. शेवटी शेती हा कायम घाट्याचा
सौदा ठरतो. कवडी मोलाने पडत्या किंमतीत हंगामात कृषिमालाची विक्री करणे भाग पडते. अशी
अनेक कारणे आहेत. शेतकर्यांचा स्वाभिमान, सज्जनपणा, प्रामाणिकपणा बरेचदा त्याला आत्महत्या
करायला प्रवृत्त करतो. या महाभयानक आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात सापडल्यामुळे, शेतकर्याला
आत्महत्या हाच मुक्तीचा अंतिम मार्ग असल्याचे जाणवताच तो कंटाळून आपल्याच शेतात आपला
जीव देतो.
शेतकर्यांच्या
आत्महत्येत महाराष्ट्र आघाडीवर का?
सर्वप्रथम
महाराष्ट्रातून शेतकर्यांच्या आत्महत्या होऊ लागल्या. त्याचे लोण देशभर पसरले. नंतर
कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगढ याही प्रदेशांसह सन्
2009 मध्ये तर एकूणच 17,368 शेतकर्यांनी देशभरात आत्महत्या केल्या. पैकी महाराष्ट्र,
कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या 5 राज्यात 17,368 पैकी 10,765 म्हणजेच
एकूण देशातील आत्महत्यांच्या तुलनेत 62 % आत्महत्या नोंदवल्या गेल्या. हे सरकारी आकडे
आहेत. खरेतर 1995 ते 2011 या 17 वर्षांतच एकूण 7,50,860 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची
नोंद आहे. याच दरम्यान सधन व विकसित गणल्या गेलेल्या महाराष्ट्रात ह्याच काळात
50,860 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. 2004 नंतर एकूणच देशातील कृषी व कृषी आधारित
लोकांचे जीवनमान खालावत गेले. शेतीमुळे कंगाली बकाली आली. 2001 च्या भारतीय जनगणनेनुसार
शेतकर्यांची सं‘याच रोडावली. 1990 ते 2000 च्या काळात 70,00,000 शेतकर्यांनी शेतीचा
व्यवसाय बंद करून, उदरनिर्वाहाची पर्यायी साधने शोधली. दरवर्षी दर महिन्याला देशात
70 च्या वर शेतकरी आत्महत्या करू लागले. ही सं‘या 2001 नंतर झपाट्याने वाढत आहे.
विद्यमान
केंद्रिय कृषी मंत्री मा. राधा मोहन सिंग यांनी (एन. सी. आर. बी. च्या रिपोर्टनुसार)
दिलेल्या माहितीप्रमाणे 2015 मध्ये 12,602 तर 2016 मध्ये 11,370 म्हणजेच 2015 च्या
तुलनेत 2016 मध्ये आत्महत्या 9.77% कमी झाल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले. महाराष्ट्रात
2016 मध्येही सर्वाधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचेही कबूल केले.
2018
मध्ये मार्च ते मे पर्यंत या तीनच महिन्यात महाराष्ट्रात 600 पेक्षा अधिक शेतकर्यांनी
आत्महत्या केल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी
नागपूरच्या विधान सभेत दिली. पैकी 122 शेतकर्यांच्या कुटुंबियांना सरकारी मदतीस पात्र
ठरवले तर 329 कुटुंबियांच्या केसेस धूळ खात पडल्या आहेत. अर्थातच हे सरकारचे मदतीचे
चित्र समर्थनीय नाही. नियोजनबद्धपणे व प्रामाणिकपणे शेतकर्यांप्रती उत्तरदायित्व मानून
सरकारने प्रयत्न करायला हवे. शेतकर्यांच्या निर्धनपणाला सधनपणाचा आर्थिक स्तर चढवत
नाही तोपर्यंत तरी केवळ पॅकेजसच्या भरवशावर भारतासह महाराष्ट्रातील शेतीचे दिवाळखोरी
व कंगालीच्या उधळीने नष्ट होणारे अर्थ-व्यवस्थापन व अर्थ-नियोजन यशस्वी होणार नाही.
सोबतच, कर्ज न काढता कालांतरानुसार शेतीत नवीन तंत्रज्ञान व प्रयोग स्वतःच्याच भरवशावर
करण्यासाठी शेतकरी पात्र होणार नाही, तोपर्यंत तरी जगबुडीला पर्याय नाही.
भारतीय लोकसंख्येच्या वाढीचा भस्मासूर व शेतीचे
उजाडलेपण
30
ऑक्टोबर 2018 रोजी नेटवरील अपडेटनुसार भारतातील एकूण लोकसंख्या 135 कोटी 90 लाख 20
हजार 756 इतकी होती. जगातील लोकसंख्येपैकी 17.74% लोक एकट्या भारतात राहतात. भारत लोकसंख्येच्या
बाबतीत वर्तमानात दुसर्या क्रमांकावर आहे. सन् 2050 पर्यंत भारताची लोकसं‘या अंदाजे
166 कोटी पर्यंत वाढून, चीनलाही मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याची
शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे.
भारतातील
लोकसंख्येपैकी 2018 मध्ये केवळ 27.8% लोक असून 5480 शहरे व महानगरात राहतात तर
72.2% लोक 6,38,000 खेड्यात राहतात. भारतासारख्या कृषिप्रधान व उद्योगप्रधान देशात
सन् 2018 मध्येही जवळपास 2 कोटी लोक दररोजच उपाशी असतात. त्यांना दोनवेळचं अन्नही मिळत
नाही. गेल्या तीन वर्षांत जवळपास 60,000 शेतकर्यांनी भारतात आत्महत्या केल्या आहेत.
सरासरी दरवर्षी 20,000 शेतकरी व शेतमजूर आत्महत्या करतात. नव्या-जुन्या पिढीने शेतीचा
व्यवसायच बंद केला आहे. 70,00,000 शेतकर्यांनी शेती करणे बंद करून शेतजमिनी विकून
नव्या पिढीच्या शिकल्यासवरलेल्या मुलांना शहरी स्थिरस्थावर केले आहे. काहींनी शहरं
गाठली तर काही अजूनही गावात पोटापुरती शेती करतात. अपयश आलं की आत्महत्या करून मुक्त
होतात.
मढे
झांकुनिया करिती पेरणी...
मढे
झांकुनिया करिती पेरणी॥ कुणबियांचे वाणी लवलाहे॥
घरातलं मढं झाकून पेरणी करणार्या सृष्टीच्या पोशिंद्याला स्वदेहाचं मढं का
करावं लागतं? याविषयी कुणीही विचार करीत नाही. संवेदनबधीरताच आली आहे. भारतात 1990
हे गृहीत वर्ष मानून आत्महत्यांची प्रारंभावस्था मानली जाते. सन् 1984-85 मध्ये वर्धा
जिल्ह्यातील साहेबराव पाटलानं दत्तपूर ग्रामी दोन मुलं, पत्नी अशा अ‘या कुटुंबासह किटकनाशक
प्राशन करून आत्महत्या केली. सबंध महाराष्ट्राला हादरा देणारी ही घटना गांधी जिल्ह्यात
घडली. शेतीला व कर्जाला कंटाळून केलेली संपूर्ण कुटुंबियांची अंगावर शहारे आणणारी पहिली
कौटुंबिक आत्महत्या महाराष्ट्राला हादरवणारी होती. कवी विठ्ठल वाघांनी साहेबराव पाटील
याच शीर्षकाची कविता लिहून, शेतकर्यांच्या आत्महत्येची नोंद मराठी साहित्यात केली.
खरं
म्हनजे साहेबराव तुया आत्महत्या केलीच नाही
आमीच
तुहा खून केला...तुहा अन् तुह्या बायकोपोराईचाही
तुहं
सरन पेटल्यावर मसनात एक म्हतारा सांगत होता-
आता
कापूसजवारी पेरसान त लेकहो हराममौतीनं मरसान
आता
पेरा तासातासानं लोखंडी दगळी गोटे
चारी
मेरीनं बाभुईचे खम्मन काटे...
...तू
मले माफ करू नको-कधीच माफ करू नको साहेबराव !
शेवटी,
आम्ही जलमलो मातीत, किती होणार गा माती! खापराच्या दिव्यात या कधी पेटणार वाती? शेतकर्यांनी
आपुलाचि वाद आपणाशी करून, आपले प्रश्न सोडविण्याचाच खरंतर हा वर्तमान काळ आहे. जगाचं
भविष्य असणार्या शेतकर्याचं वर्तमान ज्या देशात काळवंडलं जातं, त्या देशात खरंच सोन्याचा
धूर निघत होता काय? जिकडे तिकडे चोहीकडे हिरवेगार गालीचे आमच्या शेतीवाडीचे! असं चित्रण
केलं जायचं ते खरं होतं काय? असे कितीतरी प्रश्न आपणच आपल्याला विचारले पाहिजेत.
एकविसाव्या
शतकाच्या पहिल्या दशकाचं भयावह वास्तव दुसर्या दशकाच्या प्रारंभातच मानवी जीवनाला
उधळी लावेल, असं कुणालाही वाटलं नाही. पण एकूणच जगातल्या सर्वहारा माणसांच्या जीवनालाच
आता उधळी लागलेली आहे. पिपात मेले ओल्या उंदिरासारखी स्थिती आज जगात सर्वत्र दिसून
येते. मर्ढेकरांचा गणपत वाणी बापुडा बिडी पितांना मरून गेला. एक मागता डोळे दोन, देव
देतसे जन्मांधाला...सर्वहारा शेतकर्यांचा आणि शोषित वर्गाचा सखासोबती असलेला भुवैकुंठीचा
विठू आणि रखुमाई सुद्धा एकविसाव्या शतकात विठ्ठलाच्या पायी थरारली विट, म्हणून आपल्या
वारकरी-शेतकरी बांधवांना सोडून निघून गेले की काय? असे अनेक प्रश्न आता पडायला लागले
आहेत.
शेतकर्यांच्या
आत्महत्या आणि नव्या पिढीचा अघोषित संप
आपल्या
शेतकर्यांच्या पुढच्या पिढीने पुकारलेला अघोषित संप देशाला अंधाराकडे घेऊन जाणारा
असेल...शनिवार, दि. 18 फेब्रवारी 2017 च्या लोकसत्तातील संपादकीय अग्रलेखातून जगाला
धोक्याचा गंभीर इशारा संपादकानं दिला. शरद जोशी यांनी महाराष्ट्रातील कृषी जीवनात शेतकरी
संघटेचे क्रांतिपर्व निर्माण केले. पहिल्यांदा शेतकर्यांच्या आंदोलनाची क्रांतिकारी
ऊर्जा महाराष्ट्राच्या भूमीवर निर्मून, पुढे गल्ली ते दिल्लीपर्यंत अनेक वर्षे जागती
ठेवली. शेतीचे कायदे आणि शेतीची सबंध व्यवस्थाच सरकार नियंत्रित करीत असल्यामुळे, भारतीय
शेतीवरील सर्वच जाचक कायदे-बंधने हटवून शेती पूर्णपणे मुक्त केल्यानेच ती जागतिकीकरणाच्या
रेट्यात टिकू शकेल; असा आग‘ह शरद जोशींनी केला होता. शेतकरी संघटना आणि महेन्द्र टिकैत यांच्या किसान
आंदोलनासह; शरद जोशींच्याही क्रांतिकारक विचारांना-चळवळीला तिलांजली देण्याचे राजकीय
डावपेच यशस्वी झाल्यामुळे; भारतीय शेतकर्यांच्या जीवनातील एकमेव आशेचीही ज्योत मालवली
गेली.
शेतकर्यांची
व्होट-बँक देशातील मोठी व्होट-बँक असल्यामुळे, पॅकेजच्या भूलथापांनी भारतीय शेती कायमच
डायलिसिसवर राहिली. कृषी-कृषकांचे अर्थशास्त्र अधिकाधिक बिघडतच गेले. भूसंपादन कायदे
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राबवून, सेझ-कल्चर सरकारनेच अस्तित्वात आणले. सक्तीने शेतजमिनी
बळकावून शेतकर्यांना भूमी-निकाला केले. दुःखमुक्तीची मृत्यू-सेज बहाल केली. शेतीच्या
बुडित व्यवसायात नवीन पिढीने येऊ नये म्हणून, शेतकर्यांनी आपली मुले शहरात शिकवून-शहरी
नोकरीपेशात रुजवून-प्रसंगी शेतजमिनी विकून, नव्या पिढीचे शेती कसण्याचे सर्वच रस्ते
बंद करून टाकले. ही सर्व भूमीची दुर्दैवी, अमानुष मशागत गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून
आपल्या देशात सुरू असल्यामुळे; भारतीय जुन्या पिढीतील मायबाप शेतकरी मोठ्याप्रमाणावर
आत्महत्या करू लागले. नव्या पिढीने शेतीविरूद्ध अघोषित संप पुकारून, पांढरपेशा समाजात
आपलं जगणं सुकर करून घेतलं. शरद जोशींच्याही नंतर शेतकरी चळवळ काही काळ थंडावली. पुन्हा
नव्या जोमाने अमर हबीब, विजय जांवधीया, गंगाधर मुटे, शेषराव मोहिते, चंद्रकांत वानखेडे,
विजय विल्हेकर व अन्यही भागातील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणार्यांच्या पुढाकाराने
व समर्थ नेतृत्वाने पुढे नेली. मराठवाड्यात तर अमर हबीब यांचे शेतकरी आंदोलनाचे कार्य
एकूणच चळवळीला दिशा देणारे आहे.
डोकेफूट
प्रबोधनाने कोणत्याही क्रांतिच्या शक्यताच कधी निर्माण होताना दिसणार नाहीत; अशीच गोळीबंद
व्यवस्था बुर्ज्वा सुखवस्तू व्यवस्थाप्रिय बुद्धिवाद्यांनी-भांडवलदारांनी-सत्तापटूंनी
रुजवत आणल्याच आहेत. जगभर महाविनाशाचे हादरे बसत असतानाही आपण कसे शांत-स्वस्थच आहोत...मनातल्या
सुखवस्तू तलावात सारंकसं सामसूमच आहे...आपलं कशाशीच काही घेणंदेणं राह्यलं नाहीय. आपण
आणि आपला परिवार भला...पण, हे त्रिकालाबाधित सत्य नाहीच. ही मानसिकता क्षणकालातच नेस्तनाबूत
होण्याची दुःचिन्हे ठळकपणे जगभर दिसू लागली आहेत. जगबुडीत जगच बुडते. तेव्हा बुडत्याचे
पाय डोहाकडेच असतात...कुणीही वाचवायला मागंच उरणार नाही...
सांस्कृतिक
विश्व, समाज व संघटना काय करीत आहेत?
जगातील
तमाम बुद्धिवंत, शास्त्रज्ञ, उद्योजक, कलावंत, साहित्यिक संपावर गेले तर या जगाचे काय
होईल?...काहीही होणार नाही. परंतु शेतकरी जर संपावर गेले तर मात्र जगबुडी जरूर होईल!
लोकप्रिय तत्त्ववेत्त्या आयन रँड यांनी ’अॅटलास श्रग्ड’ या 1957 साली लिहिलेल्या फॅन्टसी
नॉव्हेलमधून जगाला धोक्याची सूचना दिली आहे.
‘‘ जगामध्ये संपत्ती निर्माण करणारी, समृद्धी आणणारी, जगाला पोसणारी ही माणसे; एका
क्षणी ठरवतात की, आता खूप झाले. यापुढे जगाला आपल्या खांद्यावरून नाही वाहून न्यायचे.
एकेक करून ते सारे आपले काम बंद करतात. एकमेकांवर जगणार्या बांडगुळांप्रमाणे जगणार्या
माणसांना लाथाडून दूर कुठे तरी निर्जन बेटावर निघून जातात...आणि सारे जग अंधारात बुडते.’’
या सत्याच्या जवळच आपण पोहोचलो आहोत.
सारं
कसं सामसूम तरंग नाही तलावात, वळं कलंडती असे कुठे गेले झंझावात...अळीमिळी गुपचिळी
जगन्याची रीत झाली, निंघे अर्थाचं दिवायं शब्दाची तं पत गेली...हेही सांस्कृतिक वास्तव-समाज
वास्तव-शासन वास्तव कवी वाघांनी कवितेतून मांडलेच आहे.
जगभर
गांधींचे तीन बंदर कार्यरत
जगातल्या
तमाम समस्यांकडे दुर्लक्ष झाले तरी त्यामुळे जगबुडी होणार नाही. परंतु शेतकर्यांच्या
आत्महत्यांचे सत्र जर असेच अखंड-अविरत सुरू राहिले, तर या सृष्टीला जन्माला घालणारे-सृष्टीचे
पालनपोषण करणारे लोकच ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये माणसांना जन्माला घालण्यासाठीही भविष्यात
शेष उरणार नाहीत. मायबापच नसले तर माणसांच्या सृष्टीची उत्पत्ती तरी कशी होईल? त्यांच्या
उदरनिर्वाहाचे प्रश्न तरी कसे सुटतील? हाच खरेतर ह्या वर्तमानाला गिळंकृत करणारा एकमेव
कळीचा मुद्दा आहे...
मुख्य
मुद्दा हा आहे की, संतप्रवृत्तीने जगासाठी जगणार्या सृष्टीच्या पालनहार्याविषयीचा
खोलवरचा करुणाभाव-कर्तृत्वभाव-जग्गदाताभाव एकूणच सृष्टीला जगवणार्या व्यवस्थेला कितपत
जाणवला आहे? याचाच खरेतर शोध घेण्याची गरज आहे. असेही लक्षात येते की, जगात शेतकर्यांविषयी
केवळ कोरडी सहानुभूतीच शेष आहे. गांधीजींच्या तीन बंदराची अवस्था जगभर दिसते आहे. शेतकर्यांविषयी
काहीही बोलायचं नाही! शेतकर्यांच्या बुडीत जगाविषयी काहीही ऐकायचे नाही! मृत्युपंथाला
कवटाळणार्या शेतकर्यांची मढीही पाहायची नाहीत! समाज, शासन, साहित्य, संघटना अशा सर्वच
स्तरांवर गांधीजींचे तीन बंदर सृष्टीच्या तारणहार्याला केवळ वाकुल्या दाखवीत आहेत.
मित्रहो, इतकी उदासिनता असेल, आपल्याच जन्मदात्याकडे पाहण्याची, तर या नव्या ग्लोबल
व्हिलेजला नक्कीच भवितव्य नाही...
अच्छे
दिन-मेक इन इंडिया-स्मार्ट भारत-स्वच्छ भारत केव्हा?
मेक
इन इंडिया! स्वच्छ भारत, तेव्हाच निर्माण होईल; जेव्हा स्वच्छ-निकोप दृष्टीने भारतीय
शेतकर्यांच्या अवकळेचा कलंक समूळ पुसला जाईल!...हे करायचे की नाही? याचाच विचार करण्याचे
हे युग आहे...अर्थातच, जगबुडीची नांदी तर आपल्या शेतकर्यांच्या पुढच्या पिढीने पुकारलेल्या
अघोषित संपामुळे, देशाला अंधाराकडे घेऊन जाण्याची तीव्र चाहूल तर महाराष्ट्रातल्याच
मराठवाड्यातील शेतकर्यांनी दिलीच आहे!... या निमित्ताने तरी समाज जागरण होईल. समाज
आणि शासनाची कुंठितावस्था दूर होईल. ती झालीच तर मात्र, आपल्या कृषिप्रधान देशाला आणि
कृषीवलांची काळजी घेणार्या समाज-शासन-सांस्कृतिक व्यवस्थेलाही भवितव्य राहणार आहे!..
डॉ.
भवरलाल जैन सूर्योदय साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून...
नरखेडच्या
चौथ्या जनसाहित्य संमेलनाच्या (1998), नाशिक जिल्ह्यातील तारुखेडले येथे संपन्न झालेल्या
तिसर्या भटक्याविमुक्तांच्या साहित्य संमेलनाच्या (2001), सन् 2012 मध्ये गोंदियात
संपन्न झालेल्या 62 व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या, राजूरा येथील दुसर्या राज्यस्तरीय
अभंग साहित्य संमेलनाच्या (2016), अकोल्याच्या 35 व्या राज्यस्तरीय रजधूळ साहित्य संमेलनाच्या
(2018), पद्मगंधा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन नागपूरच्या (2018)
अध्यक्षपदावरून तसेच डॉ. भवरलाल जैन सूर्योदय साहित्य संमेलन, जळगाव (2019) येथूनही;
साक्षात शेतकर्यांचा मसिहा असलेल्या थोर शेतीतज्ज्ञ व शेती-उद्योगाचे प्रयोगशील शास्त्रज्ञ
असलेल्या भाऊंच्या भूमीवरूनही; सृष्टीचा पालनहारा असलेला शेतकरी मृत्युपंथ का स्वीकारतो?
जगाची पोटभूक शमविणार्या सृष्टीच्या निर्मात्याला आयुष्यभर फाटक्या चिंध्या पांघरून
उपाशी का मरावं लागतं? कृषिप्रधान भारत देशात शेतीच्या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा
देवून, सरकार त्यांचे प्रश्न निकालात का काढत नाही? असे अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा
मांडले. पण भाऊंनी अनुभवलेल्या ह्या देशातील; पाण्याचे आणि शेतकर्यांचे राजकारण करणार्या
राजकारण्यांनी शेतकर्यांच्या आत्महत्यांचा कधीही गंभीरपणे विचार केलेला नाही. आजही
भाऊंच्या ह्याच मतांची प्रचिती विशेषत्वाने येत आहे. जोपर्यंत भाऊंसारखे शेतकर्यांचे
पसायदान साकार करणारे संत या भूमीवर संख्येने आणि राजकारण्यातही निर्माण होणार नाही;
तोपर्यंत तरी शेतकर्यांच्या शेतीतला आणि जीवनातलाही आत्महत्येचा अंधार नाहीसा होणार
नाही. भाऊंसारखे लखलखते सूर्य जेव्हा सबंध देशातल्या शेतकर्यांच्या जीवनाला आणि बिघडलेल्या
अर्थव्यवस्थेला सावरण्याचे प्रयोग यशस्वी करणार नाहीत, तोपर्यंत तरी ह्या अंधारयुगाचा
अंत होईल असे वाटत नाही.
आज
पुन्हा 20 वर्षांनी हेच अजूनही न सुटलेले दुःखकोडे; शेतकर्यांविषयी अपार करुणा व सहानुभूतीपूर्वक
आपल्या समोर मांडतो आहे. सृष्टीच्या पोशिद्यांचे प्रश्न मनाच्या तळठावातून आपल्यासमोर
मांडतो आहे. पोशिंद्याच्या आत्महत्येबाबत सरकारनं, समाजानं, शेतकरी संघटना, विचारवंतांनी,
साहित्यिकांनी संयुक्तपणे शेतकर्यांच्या पाठीशी ऊभे राहायला हवे. जनआंदोलन उभारून
सांस्कृतिक दबावगट निर्माण केल्याशिवाय सर्वहारांचे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी आपण
सर्वहारा समाजाच्या दुःखमुक्तीसाठी, शेतकर्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी, समाजात एक
सशक्त दबावगट तयार करू या...जोपर्यंत हे कार्य नैतिकता आणि निष्ठेने आपण करणार नाही,
तोपर्यंत आपल्याला निर्भयपणे जगता येणार नाही. दुःखमुक्तीचेही पर्याय सापडणार नाहीत.
शेवटी, समाजाचे सर्वच प्रश्न अग‘क‘माने सोडवण्यासाठी शक्ती प्रदर्शनाचे तंत्र, एकजूटीने
वापरायला हरकत नाही.
भाऊंच्या
शेती व शेतीपुरक उद्योगांचा समतोल विकास साकार करणारा जलसिंचन-भूमीची सृजनशीलता-कृषी-कृषिपुरक
उद्योंगांच्या विकासाचा चौपदरी आराखडा पुन्हा एकदा भूमीच्या व शेतकर्याच्या जीवन विनाशावर
विकासाचा पर्याय ठरू शकेल काय? याचाही विचार सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय विश्वाने
करायला हरकत नाही. तात्पर्य, शासन व प्रशासनाच्या
शोषण चक‘व्यूहातून, कृषी व कृषिवलांना स्वयंभू व आत्मनिर्भर करण्याचे राजकारण आता खुद्द
शेतकर्यांनाच करावे लागेल की काय? या सर्व गंभीर प्रश्नांच्या सोडवणुकीत भवरलालजी
जैन उर्फ भाऊंच्या आर्थिक विकास विषयक शेती व पाणी नियोजनाचा निश्चितच उपयोग होऊ शकेल
असे वाटते. यादृष्टीनेही भाऊंच्या स्मरणार्थ आयोजित संमेलनात सतीश जैन ह्या उमद्या
आणि भाऊंविषयी सच्ची निष्ठा असलेल्या कार्यकत्याने भाऊंच्या विविध पैलूंवर चर्चा, चिंतन,
उपाय यावरही विचार मंथन घडवून आणण्याचा विडा उचलल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानून
आपली रजा घेतो ...
-डॉ.किशोर सानप
दिविशा,
249/ए, मानेवाडा-बेसा रोड, शाहू
नगर, नागपूर-440 034
Phone - 9326880523, 9518368976
Email-
dr.kishorsanap@gmail.com